संघर्ष हा धगधगत्या अग्नीप्रमाणे असतो. त्यातून पोळून निघालेले व्यक्तिमत्व हे सदैव इतरांसाठी आदर्श ठरते. जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष एक नवीन अनुभव देऊन जातो आणि अनुभवातून मिळते ती सुंदर जीवन जगण्याची कला..
जीवनामध्ये वेगवेगळे पडाव असतात. जर सुखाच्या पायऱ्या कृतज्ञता आणि नम्रतेने तर दुःखाच्या पायऱ्या संयमाने चढल्या की जीवनामध्ये आलेला प्रत्येक संघर्ष हा सोयीस्कर होऊन जातो. संघर्ष हा अघोरी तपस्येप्रमाणे आहे. ज्यामुळे आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं. संघर्षामुळे आंतरिक शक्ती आणि क्षमता या दोन्ही गोष्टींची वाढ होते.
या विषयाला स्पष्ट करणारी एक परिचित अशी बोधकथा…
एका खेडेगावामध्ये, एक शेतकरी फार कष्टाने शेती करत असे. त्याच्याजवळ मर्यादित अशी उपजऊ जमीन होती. ती कसून तो धान्य पीकवी आणि आपला उदरनिर्वाह करत असे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही शेतकर्याने अशीच मेहनत केली. पण यावेळी अतिवृष्टी झाली आणि त्याचं अखंड शेत उद्ध्वस्त झालं. हे सर्व पाहुन त्याला अतिशय दुःखही झालं. पण त्याहीपेक्षा त्याचा क्रोध अति झाला आणि तोही सॄष्टीवर आणि सृष्टीच्या निर्मात्यावर…. आपल्या झालेल्या नुकसानाचे दोष तो देवाला देऊ लागला. कळत नकळत त्याचे बोलणे अनावर झाले आणि शेवटी एक परमेश्वर शक्ती त्याच्यासमोर अवतरीत झाली. त्याने या शक्तीकडे पाहिले आणि म्हणाला, हे शक्ती, तुम्ही हे काय अघटीत घडवलं की माझ्या संपूर्ण कष्टाचा चिखल झाला. माझी मेहनत वाया गेली. आता मला आणि माझ्या कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागेल. दिवस-रात्र केलेले माझे श्रम वाया गेले. यावर ती देवता म्हणते, मी सृष्टी आहे, मी आपल्या नियमानुसारच कार्य करत राहणार. यामुळे तू खचून जाऊ नकोस. तू पुन्हा मेहनत कर. दुःख विसरून जा, उठ आणि नव्या उमेदीने कार्य सुरू कर. पण शेतकऱ्याला हे बोलणे अजिबात पटत नाही. शेतकरी म्हणतो की, “मी मेहनत करेन, पण पुन्हा हे असेच घडले तर… तर मला हे अजिबात सहन होणार नाही, म्हणून तुम्ही हे ऋतूंचे नियोजन माझ्या मनाप्रमाणे घडवावे, अशी माझी इच्छा आहे. सॄष्टीदेवतेला हे मान्य होते, ” ठीक आहे, पण हे नियोजन तू फक्त तुझ्या शेतापुरतेच करू शकतोस”, हे ऐकून शेतकरी आनंदित होतो आणि नव्याने कार्य करण्यासाठी तत्पर होतो. आपल्या शेतात यापुढे शेतकरी ऋतूंचे नियोजन स्वतःच्या मनाप्रमाणेच करी, शेतकऱ्याच्या इच्छेनुसार पाऊस पडत असे, त्याच्या इच्छेनुसारच ऊन आणि त्याच्या इच्छेनुसारच थंडी पडे. वादळ, झंजावात, विजा, कडाक्याची थंडी आणि अतिवृष्टी यांपासून शेतकऱ्याने आपल्या शेताचे खूप संरक्षण केले. आपल्या शेतामध्ये या गोष्टी शेतकर्याने होऊच दिल्या नाहीत. कालांतराने भरघोस पीक उगवले. गव्हाच्या ओंब्या तकतकीत दिसत होत्या. शेतकऱ्याला फार आनंद झाला. पीक कापणीच्या वेळी शेतकर्याला स्वतः केलेल्या ऋतू नियोजनाबद्दल मनोमन अभिमान वाटत होता. साऱ्या शेताची कापणी जेमतेम पूर्णच झाली होती. पण अचानक शेतकऱ्याला लक्षात आले, की या बाहेरुन तकतकीत दिसणार्या गव्हाच्या ओंब्यामध्ये दाणेच नाहीत. हे पाहुन त्याला अतिशय आश्चर्य वाटते. थोड्यावेळासाठी तो विचारांनी सुन्न होतो. पण यावेळी त्याच्या आजूबाजूच्या शेतात मात्र भरघोस पीक उगवलेले असते.
शेतकरी यावेळी पुन्हा दुखी होतो आणि पुन्हा सॄष्टीदेवतेचे स्मरण करतो. त्याची आर्त हाक ऐकुन देवता त्याच्यासमोर उभी राहते. शेतकरी म्हणतो, “हे देवते, मी इतके सुंदर नियोजन करून देखील हा असा परिणाम मला का मिळाला?” त्यावर देवता म्हणते, की या पिकांनी संघर्ष पाहिला नाही म्हणुन…. कारण संघर्षामुळेच क्षमता निर्माण होते. वादळ, अतिवृष्टी यांपासून त्यांना तु दूर ठेवलेस. म्हणूनच त्यांना ऊर्जा कमी मिळाली आणि यातुन हा असा परिणाम निघाला. शेतकर्याला सॄष्टीदेवतेचे हे बोलणे अगदी मनापासुन पटते आणि त्याला आपली चूकही समजून येते.
म्हणुनच संघर्ष हा अघोरी ध्यानतपस्येप्रमाणे आहे. ज्यामुळे आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं. संघर्षामुळे आंतरिक शक्ती आणि क्षमता या दोन्ही गोष्टींची वाढ होते.
— स्वाती पवार
Leave a Reply