निंदकाचे घर असावे शेजारी… अशी एक म्हण आहे.
एखाद्याने केलेली निंदा ही ऐकणार्याने सकारात्मकतेने ऐकली तर बरे… नाहीतर एखादी व्यक्ती आधीच स्वत:च्या विचारांनी व्यापलेली असेल तर्…काही चांगले न होता त्याच्याकडुन बरेच असे वाईट घडुन जाते. म्हणुनच खरेतर ही म्हण “निंदकाचे घर नसावे शेजारी” अशी असायला हवी.
समाजात वावरताना अजुनही लोकांचे टोमणे, भांडणे, एखाद्याची निंदा तर कुठे विनाकारण कुणाच्यातरी चुगल्या ह्या ऐकु येतातच. फक्त त्या करण्याची पद्धत मात्र बदलली. पंण वेदना मात्र त्याच आहेत. आपल्या स्वतःबद्दल न बोलता इतरांबद्दल बोलणं लोकांना फार आवडतेय.
एखाद्याची निंदा करणे हे फार सोपे असते. पण एखादी कमतरता दुर करणे हे फार कठिण. अशीच एक, या विषयाला सिद्ध करणारी ही गोष्ट.
एका नगरातली ही गोष्ट…
एका नगरामध्ये एक नामवंत चित्रकार राहत होता. त्या चित्रकाराला एक खुप सुंदर कल्पना सुचली. स्वतःला अधिक योग्य बनविण्यासाठी त्याला वाटले कि आपण इतरांकडुनही काही सल्ले घेऊया, जेणेकरुन आपण आपली कला अधिकाधिक सुंदर बनऊ आणि जनसामान्यांचा दॄष्टीकोनही त्यातुन आपल्याला समजेल, जेणेकरुन त्यांची मते आपल्या कलेला एक वेगळेपण देतील.
असे चित्रकाराचे विचार खुप सुंदर होते. म्हणुन चित्रकाराने अगदी रेखीव असं चित्र काढलं आणि ते चित्र त्याने आपल्या नगराच्या अगदी मधोमध लावलं होतं. त्यावर त्यांनी ठळक अक्षरात लिहिलं होतं की, “ज्यांना कोणाला या चित्रांमध्ये काही कमतरता जाणवत असेल तर तिथे त्याने येऊन एखादी खूण करावी”. चित्र फार रेखीव होतं पण तरिही नगरातल्या प्रत्येक येणार्या – जाणार्यांनी अगदी आवडीने खुणा केल्या. पाहता पाहता संध्याकाळ झाली. चित्रकार अगदी आतुरतेने घराबाहेर पडला. कारण त्याचा संकल्प सुंदर होता. संध्याकाळी जेव्हा त्या चित्रकाराने या चित्राकडे पाहिले तेव्हा तो खूप दुःखी झाला. कारण त्या चित्रावर खूपच खुणा केलेल्या होत्या आणि परिपूर्ण चित्र खराब करून ठेवले होते. त्याला काहीच कळेनासे झाले. तो दुःखी होऊन बाजुच्या कठ्ड्यावर अगदी शांत बसून राहिला. त्याच्या मित्राने ते पाहिले. मित्र त्याच्या जवळ आला आणि त्याने चित्रकाराला त्याचं कारण विचारलं. चित्रकाराने झालेली सर्व घटना सांगितली आणि आपल्या मनातलं दुखं परिपूर्ण हलकं केल. यावर त्याच्या मित्राने त्याला एक वेगळी युक्ती दिली. तो चित्रकाराला म्हणाला, “तु पुन्हा एकदा चित्र काढून नगरांमध्ये लाव आणि त्यावर लिहायला सांगितले की, “ज्याला कोणाला यात काही कमतरता जाणवत असेल, त्यांनी ती परिपूर्ण करावी”
दुसर्या दिवशी चित्रकाराने खुप आतुरतेने एक नवीन चित्र रेखाटले आणि आपल्या मित्राने सांगितल्याप्रमाणे ते नगरामध्ये त्याच ठिकाणी लावले. आणि त्यावर लिहिले कि, “ज्याला कोणाला यात काही कमतरता जाणवत असेल, त्यांनी ती परिपूर्ण करावी”. नगरातली लोकं चित्र बघत होती. पण यावेळी कोणालाही त्यात कमतरता जाणवली नाही. त्यावर कोणीही अद्याप खुणही केलेली नव्हती. संध्याकाळ झाली. चित्रकार आपल्या घरातुन बाहेर आला आणि त्याने त्याच आतुरतेने ते चित्र पाहिले. लगेचच त्याच्या परिपूर्ण विश्वाचे चित्र लक्षात आले की, कोणत्याही गोष्टींमध्ये कमतरता शोधणे हे खूप सोपे असते, निंदा करणे हे सोपे असते. पण त्यातली कमतरता शोधून दूर करणे हे तितकेच कठीण.
— स्वाती पवार
Leave a Reply