चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते.
एकदा असेच एका नगरामध्ये एक उदार मनाचा शूरवीर राजा रहात होता. त्याच्या सैन्यामध्ये एक बलाढ्य आणि युद्ध शिक्षणात निपुण असा हत्ती होता. या हत्तीमुळे राजाने अनेक युद्ध जिंकलेली होती. म्हणून हा हत्ती राजाला अतिशय प्रिय होता. पण आता हत्तीला आपल्या वाढत्या वयानुसार पूर्वीप्रमाणे कार्य शक्य नव्हते. म्हणून राजाने त्या हत्तीला युद्धापासून थोडे दूरच ठेवले आणि राजवाड्यात याची काळजी घेण्याचे ठरवले.
राजा अतिशय कृतज्ञ स्वभावाचा होता. राजाने त्या हत्तीच्या सेवेमध्ये कोणतीही उणीव ठेवली नव्हती. एकदा असेच आपल्या राजवाड्याबाहेर हत्तीला नदीकाठी हिंडण्यासाठी इतर हत्तींसोबत पाठवण्यात आले. खुप दिवसानंतर या हत्तीला बाहेर जाण्यास मिळाले होते. बाहेर गेल्यावर हत्तीने सर्व प्रथम नदीकाठी जाणारी दिशा पकडली. नदीकाठी आल्यावर आपल्या वयामुळे शारिरिक ऊर्जा कमी पडल्यामुळे हत्तीला आपला तोल सावरता आला नाही. आणि अचानक त्याचा तोल जाऊन तो हत्ती नदीमध्ये कोसळला. नदी मधून बाहेर येणे हत्तीला काही जमत नव्हते. राजवाड्यात ही बातमी समजल्यावर लगेचच राज्याच्या सैनिकांनीही नदीकाठी धाव घेतली आणि पाण्यातून हत्तीला काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण साऱ्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. राजालाही आपल्या प्रिय हत्तीची अतिशय चिंता होती. म्हणून राजा देखील तिथे उपस्थित झाला. सैनिकांनी हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुर केला. राजाने आपल्या सैनिकांना हत्ती बाहेर येईपर्यंत प्रयत्न सुरू ठेवायला सांगितले. पण सैनिकांच्या प्रयत्नांना यश मात्र मिळत नव्हते. बराच वेळ उलटला. दुपारची वेळही निघून जात होती. हळूहळू सायंकाळ झाली.
दूरवर एक ऋषीमुनी नदीकाठच्या पाउल वाटेने चालत येताना दिसले. राजाने त्यांना पाहिले आणि राजाला वाटले की त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच यावर मार्ग मिळेल. ऋषीमुनींना पाहून राजा त्यांच्या दिशेने चालू लागला. राजाने त्यांना आदराने वंदन केले. आणि त्यांना या प्रसंगावर मार्ग विचारला. ऋषीमुनींनी त्या हत्तीजवळ एक क्षण एकटक पाहिले. आणि त्यांना लगेचच समजले, की हा हत्ती युद्धसेनेमधला आहे. त्यांनी त्वरीत राजाला सनई-चौघडे घेउन यायला सांगितले. राजाला मात्र हे सर्व वेगळेच वाटले. पण कसेही करून हत्तीला नदीतून बाहेर काढायचे होते.
सनई-चौघडे आले. ऋषिमुनींनी राजाला युद्धाला जाण्यापूर्वी जे वातावरण असतं ते निर्माण कराण्यासाठी सांगितले आणि त्याचप्रमाणे राजाने आज्ञा दिली. सनई-चौघडे वाजू लागले. हत्तीच्या कानावर हा आवाज घुमताच, हत्तीने आपली शारीरिक हालचाल सुरु केली आणि हळूहळू स्वतः नदीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला. हत्तीच्या प्रयत्नांना यश आले, हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. राजालाही आश्चर्य वाटले, तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, “राजेहो, हा तुमचा हत्ती खूप काळ युद्धात होता, त्यामुळे त्या युद्धाच्या वातावरणाने त्याच्यामध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. त्याची आपल्या जीवनाबद्दलची एक नवी उमेद जागृत झाली आणि म्हणूनच तो स्वप्रयत्नाने बाहेर येऊ शकला”. यावर राजाने ऋषिमुनींचे मनापासुन आभार व्यक्त केले.
चैतन्य व्यक्तीमध्ये जीवनाशक्तीचा संचार करते.
— स्वाती पवार
Leave a Reply