जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला यश मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते.
सफलता ही अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही संकट विरहित असू शकत नाही.
गावा-गावामधल्या राना-वनात तयार झालेली एक छोटीशी पाउलवाट ही हजारो पावलांनी प्रवास केल्यानंतरच तयार झालेली असते. गायकाने केलेला अखंड रियाज गायकाच्या कंठाला आकार मिळवून देतो आणि सुमधुर संगीत निर्माण होते. खूप प्रयत्न केल्यानंतरही एखादी परीक्षा होते आणि मग त्या परीक्षेला निर्भयपणे स्वीकारले की, सर्वकाही योग्य असेच घडते.
एकदा असेच, श्री ब्रह्मपुत्र नारद मुनी सृष्टीतलावर एका जंगलामधून विहार करत होते. त्या जंगलामध्ये एक युवक तपस्या करीत होता. विचलित लक्ष असलेल्या त्या युवकाने नारदमुनींना पाहिले आणि त्यांना हाक मारली. नारदमुनींनी त्याच्याकडे पाहिले आणि नारद मुनी त्याच्याजवळ गेले, त्या युवकाने नारदमुनींना आदराने वंदन केले आणि विचारले की मुनिवर मी कित्येक दिवस येथे तप करतोय, आत्म-ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण अजुन काही मला तो मार्ग दिसला नाही. कृपा करून मला सांगावे की, मला आत्मज्ञान कधी प्राप्त होईल. तेव्हा नारद मुनी म्हणतात, “महाशय, आपल्याला अजून चार जन्म असेच प्रयत्न सुरू ठेवावे लागतील, मग नक्कीच तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल, हे ऐकून युवक म्हणतो, “काय?, अजून चार जन्म….” युवकाचे असे उद्गार आणि निराश चेहरा पाहून, नारद मुनी तिथून निघून जातात.
त्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर, आणखी काही वेळ चालल्यानंतर, नदिकडल्या वाटेने स्नान करुन आलेला एक शिष्य त्यांना भेटतो. तो आदराने नारदमुनींना वंदन करतो आणि विचारतो मुनिवर मला आत्मज्ञान प्राप्त करायचे आहे आणि त्यासाठी मी काय करायला हवे. तेव्हा मुनिवर तिथल्याच जवळ असलेल्या एका वृक्षाकडे बोट दाखवून म्हणतात, “ते पहा, त्या वृक्षाला जितक्या फांद्या आहेत ना… तितके जन्म तु प्रयत्न केल्यानंतरच तुला आत्मज्ञान प्राप्त होईल. हे ऐकुन शिष्य खूप आनंदित होतो आणि म्हणतो. “मला फार आनंद झाला आहे, या अखंड परिसरामध्ये या वृक्षाला इतर वृक्षांच्या तुलनेत फार कमी फांद्या आहेत, म्हणजे मला लवकरच आत्मज्ञान मिळेल”, हे ऐकून नारदमुनी त्यावर प्रसन्न होतात आणि लगेच आपल्या आशीर्वादाने त्या शिष्याला आत्मज्ञानाचा मार्ग दर्शवतात.
इथे शिष्याला आपल्या अखंड प्रयत्नांच्या आशावादाचे फळ मिळते. तो अनेक जन्म प्रयत्न करण्यासाठी तयार असतो आणि कोणतीही गोष्ट, कोणताही विचार, त्याच्या अखंड प्रयत्नांना खंडित करत नाही. पण दुसरीकडे तो युवक मात्र लगेचच हताश होतो. भय बाळगुन आपले प्रयत्न सोडुन देतो.
म्हणजेच यश हे अखंड प्रयत्नांनी साध्य होते. यश हे अनेक प्रयत्न आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षेतून मिळत असते. सहजासहजी प्राप्त होणारा मार्ग हा आपल्याला आपल्या ध्येयाकडे कधीही पोहोचवू शकत नाही आणि ध्येयाकडे नेणारी योग्य ती वाटचाल ही कधीही संकट विरहित असू शकत नाही.
— स्वाती पवार
Leave a Reply