गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे. म्हणजे आपले अंतर्मन आपल्याच बाह्यमनाशी जुळणे. आपल्याच बाह्यमनाशी एकरुप होणे. या पॄथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक सजीवाकडे परमेश्वराने दोन मनं दिली आहेत. एक म्हणजे आपले अंतर्मन आणि दुसरे ते म्हणजे आपले बाह्यमन…..
मन म्हणजे फक्त आपण जाणीव करुन घेऊ शकतो अशी एक आकुती. नाही त्या मनाला आकार आहे, नाही कोणता रंग.. पण तरीही त्यात प्रचंड असं सामर्थ्य आहे. आपलं मन हे अमर्यादित सामर्थ्य एकवटुन आहे. आणि त्यात आपले अंतर्मन हे आपल्या बाह्यमनापेक्षाही कितीतरी पटीने शक्तीशाली आहे. जितके ते चंचल आहे तितकेच ते स्थिर देखील आहे. मनाला अंकुश लावणे हे फार कठिण. त्याला स्थिर करणे ही फारच कठिण गोष्ट आहे. पण जर एकदा का मन स्थिर झाले कि ते विराट असं सामर्थ्य स्वत:मध्ये एकवटते. जीवनातल्या प्रत्येक कठिण प्रसंगाला आपल्याला वेळोवेळी संकेत देऊन त्यातुन बाहेर काढते.
प्रचंड असं सामर्थ्य असलेल्या आपल्या अंतर्मनाला आपण कधीही जागॄत करत नाही. बाह्यमनाने दिलेल्या सुचनांनुसार आपण आपली कॄती घडवितो. एक साधं उदाहरण घेऊया, कित्येक वेळातरी आपल्याबरोबर असं घडतं, एखादा शुल्लक निर्णय घेताना देखील आपण विस्कळीत होतो. एक मन आपल्याला त्याबद्दल सकारात्मक बाजु दर्शवते तर त्याच वेळी दुसरं मन आपल्याला त्या बद्दल नकारात्मक बाजु दर्शवते. आणि अश्या दुविधेमुळे आपण आपला निर्णय देखील स्थिर ठेऊ शकत नाही. आपण विस्काळीत होतो. आपले विचार चुकतात. आपले विचार चुकले की आपली कॄती देखील चुकते. आणि याचा परिणाम म्हणजे आपण आपल्या हाती घेतलेले काम अपुर्ण राहते. अंतर्मनाने घेतलेला निर्णय हा जेव्हा आपल्या बाह्यमनाला मान्य होतो आणि बाह्यमनाने केलेली निवड जेव्हा आपल्या अंतर्मनाला योग्य वाटते तेव्हाच परिणाम सकारात्मक मिळतो.
जेव्हा आपली दोन्ही मनं एकाग्र होतात तेव्हाच कोणतेही कार्य सिदध होते. कोणतेही कार्य सिद्ध होण्यासाठी आपल्या दोन्ही मनांची एकमेकांशी असलेली सांगड ही योग्य असायला हवी. म्हणजेच आपल्या दोन्ही मनांनी एकच मत मांडणं महत्वाचे आहे. एकच निवड करणे महत्त्वाचे आहे, यासाठी आपल्या दोन्ही मनांची एकमेकांशी योग्य ती सांगड हवी, योग्य असे एकमेकांशी गुंजन हवे.
— स्वाती पवार
Leave a Reply