वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो.
घर हे मांगल्याचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना किंवा मांडणी ठेवणं हे योग्यच. पण त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची जर मनं एकमेकांशी जुळलेली नसतील. तर कोणतीही रचना, कोणतीही ठेवण त्या घराचं मांगल्य टिकवणं हे मात्र कठीणच… वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते.
घर हे एक पवित्र मंदिराप्रमाणे असतं. कुठेही गेलो, कितीही दूर गेलो, पण परतून घरी आल्यावर एक वेगळेच समाधान मनाला मिळते. खूप शांत वाटते. अखंड प्रवासानंतर कुठेतरी निवांत थांबल्यावर जितकं बरं वाटतं, तितकंच बरं वाटतं. ही शांतता आपल्याच विचारांच्या कंपनांतुन निर्माण होत असते. जितके आपले विचार भटकतात, तितकंच समाधान लोप पावते. जितका आपल्या विचारांचा कलह वाढतो, तितकाच घरामध्ये क्लेश वाढतो. शांतता भंग पावते. आपल्याच विचारांमधून निर्माण झालेल्या कंपनांमधून कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ऊर्जा, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला घडवते. वाईट गोष्टींना भेदण्यासाठी, चांगल्या गोष्टींना बळ द्यावे लागते. ते मात्र आपल्याच प्रयत्नांत असतं. वास्तू तर फक्त तथास्तु म्हणते, मग तिथे मंगल घडो अथवा दंगल….
— स्वाती पवार
Leave a Reply