||ॐ श्री ध्यानेश्वराय नमो नमः ||
|| ॐ श्री दिगंबराय नमो नमः ||
गुरु म्हटल्यावर आपल्याला दत्तगुरु सर्वात आधी स्मरण होतात. दत्तगुरु म्हणजे साक्षात दत्तरुपी हरि ॐ ब्रह्म… काय आहे या दत्तगुरुंची कथा ….कशी रचना साकारली या त्रिगुणात्मक त्रैमुर्ती दत्तगुरुंच्या अवताराची… हरि ॐ ब्रह्मांच्या जन्माची…. पाहुया कथा श्री ॠषीरुपी दत्तगुरुंची…
श्री दत्तगुरुंचा जन्म हा ऋषी अत्री आणि माता अनुसयेकडे झाला. माता अनुसया या श्रेष्ठ पतीव्रता म्हणुन ओळखल्या जातात. त्यांना आपल्या पतीबद्द्ल खुप माया, आदर आणि भक्ती होती. आपले पतीच आपले परमपरमेश्वर आहेत. अश्या निस्सिम पतीभक्ती करणार्या त्या होत्या. ॠषी अत्री हे श्री ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते. ध्यान आणि ज्ञानाने परिपुर्ण भक्तीशाली…. माता अनुसया देखील ध्यानस्थ्… त्यांचा स्वभाव देखील खुप शांत आणि सत्य होता. त्यांच्या कुटीमध्ये आलेली कोणतीही आश्रित व्यक्ती ही सदैव प्रसन्न होऊन परतत असे. अन्नपुर्णा माता देण्याची त्यांची ही मायेची क्रिया सर्वत्र प्रचलीत होती. त्यांच्या चेहर्यावरचा सदैव प्रसन्न असा त्यांचा भाव इतरांनाही आनंद देत असे. त्यांची ही किर्ती संपुर्ण ब्रह्मांडात पसरलेली होती. त्यांचं पातिव्रत्या देखील संपुर्ण ब्रह्मांडाचा विषय होता. एकेदिवशी बघता बघता हरि ॐ ब्रह्मांकडे हा विषय रंगला. विषय रंगता रंगता माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्याकडे हा विषय पोहोचला. शेवटी त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलेच कि आमच्याइतकं श्रेष्ठ असं कोणाचं पातिव्र्यत्य आहे, आम्हाला या अनुसयेला भुतलावर जाऊन भेटलच पाहिजे.
माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांनी माता अनुसयेच्या पातिव्रत्येची परीक्षा घेण्याचे ठरविले. आमच्यापेक्षाही अशी कोण ही देवी जी खुप सुंदर आणि भुतलावर पातिव्रत्येसाठी नामांकित आहे. या विचाराने या देव्या आपला हा विषय हरि ॐ ब्रह्म यांच्याकडे येऊन मांडतात. पण त्यांना हा विषय आधीच कळलेला असतो. म्हणुनच त्रिदेव भुतलावर देवी अनुसयेची परिक्षा घेण्याचे ठरवतात. ते भुतलावर प्रकटतात आणि तिथुन माता अनुसयेच्या कुटिजवळ येऊन उभे राहतात. त्यावेळी नुकतेच ॠषी अत्री ध्यानधारणेसाठी गेलेले असतात. आणि त्यामुळे कुटिमध्ये माता अनुसयेशिवाय कोणीही नसते. त्रिदेव कुटिबाहेरुनच आवाज देतात. माता अनुसया नेहमी प्रमाणे आश्रीतांचा पाहुणचार करण्यासाठी बाहेर येतात आणि नेहमीप्रमाणेच आपल्या प्रसन्न व नम्र भावाने याचकांना भोजनासाठी विचारतात. त्रिदेव देखील त्यांची ही रित पाहुन प्रसन्न होतात. पण कुठेतरी परिक्षा ही घ्यायचीच असते. यासाठी ते कुटिमध्ये प्रवेश करतात आणि म्हणतात, “आम्हाला जेवायचे आहे पण आमच्या तपाप्रमाणे आम्हाला ताजे जल उपयोगात आणुन तुम्ही चुलीशिवाय शिजवलेले अन्न वाढावे. पण यावर एक अट अशीही आहे की भोजन आम्हाला निर्वस्त्र होऊन वाढावे, आम्ही असेच भोजन ग्रहण करु.
माता अनुसया दुखी होतात आणि ॠषींच्या या वचनापुढे विचारात पडतात. त्या या विचारांमुळे कुटिच्या आत येऊन आपल्या पतींचे ॠषी अत्रींचे स्मरण करतात. असे करता करता त्यांचे ध्यान लागते आणि पतिपरमेश्वर मानणार्या माता अनुसयेला ॠषी अत्रींचे दर्शन होते. घडलेला संपुर्ण प्रकार माता अनुसया आपल्या पतींना सांगतात आणि त्यांना विनवणी करतात कि तेच आपल्याला या आलेल्या प्रसंगातुन मार्ग दाखवु शकतात. ॠषी अत्री माता अनुसयेला शांत करतात आणि त्यांना ताजे जल मिळण्यासाठी वरुणदेवांचे ध्यान करण्यासाठी सांगतात. माता अनुसया वरुणदेवांचे ध्यान सुरु करतात. माता अनुसयेची हाक ऐकुन वरुणदेव प्रकट होतात. आणि ताजे जल अर्पण करतात.
