संयम…हा प्रत्येक व्यक्तीच्या मनी असायला हवा. अधीर मन हे अस्थिर विचारांना जन्म देतं आणि अस्थिरता संयम नष्ट करते, धैर्य नष्ट करते, अशाच एका अधीर वृत्तीच्या व्यक्तीची ही कथा…
सदन… हा स्वभावाने अतिशय अस्थिर वॄत्तीचा असा युवक होता. सदन पदवीधर झाल्यानंतर पुढे करिअर बनवण्यासाठी त्याने अनेक मार्ग निवडले, पण कोणत्याही मार्गात तो यशस्वी होत नव्हता. कधी नोकरी तर कधी व्यापार… तो कशातच स्थिर होऊ शकला नाही. निवडलेल्या मार्गात जास्तीत जास्त एखादा महीना झाला की तो कंटाळुन जाई. एके दिवशी अचानक सदनचे काका त्याच्या भेटीसाठी आले. सदनचे काका एक यशस्वी व्यावसायिक होते. सदनचा हा अस्थिर स्वभाव त्याच्या काकांना माहितच होता. त्यांनी घरी येताना सदनला भेट म्हणून एक आंब्याची पेटी आणली होती. काकांना पाहून सदनला वाटले की. आपण आपल्या या सततच्या अपयशाबद्दल जर काकांशी बोललो तर नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. म्हणून दुपारच्या वेळी जेवणानंतर आंबे खात असतानाच सदनने आपला हा अपयशाचा विषय काकांसमोर मांडला. काकांनी त्याचे म्हणणे परिपूर्ण ऐकून घेतले आणि त्याच्यासमोरील खाल्लेल्या आंब्याच्या कोयींपैकी एक कोय देऊन म्हणाले, “सदन ही बी घे, आणि आपल्या बागेत जाऊन ती जमिनीमध्ये लावून ये. सदनने ती बी हाती घेतली आणि आपल्या अंगणात येऊन एका ठिकाणी योग्य पद्धतीने लावली. आणि लगेचच तो काकांजवळ आला. काकांना त्याने पुन्हा आपल्या करीअरबद्दल प्रश्न विचारला, त्यावर काका म्हणाले, “तू आधी पुन्हा जाऊन बागेत बघून ये पाहु, की त्या बी चे रोप उगवले आहे का? यावर सदनला थोडे आश्चर्यच वाटले, तो म्हणाला, “काका, बी लावून अर्धा तास देखील झाला नाहीये”, आणि लगेचच कसे काय रोप तयार होईल?” यावर काका हसले आणि म्हणाले “तु जा तरी… एकदा बघून तर ये,” सदनला हा प्रकार वेगळाच वाटला. पण त्याने जाऊन बागेत पाहिले आणि पुन्हा तो घरामध्ये आला. आणि काकांना म्हणाला, ‘मी म्हणालो होतो ना काका?, लगेचच कसे काय रोप तयार होईल आणि काका तुम्ही मला माझ्या या अपयशाबद्दल सांगणार होतात ना?” यावर काका म्हणाले, “असे कसे काय शक्य आहे सदन, आता तू एक काम कर, ती बी तिथून काढून, बागेमधल्या एका दुसऱ्या ठिकाणी पेर बघू, सदनने ते सुद्धा केले आणि सदन घरी आला, आता काका म्हणाले, “सदन मी जरा काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो. आपण तुझ्या विषयावर संध्याकाळी नक्कीच चर्चा करू. दुपारची वेळ अशीच निघून गेली.
संध्याकाळ झाली. सदन काकांची वाट पाहत बसला होता. थोड्यावेळाने काका घरी आले. घरी आल्यानंतर काकांनी पुन्हा एकदा सदनाला त्या बागेत जाऊन रोप उगवले आहे का, ते बघायला सांगितले. सदनला काहीच समजत नव्हते, काका त्या एकाच विषयावर थांबुन होते. काकांची ही वेगळीच वागणूक काहीशी विचित्र वाटली. पण तरीही सदन पुन्हा नाराजीने बागेत गेला आणि रागात येऊन म्हणाला, “अहो, काका, इतक्या लवकर हे सर्व कसे काय शक्य आहे.” पण यावर काका म्हणाले. “सदन, तू आता शेवटचे एक काम कर, आता ती कोयच बदली करून दुसरी लाव. म्हणजे रोप नक्की लवकर येईल. यावर सदन म्हणाला, “अहो काका, कोणत्याही रोपट्याला तयार व्हायला थोडा वेळ लागतो, त्याला वेळेनुसार खत-पाणी द्यावे लागते, त्याची काळजी घ्यावे लागते. त्याची निगा राखावी लागते, असे लगेचच कसे काय शक्य आहे”. यावर काका हसले आणि म्हणाले, “हेच तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे, तुलाही निवडलेल्या मार्गामध्ये संयमाने मेहनत घ्यावी लागेल. एखाद्या विषयावर स्थिर व्हावे लागेल. म्हणजे नक्कीच तुला तुझे यश मिळेल. सदनला काकांचे म्हणणे अगदी मनापासुन पटले.
अधीर वृत्ती ही कधीही ध्येय निश्चित करू शकत नाही. म्हणून आत्मसंयम हा हवाच. जीवनामध्ये स्थिरता आणि धैर्य असणं हे फार महत्वाचे आहे.
— स्वाती पवार
You are just fabulous mam .
Your writing plays an important role in my life .
Your writing guide me how to live and all that.
Hope you will always write in this manner.