बंधनातून मुक्त करणारे ज्ञान म्हणजेच खरी विद्या.
संस्कृत मध्ये “विद्” म्हणजे ग्रहण होणे, आकलन होणे. ज्यामुळे आपली आकलन बुद्धी वाढते ती साधना म्हणजेच विद्या.
रोग, दुःख, क्रोध, पाप, बेरोजगारी, अभाव, दारिद्र्य, अज्ञान आणि गैरवर्तन यांसारख्या काळोखातुन म्हणजेच अनेक बंधनातून मुक्त करते, प्रकाशाची दिशा दर्शवते, तीच खरी विद्या…विद्या ही मानवाच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवते. मानवाला उच्च दर्जाची वर्तणूक शिकवते.
आजच्या काळात राबवल्या जाणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या तुलनेत, प्राचीन काळात राबवली जाणारी शिक्षण प्रणाली अतिशय भिन्न होती आणि विद्येतुन विद्वान घडवणारी होती. विद्या ग्रहण करणारे शिष्य गुरुंजवळ कोणतेही साधन घेऊन जात नसे, गुरूंकडून वदली जाणारी वाणी ही कोणत्याही वहीवर नव्हे तर मनावर बिंबवली जायची. त्यासाठी नाही कोणती लेखणी होती आणि नाही कोणाशी स्पर्धा. खरेतर स्पर्धेमुळेच विचारांवर बंधने निर्माण होतात आणि असे ईर्ष्येसोबत भय निर्माण करणारे विचार कित्येक नकारात्मक गोष्टींना जन्म देतात, ज्यामुळे व्यक्ती, मुक्ती देणाऱ्या ज्ञानापासून दूर राहते.
विद्या ही संस्कारमय आहे आणि मनावर बिंबवले गेलेले संस्कारच आपल्याला बंधनमुक्त करतात.
— स्वाती पवार
Leave a Reply