नवरात्रीमधल्या अष्टमीच्या दिवशी माता महागौरीचे पूजन केले जाते.
नवरात्रीमध्ये अष्टमी हा दिवस मातेची आराधना आणि होम-हवन यासाठी महत्त्वपूर्ण समजला जातो. या दिवसाला दुर्गाष्टमी असे देखील म्हणतात.
दुर्गामातेचा आठवा अवतार महागौरी मातेचा आहे. माता सतीने जेव्हा पर्वत कन्या पार्वती म्हणून राजा हिमालयाकडे जन्म घेतला, तेव्हा या जन्मी माता पार्वतीने अगदी लहानपणापासून महादेवाचे ध्यानपूजन केले. पुढे काही कालांतराने महादेवांना आपल्या जीवनामध्ये पतीस्वरुपात प्राप्त करण्यासाठी मातेने अतिशय अघोरी ध्यानधारणा धरली होती. हे ध्यान करत असताना अनेक नैसर्गिक आपत्तींना मातेला सहन करावे लागले. ऊन, पाऊस, वारा या सर्व ऋतूंचा लेप मातेच्या कायेने धरला होता. पण मातेने आपले ध्यान सुरूच ठेवले होते. त्यांच्या या अघोरी ध्यानावर महादेवांनी प्रसन्न होऊन मातेची प्रार्थना स्वीकारली. पूर्वजन्मामध्ये आपली अर्धांगिनी असलेल्या देवी सती यांना या जन्मात महादेव पार्वती म्हणुन स्वीकारतात. गंगेच्या पवित्र जलाने ते मातेची काया स्वच्छ करतात. त्यावेळी मातेची काया ही अतिशय तेजस्वी आणि कांतिमय होते. या गौरवर्णामुळे मातेचे शरीर अधिकाधिक सुंदर होते. तेव्हा त्यांच्या गौरस्वरूपावर प्रसन्न होऊन महादेव देवींना महागौरी असे म्हणतात.
— स्वाती पवार
Leave a Reply