आस्तिकता म्हणजे परमेश्वराच्या भव्यदिव्य अखंड अस्तित्वावर असलेला विश्वास आणि निस्वार्थ अशी भक्ती….
अक्कलकोट मधलीच एका गोविंद नावाच्या देव-दैव न मानणार्या नास्तिक इसमाची ही गोष्ट..
गोविंद नावाचा एक गृहस्थ कर्तव्यनिष्ठ आणि तेज बुद्धीचा होता. तो अक्कलकोटमध्ये राहत असे. त्याचं एक लहानसं कुटुंब होतं. कुटुंबामध्ये तो आपली आई आणि आपल्या पत्नीसोबत राहत असे. देवदैव न मानणारा असा हा गोविंद नास्तिक होता. आपल्या बुद्धीवर त्याला फार अहंकार होता. त्याच्या मताप्रमाणे कर्तव्य जगात सर्वश्रेष्ठ आहे. कर्तव्य श्रेष्ठ आहेच पण त्यात मी पणा नसावा. आणि त्याची आई आणि पत्नी दोघेही स्वामीभक्तीत तल्लीन होते. त्यांनी कितीही म्हटलं तरी गोविंद मात्र या परमेश्वरापासुन दुरच राही. या विषयामध्ये तो आपल्या पत्नीशी आणि आईशी अजिबात सहमत नव्हता.
एकदा गावामध्ये भुमिपुजनाचा कार्यक्रम होता. विहिर खणण्यापुर्वी भुमीपुजन होणार होते. आणि त्याच दिवशी तिथे भोजनाचा देखील कार्यक्रम होता. अभियंता म्हणुन भुमिपुजनाचा मान गोविंदाकडे सोपवण्यात आला होता. गावकरी एकत्र जमले. काही महत्वाच्या गप्पागोष्टी झाल्या, आणि त्यानंतर त्याने पुजनाला सुरुवात केली. त्यांनी गोविंदाला पुजनासाठी पुढे बोलावले. पण गोविंद हा नास्तिक स्वभावाचा होता. गोविंदाने त्यांच्याकडे पाहिले. आणि त्यांच्या विनवणीला थोडाही मान न देता तो मनात अगदी नास्तिक भावानेने पुटपुट्ला. पुजाअर्चना न करताच गोविंदाने अगदी रागारागात कुदळ उचलली आणि जमिन खणण्यासाठी पुढे सरसावला.
त्याच्या या अपमानावर गावकरी पाहतच बसतात. गोविंद आपले काम सुरु करतो. जमिनीवर वार घालायला सुरुवात करतो. पण एक-दोन वार घातल्यानंतर अचानक गोविंदाच्या हातातली कुदळ खाली पडते. तो आपले दोन्ही हात छातीशी धरुन ओरडु लागतो. त्याच्या छातीत असहाय्य वेदना होऊ लागतात. कुदळ हातातून निसटून जाते. तो खाली पडतो. जमलेले गावकरी त्याला घरी आणतात. गोविंदाचा मित्र भुजंगा लगेचच जाऊन वैद्यबुवांना घेऊन येतो. वैद्यबुवा त्याचे निदान करतात आणि म्हणतात कि, यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि हे आता फक्त दोन तीन दिवसाचे सोबती आहेत, असे म्हणताच गोविंदाची आई आणि पत्नी खुप रडु लागतात. गोविंद अंथरुणाला खिळून राहतो. भुजंगा हे सर्व ऐकतच असतो आणि त्यातच त्याला स्मरण होते, कीर्तन करायला आलेले असतांना स्वामींनी त्याला दृष्टांत देऊन सांगितले होते की, “गोविंदाला घरी जाऊन निरोप दे की, त्याचा आजार हा ललितस्तोत्र वाचण्याने बरा होईल. भुजंगा त्याप्रमाणे गोवंदाच्या घरी जाऊन हे सर्व सांगतो. पण स्वामींचा हा निरोप ऐकुन अंथरुणात खिळलेला गोविंद मात्र हा निरोप फेटाळून लावतो. पण त्याची पत्नी आणि त्याची आई या दोघी स्वामी भक्त असल्यामुळे त्याच्याकडे विनवणी करू लागतात. या दोघांचं मन ठेवण्यासाठी गोविंद भक्ती नसतानाही ललितस्तोत्र वाचतो. असेच काही दिवस उलटतात आणि गोविंदाच्या प्रकॄतीत सुधारणा दिसुन येते. दोन तीन दिवसानंतर वैद्यबुवा पुन्हा निदान करण्यासाठी येतात आणि सांगतात की गोविंद आता पूर्णता आजारमुक्त झालेला आहे. हे ऐकुन गोविंद थक्क होतो आणि आपल्या कुटुंबासोबत येऊन स्वामींना भेट देतो. त्याला खुप आश्च्रर्य वाटते. त्याचा अहंकार मोडुन पडतो. स्वामी चरणी येऊन गोविंद म्हणतो कि, “स्वामी, मला क्षमा करा, माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता, पण तरीही तुम्ही मला कसे काय बरे केलेत?”
स्वामी म्हणतात, “अरे गोविंदा, विश्वास तर तुझा नव्हता, पण तुझ्या कुटुंबातल्या माझ्या भक्तांचा होता, आम्ही आमच्या भक्तांसाठी तुला बरे केले आहे. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे, असे मानणे परिपुर्ण चुकीचे आहे. जिथे विज्ञानाचं प्रांत संपते, तिथूनच देवांचं प्रांत सुरू होते. विज्ञान सुद्धा परमेश्वरानेच बनवलेले आहे. जशी तुम्हा शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तशीच अध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय स्तरावर साक्षात्कार प्राप्त झालेल्या लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न मानणार्या नास्तिक लोकांची कीव येते.
— स्वाती पवार
Leave a Reply