मौन म्हणजे एक विलक्षण सामर्थ्य आहे.
मौन धारणा साधल्यामुळे आपल्या जिभेवर आपला संयम हा कायम राहतो आणि आपल्या या जीभेवरचा संयमच खूप अद्वितीय कार्य घडवून आणतो.
हाती घेतलेल्या एखाद्या कामाची चांगली सुरुवात म्हणजे कार्य अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाले आहे असे समजले जाते. जे कार्य एकाग्रतेने सुरू केले जाते ते अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होते. मौनावस्था धारण करून केलेली प्रार्थना, तप आणि साधना हे ज्ञानाचे प्रतीक आहे ते कधीच निष्फळ ठरत नाहीत. इतर वेगवेगळी कारणे आहे मौन राहण्याची…भिती, अहंकार, उदासीनता, चिंता…सततचे येणारे विचार…पण इथे विषय घेतला आहे तो मौनसाधनेचा. संयमस्वरुपी मौनावस्थेचा…
कधी कधी जे कार्य बोलुन साधता येत नाही, ते फक्त मौन धारण करूनच साधता येते कारण जेव्हा आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपल्या अंतर्मनातली उर्जा अधिकाधिक कार्यरत होते. आपली इच्छाशक्ती जास्त कार्य करते. आपली परिपूर्ण एकाग्रता एखाद्या कार्यामध्ये कितीतरी पटीने एकवटली जाते.
मौनावस्थेचा खरा अर्थ म्हणजे शक्तीला विखरु न देता त्याला संयमस्वरुपी धाग्यामध्ये एकवटणे. मौन हे एक बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे. जी व्यक्ती ज्ञानाने जितकी सखोल असते ती व्यक्ती मौन बाळगणारी असते. ज्याप्रमाणे एक संथ वहात असलेली नदी ही अतिशय खोल असते. मौन हे व्यक्तीच्या वाणीला मार्मिकता प्राप्त करून देते. मौन हे व्यक्तीला ऋषी स्वरूप प्राप्त करून देते. अशा व्यक्तीचे आचरण हे इतरांसाठी एक आदर्श असते.
— स्वाती पवार
Leave a Reply