गुणधर्मांमुळेच एखाद्या व्यक्तीची छ्बी आपल्या मनावर बिंबली जाते. गुणांमुळेच व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्या व्यक्तीचं ठराविक व्यक्तीमत्व आपण आपल्या विचारांवर कोरतो. त्यात कधी सद्गुण अनुभवतो तर कधी दुर्गुण….
गुणधर्म म्हणजे आपल्यातलीच एक विशेषता…….मानवाचा खरा गुणधर्म म्हणजे मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, ही मानवियता … जसे जलाचा धर्म आहे तहान भागवणे व्याकुळता दुर करणे, सुर्याचा धर्म आहे सुष्टीला प्रकाश देणे. सजीवांकरीता जीवनसत्त्व निर्माण करणे. वायुचा धर्म आहे प्राण़वायु देणे, अग्निचा धर्म आहे उष्णता देणे.
गुणधर्म्र हा आपल्या कर्तव्याशी जोडलेला असतो. तो आपण, आपणहुन आपल्यापासुन वेगळा करु शकत नाही.
या विषयाला समजावणारी एक लहानशी बोधकथा….
पुर्वी प्रातःकाळी सुर्योद्याच्यावेळी स्नान करुन ध्यान पुजा करायची एक सुंदर रित होती. त्याच वेळी घडलेला हा प्रसंग.
एक ॠषी सुर्योद्यापुर्वीच स्नानासाठी नदीकिनारी आले. अंधार नुकताच ओसरत होता आणि काही क्षणांमध्येच पहाट होणार होती. ते नदीजवळ आले, नदीमध्ये उतरण्यापुर्वीच अचानक त्यांचं लक्ष पाण्यात असलेल्या एका विंचुकडे जाते, जो आपला जीव वाचवण्यासाठी पाण्याबाहेर येण्याच्या सतत प्रयत्नांत होता. किती काही केल्या तो बाहेर येण्याच्या प्रयत्नात होता. पण यश काही मिळत नव्हते. हे पाहुन ॠषी त्या विंचुजवळ जातात. त्याला पाहुन ऋषींनी हलकेच त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तो विषारी आहे हे जाणुनदेखील त्यांंनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला आणि विंचुने अचानक त्यांना डंख मारला. डंख मारताच विंचु हातातुन सुटुन पुन्हा पाण्यात पडला. ॠषींनाही असहाय्य वेदना झाल्या पण आपल्या वेदनांकडे लक्ष न देता, ॠषींनी त्याला पुन्हा उचलले आणि विंचुने त्यांना पुन्हा डंख मारुन वेदना दिल्या. ही क्रिया जवळजवळ ३-४ वेळा झाली, त्याच नदीमध्ये ॠषींपासुन थोडे दुर, एक त्याच गावातील व्यक्ती तिथे स्नानासाठी आली होती. ती व्यक्ती हा प्रयत्न दुरुनच पाहत होती. त्या व्यक्तीला ॠषींना झालेल्या वेदना पाहवत नव्ह्त्या. न राहवुन त्याने ॠषींना विनंती केली, कि त्यांनी हा प्रयत्न सोडुन द्यावा. पण ते ऐकुन देखील ॠषींनी आपले कार्य सुरुच ठेवले. शेवटी काही प्रयत्नांमध्येच विंचुला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. हे पाहिल्यावर त्या व्यक्तीने ॠषींना विचारले. “तो विंचु तुम्हाला सतत डंख मारत होता तरिही तुम्ही वेदना सहन करुन देखील त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलात?”
यावर ॠषीं म्हणाले, “होय, कारण डंख मारणे हा त्याचा गुण आहे पण प्राण वाचवणे हा मानवतेचा धर्म…जर तो आपला गुण सोडत नव्हता तर मग मी माझा धर्म कसा सोडु.”
— स्वाती पवार
Leave a Reply