नंतर प्रश्न असतो ते विना चुलीशिवाय अन्न कसे तयार होणार. पण माता इथेही ॠषींनी दाखवलेल्या मार्गानुसार ध्यान करुन अग्निदेवांना प्रसन्न करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने अन्न ही शिजवुन तयार होते. आता माता अनुसयेला दिलेल्या दोन्ही अटी पुर्ण झालेल्या असतात. आता बाकी होती ती शेवटची अट ज्यामध्ये माता अनुसयेची अग्निपरीक्षा होती. या विचाराला घेऊन माता अनुसयेच्या मनात एक वेगळीच कल्पना रचत गेली. आज जर आपली मुलं असती तर नक्कीच आपल्या मुलांनी आलेल्या आश्रितांचे स्वागत केले असते आणि अश्या वेगळ्याच संकटात आपण सापडलो नसतो. अश्या प्रकारच्या विचारात मग्न होत असता अचानक माता अनुसयेचे ध्यान लागते आणि माता अनुसया ध्यानस्थ होतात. तेवढ्यातच बाहेर तीन लहान बालकांचा अवतार प्रकटतो. ही तिन्ही बालके साक्षात हरि ॐ ब्रह्म असतात. त्या बालकांचा आवाज ऐकुन माता अनुसया आपल्या ध्यान अवस्थेतुन जागृत होतात. आणि त्या बालकांना आनंदाने आपल्या मांडीवर घेतात. त्यांना खेळवतात. थोडया वेळातच ऋषी अत्री तिथे येतात. आणि माता अनुसया सर्व कथन करण्याआधीच त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव होते. इथे ब्रह्मांडात मात्र माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती त्रिदेवांना परत येण्यासाठी इतका वेळ का लागला असावा या चिंतेत पडतात. कारण माता अनुसयेची परिक्षा घेण्यासाठी भुतलावर आलेले त्रिदेव अजुनही ब्रह्मांडात परतले नव्हते म्हणुन या त्रिदेव्या ही आपल्या पतींचा शोध घेण्यासाठी भुतलावर येतात.
पण त्यांना त्रिदेव कही दिसत नाहीत. म्ह्णुन त्या तिन्हीही देव्या माता अनुसयेच्या कुटिमध्ये येतात. तिथेही त्यांना त्रिदेव दिसत नाहीत. माता अनुसया आणि ऋषी अत्रींशी मात्र त्यांची भेट होते. त्यांना पाहुन त्रिदेव्या आपल्या कुटिमध्ये अवतरल्या आहेत याचा माता अनुसया आणि ऋषी अत्री यांना खुपच आनंद होतो. त्रिदेव्या त्यांना विचारतात कि आम्ही आमच्या पतींच्या शोधात इथे आलो आहोत. आम्हाला आमच्या पतींना भेटायचे आहेत. ऋषी अत्रींना आणि माता अनुसयेला या गोष्टीची कल्पना आलेली असते कि त्रिदेव बालरुपात आपल्याजवळ आहेत. म्ह्णुन ते त्यांना म्ह्णतात कि तिन्ही देव इथेच आहेत आमच्या जवळ आणि आपल्या जवळ असलेल्या बालमुर्ती कडे लक्ष देतात. हे पाहुन तिन्ही देव्या आपल्या पतींना आपल्या स्वःताच्या साक्षात स्वरुपात येण्याची विणवनी करतात. त्रिदेव्यांची विणवनी ऐकुन त्रिदेव आपल्या साक्षात रुपामध्ये अवतरतात आणि म्ह्णतात, “माता अनुसया या साक्षात पातिव्रत्य असलेल्या देवी आहेत. आम्ही आमच्या मातेवर फारच प्रसन्न आहोत. हे ऐकुन त्रिदेव्याही खुप प्रसन्न होतात आणि म्हणतात कि आम्हीही तुमच्यावर फारच प्रसन्न आहोत. तुम्ही कोणतेही वरदान मागा. तुम्हाला जे हवे आहे ते नक्की मिळेल. यावर ऋषी अत्री आणि माता अनुसया म्हणतात कि त्रिदेवांचा जन्म आमच्याकडे व्हावा. माता अनुसयेच्या उदरी त्यांचा जन्म व्हावा. आणि त्रिदेवांचे संगोपन हे आमच्या सहवासात व्हावे. त्रिदेव आशीर्वाद देतात. माता अनुसया आणि ऋशी अत्री प्रसन्न होतात. पुढे काही कालावधीनंतर त्रिदेवांचा जन्म होतो…हरि ॐ ब्रह्मांचा जन्म होतो. साक्षात श्री दत्तावताराचा जन्म होतो. आणि भक्तांना भक्तीचा मार्ग कळतो. भक्तीचा अर्थ कळतो.
असा झाला श्री हरि ॐ ब्रह्मांचा म्हणजेच श्री दत्तावतारांचा जन्म……..
— स्वाती पवार
Leave a Reply