ही कथा आहे माता महिषासुरमथिनीची……
रंभ आणि करंभ नावाचे दोन राक्षस होते. ते एकमेकांचे सख्खे भाऊ होते. देवलोक जिंकण्यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न सुरु केले होते. आणि ते कसेही करुन जिंकायचेच. हा प्रण देखील त्यांनी केला होता. पण तो जिंकायचा कसा? तर देवांकडुनच वरदान घेऊन देवलोक जिंकण्याचा संपुर्ण कट त्यांनी रचला. आता देवांकडुन वरदान मिळवणे ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. कारण देवांना यासाठी प्रसन्न करणे फार गरजेचे होते. आणि प्रसन्नता हि ध्यानातुनच प्राप्त होणार हे ही त्यांना चांगलेच माहित होते. म्हणुन दोन्ही भावांनी ध्यानाला बसण्याचा पक्का निर्धार केला आणि ठरल्याप्रमाणे रंभ नावाच्या असुराने अग्निदेवांचे ध्यान सुरु केले आणि करंभ नावाच्या असुराने पाण्यामध्ये बसुन वरुण देवांचे ध्यान सुरु केले. ध्यान सुरु झाले. पण हे ध्यान सुरु झाल्यानंतर या गोष्टिची कल्पना संपुर्ण देवलोकांपर्यंत पोहोचली आणि बघता बघता ही बातमी देवांचे राजे इन्द्रदेव यांच्या स्वर्गलोकात येऊन पसरली. इंद्रदेवांची चिंता वाढु लागली, ‘जर हे ध्यान यशस्वी झाले तर मात्र इथे असुरांचे राज्य वाढणार म्हणुनच त्यांना या दोन्ही असुरांच्या ध्यानाला खंडित करणे फारच गरजेचे वाटले. आता हे ध्यान खंडित करायचे कसे या विचाराने देव इंद्र अतिशय बैचेन झाले. त्यांनी खुप विचार केला, यावर त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी मगरीचे रुप धारण करुन पाण्यामध्ये बसलेल्या असुर करंभाचे ध्यान भंग करण्याचे ठरविले. असुर करंभ परिपुर्ण ध्यानस्थ होता. थोडयाच वेळात पाण्यात मगरीचे रुप घेऊन इंद्रदेव अवतरले आणि त्यांनी असुर करंभाचे ध्यान भंग केले. करंभाला ध्यानामधुन जाग आली. तो लगेचच उठला आणि मगरीसोबत त्याचे युद्ध सुरु झाले. भयावह युद्ध सुरु असताना इथे ध्यानस्थ बसलेल्या रंभ असुराला याची जाणीव होत होती पण त्याला कसेही करुन प्रसन्नता हवी होती. वरदान हवे होते. जराही लक्ष विचलीत होऊ न देता त्याने आपले ध्यान अग्निदेवांवर सुरुच ठेवले. अग्निदेव प्रसन्न झाले. कितिही काही झाले तरी असुरांनी ध्यान करुनच देवांची प्रसन्नता मिळवलेली आहे आणि देवांकडुनच दैवीशक्ती मिळवुन त्या शक्तीचा गैरवापर केला अहे. अग्निदेव असुर रंभावर प्रसन्न होऊन त्याला हवा तो वर मागायला सांगतात. यावर असुर रंभ आपल्या असुरांचे राज्य वाढावे. आपली पिढी वाढावी म्हणुन आपल्याला एक असुरी शक्तीचे बालक व्हावे अशी कल्पना मनात आणुन ती तो अग्निदेवांपुढे मांडतो. यावर अग्निदेव देखील वरदान देतात आणि म्हणतात. “इथुन निघाल्यानंतर ज्याही जीवावर तुझे लक्ष जाईल त्यापासुनच तुला एक असुरी शक्तीचे बालक होईल आणि तथास्तु बोलुन अग्निदेव दॄष्टीआड होतात.
वरदान मिळाल्यावर असुर रंभ अतिशय खुश होतो. थोडयाच वेळापुर्वी झालेल्या आपल्या भावाच्या मॄत्युचाही त्याला परिपुर्ण विसर पडतो. तिथुन बाहेर निघताच असुर रंभ चे लक्ष एका म्हैशीवर पडते. बघताच क्षणी त्याचे लक्ष वेधले जाते आणि असुर रंभ भावनाकॄत होतो आणि दिलेल्या वरदानाप्रमाणे त्याला त्या म्हैशीकडुनच असुरी बालक होते. हे बालक असुरी रुप घेऊनच आलेले असते. या बालकाचे शरीर मानवी आणि डोक्यावर म्हैशीप्रमाणे दोन शिंगे असतात. या असुरी बालकाचा जन्म होताच असुर रंभ आणि म्हैस मरण पावतात आणि त्यानंतर या बालकालाच म्हैशासुर असे संबोधले जाते. पण म्हैशासुर हा अतिशय उन्मत होत जातो. आपल्या वडिलांपेक्षाही त्याला जास्त शक्तीवान बनायचे असते. म्हणुन तोही आपल्या वडिलांप्रमाणे ध्यान लावुन बसतो. आतापर्यंत जन्मलेल्या सर्व असुरांनी देवांकडुनच शक्ती प्राप्त केलेली आहे. म्हैशासुर आपल्या शरिराला ताण देऊन ध्यानाला बसतो आणि देवांना प्रसन्न करुन घेतो. देवांची प्रसन्नता मिळाल्यानंतर आपल्याला कोणत्याही देवांकडुन मॄत्यु येणार नाही असे वरदान तो मिळवतो. आणि वरदान मिळताच उन्मत होऊन गर्विष्ठ होतो. त्याचा हा उन्मतपणा आणि अहंकारीपणा सर्व देवांना त्रास देऊ लागतो. यावर देवांची एकमेकांशी सतत चर्चा सुरु असते. सर्व देव मिळुन त्रिदेवांकडे येतात आणि त्रिदेवांना आपल्या संकटाबद्दल सारे काही स्पष्ट करतात. पण आधीच त्रिदेवांना हे सर्व काही माहीतच असते. फक्त योग्य ती वेळ यायची बाकी असते.
असुरशक्ती नष्ट करण्यासाठी ही एक लीलाच होती. देवांकडुन म्हैशासुराचा वध हा होणार नव्हता. कारण असे वरदान म्हैशासुराने मागितलेच होते. पण देवीकडून नक्किच होणार होता. संपूर्ण सृष्टीला संकटातुन मुक्त करण्यासाठी साक्षात त्रिदेव ध्यानाची अवस्था धरतात आणि आपल्या ध्यानातुनच देवी शक्तीचे रुप निर्माण करतात. त्या शक्तीरुपी देविमातेची नऊ रुपे निर्माण होतात. या नऊ मातेची रुपे एकत्रितपणे येऊन एकच शक्तिशाली अवतार तयार होतो. ज्या अवताराला आपण सर्वजण माता दुर्गा म्हणून ओळखतो. त्रिदेव आपला आशीर्वाद म्हणून आपली शस्त्र मातेच्या हाती अर्पण करतात. यानंतर माता दुर्गा असुर म्हैशासुराचा वध करण्यासाठी समर्थ होतात आणि अखेर असुर म्हैशासुराचा वध होतो. म्हणूनच माता दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हणूनही संबोधण्यात येते.
— स्वाती पवार
Leave a Reply