स्कंदमाता म्हणजे साक्षात ममत्वाचे आराध्यदैवत… स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे. बाळ कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता…
बाळ कार्तिकेयाला आपल्या मांडीवर बसवून अस्त्र, शस्त्र घेऊन माता सिंहावर आरूढ अशी स्कंद मातेची ठेवण आहे. शौर्य, सामर्थ्य आणि करुणेची ही साक्षात ध्यानमूर्ती आहे. स्कंद माता हे साक्षात देवी पार्वतीचेच रूप आहे. आणि बाळ कार्तिकेय हे देवतांच्या सेनेचे प्रधानमंत्री आहेत. बाळ कार्तिकेय हे दक्षिण भारतीयांमध्ये दैवत स्वामी मुरुगन म्हणून पुजिले जातात.
एकदा राजा दक्ष प्रजापतींच्या घरी आयोजित केलेल्या यज्ञकुंडामध्ये जेव्हा माता सती, महादेवांचा अपमान सहन न झाल्यामुळे आपले शरीर यज्ञकुंडात त्यागतात, तेव्हा ध्यानस्थ बसलेल्या महादेवांना याची कल्पना लागते. ते अतिशय क्रोधीत होतात. त्यांच्या क्रोधाग्नीने यज्ञ उध्वस्त होतो व देवी सतीला पाहून महादेव अतिशय दुःखी होतात. परिपूर्ण दुखावस्थेत बुडून गेलेले महादेव, अनंत काळासाठी ध्यानात विलीन होतात. आणि याच वेळी असूरशक्ती तारकासुर उन्मत होतो.
तारकासुराचा उन्मतपणाला देवगण अतिशय त्रस्त होतात. तारकासुर अतिशय अहंकारी आणि उन्मत्त राक्षस असतो. दैवीध्यान करूनच त्यांने देवतांना प्रसन्न केलेले असते आणि वरदान मिळवलेले असते. तारकासुराचा वध हा फक्त महादेवांच्या बालकाच्या हातूनच होणार असतो. पण इकडे महादेव अघोरी ध्यान धरून वैराग्यामध्ये असतात. “अघोरी रुप असणार्या आणि सदैव ध्यान चिंतनात विलीन असणाऱ्या महादेवांचा संसार कधीही रचला जाणार नाही. त्यामुळे त्यांचे बालक माझा वध करेल”, हे अशक्यच आहे, या दुष्ट हेतूने तारकासुराने हे वरदान मागितले होते. आपल्या शक्तीवर गर्व करून त्याने देव-देवतांना अतिशय छळले. त्याच्या या उन्मतपणाला कंटाळून देव-देवता, श्री ब्रह्मा आणि श्रीविष्णूंकडे येतात आणि तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना मिळते की पूर्व अवतारामध्ये असलेल्या देवी सती पुन्हा पार्वती म्हणून महादेवांच्या जीवनात येतील आणि तेव्हाच महादेव व माता पार्वतीचे बालक जन्म घेईल. हे समजल्यावर देव देवता अतिशय प्रसन्न होतात.
पुढे सर्व काही असेच घडते. माता पार्वतीने महादेवांप्रमाणेच अघोरी ध्यान केले आणि महादेवांना प्रसन्न करून त्यांना आपल्या जीवनात येण्यासाठी प्रार्थना केली. महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय यांचा जन्म झाला. ध्यान, ज्ञान आणि सामर्थ्यशाली कार्तिकेय याने तारकासुराचा वध केला. या बालकाची माता म्हणून माता पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखण्यात येते. या मातेचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये शौर्य आणि सामर्थ्यासोबत करुणामय अंतकरण जागृत होते.
— स्वाती पवार
Leave a Reply