घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. मातेचे जागृत स्वरूप म्हणून एक घट बसविण्यात येतो आणि नवदुर्गेची आराधना करण्यात येते. महिषासुर नावाच्या दानवाचा वध करणारा हा मातेचा अवतार महिषासुरमर्दिनी म्हणून ध्यानस्मरण केला जातो. महिषासुराने महादेवांचे ध्यान करून त्यांना प्रसन्न करून वरदान प्राप्त केले होते. त्याच्या उन्मतपणाला असहाय्य होऊन सर्व देवांनी त्रिदेव हरि ॐ ब्रह्मांना प्रार्थना केली. महिषासुराचा वध करणे इतके सोपे नव्हते. म्हणुन साक्षात त्रिदेवांनी असूर शक्तिचा नाश करण्यासाठी आदिशक्तीचे ध्यान केले. त्रिदेवांच्या या परमध्यानामधूनच देवीदुर्गा ही शक्ती निर्माण झाली. महिषासुराशी माता दुर्गेचे परिपूर्ण नऊ दिवस युद्ध झाले प्रत्येक दिवशी मातेची शक्ती एक नवा अवतार घेऊन एकेक पटीने वाढत होती. दुर्गामातेचा पहिला अवतार आहे, माता शैलपुत्री….. शैलपुत्री नावामधील शैल चा अर्थ आहे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या. शैलपुत्री म्हणजे हिमालय पुत्री….
आता आपण पाहूया माता शैलपुत्रीच्या जन्मावताराची कथा….
राजा प्रजापती यांची कन्या सती, हिचे अघोरी अवतार असलेल्या महादेवांवर मन जडते. श्रीब्रह्मदेवांची ही सुंदर रचना साक्षात विवाह सोहळ्यामध्ये सजते आणि माता सतीचा देवाधिदेव महादेवांसोबत विवाह संपन्न होतो. काही कालांतराने राजा प्रजापती आपल्या महालामध्ये यज्ञ पूजन आयोजित करतात.
सर्व देवी-देवतांना या यज्ञात येण्याचे आमंत्रण करतात. परंतु महादेव आणि सती मातेला मात्र आमंत्रण नसते. आपल्या वडिलांनी आपल्या पती परमेश्वरांना का बोलावले नाही या विचारांनी देवी सती अतिशय बेचैन होतात. याबद्दल त्या महादेवांशी देखील बोलतात. पण यावर महादेव म्हणतात की. “आपल्याला तिथे आमंत्रण नाही, त्यामुळे आपण तिथे जाणे योग्य नाही” पण देवी सतीला हा आपल्या महादेवांचा अपमान आहे, असे सतत मनोमन वाटत असते. न राहवुन त्या आपली बेचैनी महादेवांना सांगून तिथे जाण्याची जिद्द करतात. राजा प्रजापतीकडे आल्यावर तिथे सर्व देवी-देवतांना उपस्थित पाहून देवी सतीला अतिशय दुःख होते. कारण फक्त महादेवांनाच आमंत्रण नव्हते. यज्ञामध्ये महादेवांना न बोलवुन केलेला त्यांचा हा अपमान आणि त्यांच्याबद्दल उद्गारलेले अपमानास्पद उच्चार देवी सतीला सहन करण्याच्याही पलीकडचे होते. तो अनादर सहन न झाल्यामुळे देवीसती त्याच यज्ञकुंडातील ज्वलंत अग्नीमध्ये स्वतःचे समर्पण करतात. ध्यानस्थ महादेवांना हे कळताच महादेव क्रोधीत होतात आणि महादेवांच्या क्रोधाग्निने संपूर्ण यज्ञ उध्वस्त होतो. पुढे हाच देवी सतीचा अवतार हिमालय पुत्री, शैलपुत्री म्हणून जन्म घेतो. शैलपुत्री मातेलाच पर्वत कन्या, माता पार्वती असे म्हणतात. माता शैलपुत्रीचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये पाषाणप्रमाणे स्थिरता येते. मन खंबीर, निडर आणि शांतस्वरूप बनते.
— स्वाती पवार
Leave a Reply