मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास.
आत्मविश्वासामुळे प्रत्येक गोष्ट ही खुप सहज होऊन जाते. कोणतेही कार्य करण्यासाठी सर्व प्रथम आपल्या स्वतःवर विश्वास असणे हे खुप महत्वाचे आहे तो म्हणजे “मी हे काम खुप चांगल्या प्रकारे करु शकते आणि सहज करु शकते. या विश्वासामुळेच आपण केलेले प्रयत्न हे यशस्वी होतात. प्रयत्नांना यशाचे स्वरुप हे आत्मविश्वासामुळे मिळते. आत्मविश्वास म्हणजे निम्मे यश….पण या आत्मविशासालाही काहीशी मर्यादा आहे. जेव्हा हाच आत्मविश्वास अति होऊन मर्यादेपलीकडे होतो. तेव्हा मात्र आपले विचार विरुद्ध असतात ते असे की “फक्त मीच हे काम खुप चांगल्याप्रकारे करु शकते आणि सहज करु शकते. मग या भावनेला आत्मविश्वासाचा दर्जा न मिळता अतिशहाणपणाचा तर कधी अहंकाराचा दर्जा मिळतो.
आत्मविश्वास बाळगुन सुरुवात केलेल्या कामामध्ये सुरुवातीपासुन शेवटपर्यंत आपल्यामध्ये त्या कामाच्याप्रती जितकी आवड असते तितकाच आदरही असतो आणि त्याप्रती एकाग्रहाही असतेच. परमेश्वराने मानवाला विचार करण्याचे खुप मोठे सामर्थ्य दिलेले आहे, खुप मोठी शक्ती दिलेली आहे पण त्या विचारांचे समर्थन करण्यासाठी, त्या विचारांना वळण देण्यासाठी दिलेली आहे भक्ती. भक्ती हे श्रद्धेचं स्वरुप…भक्तीमध्ये जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा नष्ट होते ती शक्ती….म्हणजेच जेव्हा आपण स्वतःवर संशय घेऊन एखादे काम हाती घेतो की “मी हे काम करु शकेन की नाही” तेव्हा मात्र ते सुरु करण्याआधीच त्यातली उर्जा ही लोप पावलेली असते आणि परिणामांची प्रचिती ही नकारत्मकच मिळते. आपल्या स्वतःवरचा संशय आपल्याला दुसर्यांवर संशय घेण्यासाठीही स्फुर्ती देतो कारण आपल्या संशयरुपी विचारांच्या कंपनांना नियतीकडुन “तथास्तु” लाभत असतो. तसेच स्वतःवरचा विश्वास आपल्याला दुसर्यांवर विश्वास ठेवण्यासाठी, त्यांना विश्वासात घेण्यासाठी आणि त्यांचा विश्वास टिकवण्यासाठीही मदत करतो.
नात्यांमध्ये जसा समजुतदारपणा महत्वाचा आहे, तडजोड महत्वाची आहे, तितकाच महत्वाचा आहे तो एकमेकांवरचा विश्वास, विश्वासाने नाते टिकवता येते, संशयाने ते कधीच टिकत नाही. समोरच्यावर शतप्रतिशत ठेवलेला विश्वास हा त्याच्याकडुन कधीही विश्वासघात घडवुन आणत नाही. कारण आपल्यातल्या आत्मविश्वासामुळे आणि समोरच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे, घात करण्याचा कुटिल व्यवहार आणि विचार हा त्या व्यक्तिच्या मनातुनच नष्ट होतो. पण हा आत्मविश्वास वाढवायचा कसा? तर आपण केलेल्या ध्यान भक्तीमुळेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते.
अंतर्मानातल्या संशयी विचारांना मुळासकट काढुन टाकण्याचे काम फक्त ध्यानातुनच घडुन येते. ध्यानमार्गातुनच आपण आपल्या मनातला संशय दुर करुन चांगल्या विचारांची जाग्रुती करु शकतो. ध्यान केल्यामुळेच विचारांमध्ये स्पष्टता येण्यास मदत होते. म्हणुनच आत्मविश्वासासाठी ध्यानभक्ती खुप महत्वाची आहे.
— स्वाती पवार
Leave a Reply