मनाची सबलता म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा भक्कमपणा. आपल्या मनाचे निरोगी स्वास्थ्य….
आयुष्य सुंदर घडवण्यासाठी आपले विचार सुंदर असणं फार महत्त्वाचं आहे आणि मन सबल होण्यासाठी ध्यान करणे फार महत्त्वाचे आहे. सबल मनाच्या व्यक्तीमध्ये समजूतदारपणा असतो. घडलेल्या परिस्थितीचे त्या व्यक्तीला आकलन असते. सबल मनाची व्यक्ती ही कोणत्याही परिस्थितीत मेंदूला असंतुलित होऊ देत नाही. योग्य वेळी योग्य तो संवाद साधणं. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणं, हे या व्यक्तीला खूप चांगलं जमतं. सबल मनाची व्यक्ती ही सदैव आपल्या वागण्यामध्ये इतरांसाठी आदर बाळगते. अशा व्यक्तीच्या बोलण्यामध्ये नम्रता असते. या व्यक्तीच्या वागण्यामध्ये संवेदनशीलता असते. इतरांप्रति सहानुभूती असते आणि याची शांतता प्रत्येक वेळी सहनशक्ती आणि क्षमा भाव दर्शवते या गुणांमुळेच अशी व्यक्ती आपल्या आजुबाजूला असलेल्या परिस्थितीला आणि जीवनात आलेल्या संकटांना योग्य प्रकारे प्रतिकार करते म्हणून मन सबल असणे फार महत्वाचे आहे.
दुर्बल मनाच्या व्यक्तीमध्ये संकटांना सामोरे जाण्याची क्षमता ही फार कमी असते. आजुबाजुला घडणार्या वातावरणाचा या व्यक्तीवर अधिकांश परिणाम होत असतो. मनाने कमकुवत असल्याकारणाने अशा व्यक्तीमुळे कित्येकदा बरेच नुकसान होण्याची शक्यता असते. मग ते त्याचे स्वत:चे असो वा त्याच्याशी निगडित असलेल्या कोणाचेही असो. या व्यक्तीचे मन हे जागृत नसल्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य, याबद्दलचे संकेत हे खूप कमी प्रमाणात मिळतात. खरं तर मिळतच नाहीत, असेही म्हणायला काहीच हरकत नाही. अशी सारी लक्षणे मनाला दुर्बल करण्यासाठी बाळगण्यापेक्षा मनाला सबल करणं फार महत्त्वाचं आहे.
मन सबल होण्यासाठी नित्यनियमाने ध्यान करणे फार महत्वाचे आहे. स्वतःला वेळ देणं फार महत्वाचे आहे. दिवसातली फक्त २०-२५ मिनिटे सुद्धा आपल्याला स्वतःसाठी पुरेशी आहेत. या २०-२५ मिनिटामध्ये एका ठिकाणी शांत मुद्रेमध्ये बसुन आपण नेहमी ध्यान लावले पाहीजे. पण हा सराव आपण नेहमी केला पाहीजे. ध्यान हा एकमेव असा मार्ग आहे, ज्यामुळे मनाला सामर्थ्यशाली बनवून मनाची संकेत क्षमता वाढते. ध्यानामुळे जीवनाला सुंदरता प्राप्त होते, ध्यानामुळेच जीवनाला योग्य अशी रीत मिळते.
— स्वाती पवार
Leave a Reply