फार वर्षापुर्वीची एक गोष्ट.
एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे. गावामध्ये येणारी-जाणारी व्यक्ती ॠषीमुनींना आदराने नमस्कार करी. एकेदिवशी अश्याच गप्पागोष्टी करत असताना एका वाटसरुने गावामध्ये प्रवेश केला. आणि त्याचे लक्ष वेशीलगतच्या गुरुकुलाकडे गेले. म्हणुन गावामध्ये प्रवेश करण्याआधीच त्याने गुरुकुलामध्ये प्रवेश केला. तो त्या गावामध्ये व्यापार करण्यासाठी आला होता. म्हणुनया गावासंबधी त्याला थोडीफार माहिती हवी होती. त्यावेळी ॠषीमुनी मात्र आपल्या शिष्यांच्या सोबत नेहमीप्रमाणे गप्पागोष्टी करत बसले होते. तेव्हा जाता-जाता त्या वाटसरूने त्यांना नमस्कार केला आणि मोठ्या आदरभावाने त्यांना विचारले, “महाराज, या गावात कोणत्या स्वभावाची माणसं राहतात. हे ऐकुन ॠषीमुनी मंद हसले आणि हसून म्हणाले की, “तूम्ही सध्या जिथे राहत आहात, तिथे कोणत्या स्वभावाची माणसे आहेत. वाटसरू म्हणाला, “नका विचारू महाराज, ती खुप दुष्ट आणि विचित्र स्वभावाची माणसे आहेत”. यावर महाराज हसले आणि म्हणाले या गावातही अशीच माणसे आहेत. ॠषीमुनींचा असा कटाक्ष पाहून वाटसरू मात्र जास्त वेळ थांबलाच नाही. त्याने आपली वाट पकडली.
गुरुकुल हे गावाच्या वेशीवर असल्यामुळे तिथे सतत रहदारी असायची. काही वेळाने पुन्हा एक दुसरा वाटसरू तिथुन जात होता. तो मात्र एक गाव सोडुन याच गावी राहण्यासाठी येणार होता. गावी जाण्यापुर्वी त्यालाही या गावाबद्दल थोडीफार माहिती करुन घेऊया, असे वाटले. समोर आपल्या शिष्यांसोबत बसलेल्या ॠषीमुनींना पाहुन, आपण इथेच थोडं थांबु आणि या ॠषीमुनींशी थोडं बोलु. या इच्छेने तो गुरुकुलाच्या दिशेने चालत आला. त्याच्याही प्रश्नात तसे काही फारसे वेगळेपण नव्हते. त्यानेही असाच प्रश्न विचारला कि, महाराज मला या गावात निवासी व्हायचे आहे. पण इथली माणसे स्वभावाने कशी आहेत हे जाणण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुम्ही मला थोडं या गावात राहणार्या माणसांबद्दल काही सांगू शकाल का? मुनी म्हणाले, महाशय, सध्या तुम्ही राहात होतात, तिथली माणसं कोणत्या स्वभावाची आहेत. वाटसरू म्हणाला, जिथे मी राहत होतो तिथे माणसे खूप सभ्य, स्वच्छ मनाची आणि सरळ स्वभावाची होती. हे ऐकुन मुनी खूप सुंदर हसले आणि म्हणाले या गावातही अशीच माणसं तुम्हाला आढळतील. वाटसरु समाधानी झाला आणि आपल्या मार्गी चालु लागला.
ॠषीमुनींनी दिलेले हे उत्तर ऐकून शिष्यांनाही फार आश्चर्य वाटले. म्ह्णुन न राहवुन एका शिष्यांने ॠषीमुनींना एक प्रश्न केला. शिष्य म्हणाला, गुरुदेव, “एकाच स्थानाबद्दल तुम्ही या दोन्ही वाटसरूंना अशी वेगवेगळी उत्तरं का दिलात? यावर शिष्यांकडे पाहुन गुरु म्हणाले , “शिष्यांनो, जसा तुमचा दृष्टिकोन असतो तसेच समाजाचे चित्र दिसते. जशी दृष्टी तसे दृश्य, निरनिराळ्या ठिकाणी तुम्हाला निरनिराळी माणसे ही भेटणारच, आपल्याला फक्त चांगल्याच गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे.
— स्वाती पवार
Leave a Reply