नवीन लेखन...

निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान….

अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..

अखंड सृष्टीवर जेव्हा असुर शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी उन्मात घडवला होता, तेव्हाची ही कथा.

देवलोक त्रस्त झाले होते. स्वर्गलोक जिंकण्यासाठी असुरांनी भयंकर युद्ध सुरू केले. इंद्रलोकातील सर्व देवांचे प्रयत्न इथे कमी पडले. कारण शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी तपश्चर्येने शक्ती मिळवली होती. बघता बघता इंद्रदेवाचे राज्यहरण झाले आणि पुढे असुरांनी देवांचे त्रिलोक जिंकण्याचा ही हट्ट धरला. सर्वात प्रथम त्यांनी चंड आणि मुंड या दोन असुरांना युद्ध करण्यासाठी पाठविले. आपल्या गर्वाच्या ओघात असुरीबुद्धीने ते स्वत:चाच काळ जवळ आणत होते. चंड आणि मुंड यांनीही देवांबरोबर युद्ध सुरू केले. अखंड सॄष्टीवर हाहाकार उडाला होता. असूरी शक्ती कोणालाही ऐकत नव्हती. अन्तः जगतजननी माता दुर्गेला हा विध्वंस सहन झाला नाही आणि माता दुर्गेने असुरांच्या या कृत्याला मृत्यू द्यायचे ठरवले.

असुरांच्या मिळालेल्या वरदानाचे कवच हे फक्त देवीकडूनच भेदले जाणार होते, कारण देव-दानव, पशु, पक्षी, जलचर, भूचर यांच्यातील कोणताही नर त्यांचे प्राण घेऊ नये, असे वरदान असुरांनी मागितले होते. म्हणूनच स्त्रीशक्ती माता दुर्गेला हा महाकालीचा अवतार धारण करावा लागला होता. मातेने महाकालीचे साक्षात रूप धारण केले. आणि असुर चंड आणि मुंड यांचे क्षणात शिर धडापासून अलग केले. सर्वत्र शांतता पसरली. मातेच्या या महास्वरूपाला सर्व देवतांनी वंदन केले. मातेच्या एका हातामध्ये चंड आणि मुंड यांचे शिर आणि दुसऱ्या हातामध्ये रक्ताने माखलेले अस्त्र, नजरेमध्ये रुद्रता आणि श्वासांमध्ये धगधगणारा अग्नि पाहून ब्रह्मभार्या सरस्वती मातेने, माता महाकालीला देवी चामुंडा हे नाव दिले. म्हणून आजही रक्षणअवतार म्हणून मातेचा चामुंडा देवी अवतार प्रसिद्ध आहे.

चंड आणि मुंड यांचा वध म्हणजे शुंभ आणि निशुंभ यांचा पराभव होता. असुरांना आपला झालेला हा पराभव सहन झाला नाही. म्हणून त्यांनी माघार न घेता पुन्हा आपला प्रयत्न सुरूच ठेवला. शुंभ आणि निशुंभ असुराने पुन्हा एकदा दुसऱ्या असूर शक्तीला बोलावले आणि पाठवले. त्याचे नाव होते असुर रक्तबीज… रक्तबीज या राक्षसाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून असूरशक्ती निर्माण होत होती, असंख्य रक्तबीज निर्माण होत होते. असे वरदानच त्याला मिळाले होते. श्रीब्रह्मदेवांचे महाध्यान करूनच त्याने हे वरदान मिळवले होते. या असुराला भस्म करणे ही साधीसोपी गोष्ट नव्हती. भयंकर युद्धाला सुरुवात झाली. माता महाकालीने जितके त्याचे रक्त सांडले होते, तितकेच असुर निर्माण होत होते. हे पाहुन शेवटी रुद्राणीचा क्रोध भयंकर झाला आणि रागारागाने मातेने त्याचे रक्त भूमीवर सांडू नये म्हणून ते आपल्या शरीरात ग्रहण केले. जसजसे रक्तबीजचे रक्त सांडत होते, माता ग्रहण करत होत्या. मातेचा हा तांडव पाहून, “सर्व काही नष्ट होणार की काय?” असा प्रश्न देवी-देवतांच्या मनात निर्माण झाला. असुरसेनेत भय निर्माण झाले. असंख्य निर्माण झालेले असूर संपत गेले. पण मातेचे रूप तरीही शांत होत नव्हते. भूमीवर देह दणाणून माता तांडव करू लागली. भय निर्माण करणारं हे स्वरूप आणि उग्र ऊर्जा अग्नी निर्माण करत होता. सृष्टीचा काळ जवळ आला आहे, असे सर्व देवी-देवतांना वाटले. असूर संपून गेले, रक्तबीज संपून गेला होता, शुंभ आणि निशुंभ असुर देखील संपले. पण आता महाकाली शांत कशी होणार? त्रिदेव चिंतेत आले. माता महाकालीला देव आणि दानव यातला फरक अस्पष्ट झाला, कारण रक्तबीजच्या रक्ताबरोबर त्याच्या नकरात्मक आणि विध्वंसक उर्जेचं ग्रहण देखील मातेने केलं होतं. हे पाहुन सर्व देव भयभीत झाले आणि सर्व देवांनी महादेवाकडे धावा घेतला. महादेव ध्यानस्थ होते. त्यांना घडलेल्या संपूर्ण घटनेची कल्पना होती.

माता महाकालीची दिव्य ऊर्जा ही अनावर झाली होती. माता महाकाली आपल्या स्वतःच्याही नियंत्रणापलीकडे तामसी झाल्या होत्या. सर्व देवतांनी मातेला प्रार्थना केली. पण माता आपल्या पूर्वअवतारात येत नव्हत्या. शेवटी महादेवांनी स्वतःला मातेच्या समोर आणले आणि आपल्या ध्यानस्त नजरेने त्यांना आपल्या पातिव्रत्याचे स्मरण करून दिले. जिथे मातेचे तांडव सुरू होते. तिथे महादेवांनी आपले शरीर भूमीवर निद्रावस्थेत ठेवले. ताण्डव करता करता मातेचा एक चरण अचानक महादेवांच्या छातीवर आदळला गेला, क्षणासाठी सर्व स्तब्ध झाले. वातावरण जणु काही काळ थांबले. माता कालीची नजर महादेवांवर खिळली. तेव्हाच त्यांच्यातील पतिव्रता देवीगौरी जागृत झाली. आपल्याला शांत करण्यासाठी महादेवांनी आपले चरण आपल्या छातीवर घेतले, ही कल्पना माता गौरीला अतिशय दुःख देणारी होती. माता शांत झाल्या. त्यांना शांत अवतारात पाहुन अखंड ब्रह्मांड समाधानी झाले.

अशी ही माता कालीरात्रीची कथा….

— स्वाती पवार 

 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..