नवीन लेखन...

निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्‍यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा…

एक भजन-कीर्तन करणारे विद्वान संत होते. ते वेगवेगळ्या गावी जाऊन अध्यात्माचे पठण करीत असे. त्यांच्या मधुर वाणीने आणि सदविचाराने लोक भारावून जात असत. या संतबुवांमुळे अनेक गावातील लोक सदाचारी आणि सुखी झाले होते.

एके दिवशी एका गावात या संतबुवांचे किर्तन अगदी रंगात आलेले होते. इतक्यात एक माणूस अगदी घाईगडबडीने संतांजवळ आला आणि त्यांचे चरण धरून म्हणाला, “संतबाबा, “मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला माझ्या वाईट सवयीतून मुक्त करा. संतबुवा यावर म्हणतात, “अरे मी कोण आहे, तुला वाचवणारा, आपल्या सर्वांची काळजी तर तो परमेश्वर घेतो. यावर तो मनुष्य म्हणतो, “असे म्हणू नका संतबुवा, मला या गोष्टीची चांगली माहिती आहे की, तुम्ही अनेकांना जगणं शिकवलं आहे, मार्ग दाखवला आहे, असाच मार्ग मलादेखील दाखवा. अनेक गावांमध्ये मी तुमचं नाव ऐकलं आहे. त्या माणसाचं हे बोलणं ऐकून संतांचा जवळचा शिष्य त्या माणसाला म्हणाला, “तुम्ही हे सांगा पाहू की, काय काम आहे तुमचं? कोण आहात तुम्ही? आणि कुठून आला आहात?” त्यावर तो माणूस म्हणतो, “मी डाकू आहे. शेजारच्या गावामध्ये राहतो. पण मी माझ्या जीवनाला फार कंटाळलोय. लोकांच्या घरी लूटमार केलेल्या संपत्ती मधून मला अजिबात सुख लागत नाही.” हे ऐकून संत विचारात पडतात आणि म्हणतात, “अरे…तुला जर तुझ्या दुष्कर्मांची एवढी जाणीव आहे तर मग तुझी अडचण काय आहे? यावर तो डाकू म्हणतो, “मला हे सर्व सोडून द्यायचं आहे. साधं आयुष्यं जगायचं आहे, आणि ते कसं जगू, ते मला सांगा” तेव्हा संतबुवा म्हणतात, तु जे पण काही दुष्कर्म करतोस ते आजपासून करणार नाही असं तुझ्या मनाशी ठरव, ते एकदा का मनाशी ठरवलंस तर तू कोणतेही दुष्कर्म करणार नाहीस. जे पण काही करशील ते चांगलेच करशील. त्यानंतर संत गावोगावी जाऊन नेहमीप्रमाणे प्रवचन देतच राहिले. काही दिवसानंतर पुन्हा तो मनुष्य संताजवळ आला आणि म्हणाला,”काही उपाय झाला नाही पहा, मी मनाशी ठरवलं पण तरी या हातांना चोरीची सवयच झाली आहे, मला चोरीची सवय सोडायची इच्छा आहे, पण मार्ग काही सापडत नाही. तुम्हीच मला दुसरा उपाय सांगा संत बुवा, जेणेकरून माझ्यामध्ये बदल होईल.” तेव्हा संत म्हणतात, “असं म्हणतोस, मग ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या हातांना चोरीची सवयच झाली आहे असं म्हणतोस ना?” मग तू तुझं काम करीत राहा, यावर तो डाकु नवलाने म्हणतो, “म्हणजे? चोरीच करत जाऊ? संत म्हणतात, “होय… पण तू केलेल्या चोरीची यादी माझ्या प्रवचनामध्ये येऊन ऐकवायची, म्हणजे तू सुखी होशील आणि तुला बैचेनीही लागणार नाही. डाकु हे आनंदाने मान्य करतो आणि तिथून निघून जातो. बरेच दिवस निघून जातात.

तो डाकु “मी माझी दुष्कर्म तुम्हाला सांगत जाईन”, असं म्हणाला होता खरा, पण त्यानंतर तो संतांजवळ एकदाही आला नव्हता. मग अचानक संतांच्याच एका शिष्याला त्याची आठवण झाली. म्हणून तो शिष्य संतांना म्हणाला, “गुरुमहाराज, तो डाकू तर पुन्हा कधी आलाच नाही आपल्याकडे, याचा अर्थ त्याच्यावर आपला काहीच परिणाम झालेला नाही हे खरे… यावर संत म्हणतात, “त्याच्यावर परिणाम झाला आहे, म्हणूनच तो आला नाही. यावर शिष्य म्हणतो, “म्हणजे? मला काहीच समजले नाही, त्यांने चोरी सोडली असावी का?” संतबुवा म्हणतात, “अर्थातच, त्याने चोरी सोडलीच असली पाहिजे, कारण त्याला चोरीची सवय सोडायचीच होती, त्याला यापासून मुक्तीही हवी होती, आणि त्यासाठी तो प्रयत्नशील देखील होता, त्याला फक्त मार्ग हवा होता, की चोरी करण्यापासून तो कसा मुक्त होऊ शकेल.” यावर शिष्य म्हणतो, “पण तुम्ही तर त्याला तुझं काम करतच रहा आणि मला येऊन सांग”, असं म्हणाला होतात”, यावर संत म्हणतात, “चोरी करणं फार सोप्पं होतं पण त्याची प्रामाणिकपणाने मनापासून प्रत्येकवेळी कबुली देणे हे मात्र त्याच्यासाठी फार अवघड झाले होते. हेच नेमकं त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि केवळ सत्कर्म करत असल्यामुळे मला येऊन ते सांगायची गरज नाही, हे ही त्याला कळले म्हणूनच त्याची आणि आपली भेट झाली नाही.”

काही दिवसानंतर संत नेहमीप्रमाणे एका दुसर्‍या गावात भजन करीत होते. कीर्तन करीत होते. त्यावेळी त्याच गावात राहणारा तो डाकू संतांच्या भेटीसाठी आला. त्यांने संतांचे चरण धरले आणि म्हणाला. “महाराज, आता मी खरोखर सुखी झालो. तुमच्यामुळे मी वाईट मार्गातून बाहेर आलो, आज कष्ट करतोय आणि आनंदाने जगतोय.” हे ऐकून शिष्याने संतबुवांना मंद स्मित हास्य दिलं.

— स्वाती पवार

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

1 Comment on निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..