महर्षी व्यासांचा जन्मदिवस म्हणुन ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला “व्यास पौर्णिमा” असेही संबोधले जाते.
महर्षी पराशर हे व्यासांचे पिता. महर्षी पराशर हे खुप मोठे विद्वान ॠषी होते. एकदा महर्षी पराशरांना काही आध्यात्मिक कार्यान्वये नदीपलीकडे जायचे असते. हा प्रवास नावेमधुन होणार होता. एक कुमारिका नावेमध्ये नावाडीचे कार्य करत होत्या. आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होत्या. त्या लहानपणापासुनच नदीकाठी आलेल्या प्रवाशांना नदीच्या एका तटापासुन ते नदीच्या दुसर्या तटापर्यंत सोडण्याचे कार्य करत असत. त्यांचे नाव सत्यवती…. एका मासळीच्या उदरी जन्म झाल्यामुळे त्यांच्या अंगाला मत्स्य-सुगंध येत असे. त्यांचे संगोपन हे एका कोळ्याच्या कुटंबात झाले. मत्स्यगंधा या लावण्यवती होत्या. खुप सुंदर दिसत होत्या. तिथे त्यांना मत्स्यगंधा म्हणुनही ओळखले जायचे. त्यांच्या अंगाला मत्स्य-सुगंध येत असल्यामुळे त्यांना मत्स्यगंधा हे नाव देण्यात आले होते.
महर्षी पराशरांनी त्यांना नदीपलिकडे नेण्याची विनवणी केली. महर्षी पराशर नावेमध्ये उतरले. नावेमध्ये बसल्यानंतर सत्यवती महर्षींकडे एकटक पाहतच राहीली. महर्षी पराशर हे तेजस्वी होते. अखंड ध्यानधाराणा, तप केल्यामुळे त्यांच्याकडे दिव्य शक्त्या होत्या. नदीच्या या तटापासुन ते येणार्या तटापर्यंतच्या प्रवासामध्ये महर्षींनी सत्यवतीचे प्रारब्ध जाणले आणि नियतीचा संकेत जाणला. कारण महर्षी हे ध्यानस्थ होते.
पुर्वीच्या ऋषीमुनींनी शेकडो वर्ष ध्यानस्थ राहुन स्वतःमध्ये भव्यदिव्य अश्या शक्त्या आशिर्वाद स्वरुप मिळवलेल्या होत्या. नुसत्या बंद डोळ्यातुनही त्यांना सामान्य व्यक्तीच्या कल्पनेच्याही पलिकडे दिसायचे जे एखाद्या सामान्य व्यक्तीला दिसणे फार कठिण आहे. त्या दिव्यकाळात शांत मनाने दिलेल्या आशिर्वादाचा जितका सुखद परिणाम व्हायचा, तितकाच रागाच्या भरात ऋषीवाणीतुन निघालेला श्राप ही भयंकर असा शक्तीशाली परिणाम दर्शवायचा. उदाहरण घ्यायचं म्ह्टलं तर एकदा ॠषी गौतमांनी आपली पत्नी अहिल्येला श्राप देऊन शिळा (पाषाण) बनविले होते. या शिळारुपातुन मुक्ती मिळण्यासाठी देवी अहिल्येला श्रीविष्णुंच्या रामवतारापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. श्रीराम सिता आणि लक्ष्मणासोबत चौदावर्षे वनवासात असताना श्रीरामांच्या चरणस्पर्शातुन देवी अहिल्येला मुक्ती मिळाली. त्यावेळी वातावरणामध्ये ती शक्ती होती ज्यामु़ळे नियती आपली प्रसन्न्ता आणि कोप त्या-त्या परिस्थितीनुसार दर्शवत होती.
अशीच ही एक वेगळी कथा…..
|| नावेमध्ये रचवली, एक लीला रचयित्याने ||
|| आगळी-वेगळी ही गाथा, का लिहली विधात्याने ||
|| वळण घेतले नियतीने, ॠषीमुनींच्या अध्यात्माने ||
|| तारले तमेमधुनी युगाला, गुरुमाऊलीच्या नात्याने ||
जगाला अखंड ज्ञानाचा प्रकाश देणार्या अदभुत अश्या दिव्य बालकाच्या जन्मासाठी नियतीलि़खाणामध्ये आपण निमीत्त आहोत हे ही महर्षीं पराशरांनी जाणले. महर्षी पराशरांकडे एकटक पाहता पाहता विचारांच्या ओघात वाहुन गेलेल्या सत्यवतीला गुरुमाता बनण्याचा आशिर्वाद मिळतो. “तुझ्याकडे दिव्य अश्या ज्ञानाचा जन्म होणार आहे आणि त्या ज्ञानाला अखंड ब्रह्माण्ड महर्षी व्यास म्हणुन संबोधेल”. महर्षी पराशरांकडुन बालकाचे नामकरण होते. तो हा पौर्णिमेचा दिवस… महर्षी व्यासांचा जन्मदिवस…. या दिवसाला “व्यासपौर्णिमा” म्हणजेच “गुरुपौर्णिमा” म्हणुन साजरा करतात.
गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु…
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंनी दिलेल्या ज्ञानाबद्द्ल आपण कॄतज्ञता व्यक्त करतो. गुरुंना मानवंदना देतो.
— स्वाती पवार
Leave a Reply