क्षमा आपल्याला तेव्हाच मिळते, जेव्हा आपल्या मध्ये आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल पश्चातापाची भावना असते.
पश्चाताप म्हणजे मनातल्या मनात झालेल्या नुकसानाबद्दल वाटणारी खंत….मग ते नुकसान एखाद्या नात्यात असो किंवा एखाद्याच्या मनातील भावनांचे, तर कधी एखाद्या वस्तूचे नुकसान असो, नुकसान हे शेवटी नुकसानच असते. मग ते लहान असो किंवा मोठे…
“सॉरी…, मला माफ करा, मला क्षमा करा, माझं चुकलं”, असं बरंच काही आपण चुकी झाल्यावर बोलतो. पण ते बोलताना आपल्या मनापासून तसे भावदेखील प्रकट झाले पाहिजेत. तरच त्या शब्दांना मूल्य असते. नाहीतर नुसते एखाद्याच्या मनाचे समाधान होण्यासाठी, किंवा एखाद्याचे जास्त ऐकुन घेण्याची सवय नसल्यास, तर कधी भितीने, तर कधी स्वतःहून स्वतःच्या मनावर दडपण आणून क्षमा मागणे, अर्थहीन ठरते आणि अशा क्षमेला उत्तरही कधीच समाधानकारक मिळत नाही.
क्षमेमध्ये कधीही अहंकार नसावा. क्षमा करण्याची क्षमताही तितकीच मोठी असते. एखाद्याला माफ करण्यासाठी त्याच्या भावनांना समजुन घेणे, त्याच्या चुकीला सखोल समजून घेणे आणि क्षमा करणे, हे मोठ्या मनाचे लक्षण असते फक्त सबल मनाची व्यक्तीच हे करू शकते. कारण सबल मनाची व्यक्ती आपल्यामध्ये सहनशक्ती आणि संवेदनक्षमता बाळगते. शांतता बाळगते.
पण हे ही तितकेच सत्य कि, क्षमा ही तेव्हाच योग्य असते जेव्हा चुक ही जाणून-बुजून नाही, तर नकळत घडते. मुद्दामहुन केलेली चूक ही चुक नाही, तर कुटिलता असते, अपराध असतो आणि तिथे दंड हा योग्यच.
— स्वाती पवार
Leave a Reply