नवीन लेखन...

निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. अलौकिक प्रसिद्धी आणि भरपूर पैसा या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे चालून येत होत्या. त्यामुळे कुठेतरी या दोन्ही गोष्टींबद्दल त्याला अभिमान तर होताच पण अहंकार देखील वाढत चालला होता. त्याची इतरांशी बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदलत जात होती.

एकदा अचानक एके दिवशी राजमहालातील राजगुरू त्याला वाटेतून घरी येताना दिसले. इंद्रजीतने त्यांना अगदी उद्धटपणे हाक मारली, “काय हो राजगुरू… खूप दिवसांनी नगरात दिसलात, कसे आहात? आणि काय म्हणतंय आपल्या राज्याचे भविष्य? त्यावर राजगुरू हसतात आणि म्हणतात, “इंद्रजीत, राज्याच्या भविष्याची जबाबदारी राजाने घेतलेलीच आहे, त्यासाठी आपल्याला चिंता नसावी. आपण बोला, आपण कसे आहात? यावर इंद्रजीत म्हणतो, “माझं सर्व सुंदरच चाललं आहे. तुम्हाला माहीतच आहे राजगुरू… फक्त मला हे सांगा की अजून किती पुरस्कार मला मिळणार आहेत भविष्यात,” असे बोलून इंद्रजीतने आपला हात अगदी गमतीने राजगुरूंना दाखवला. राजगुरु पाहतात, यावर विचार करतात, जर याला इतकी घाई आहे तर आपणही का सांगू नये, राजगुरू इंद्रजीतचा हात आपल्या हाती घेतात आणि क्षणभर पाहातच असतात. त्यावर इंद्रजीतला पुन्हा हसू येते. तो म्हणतो काय झालं राजगुरू? असंख्य पुरस्कार पाहून तुम्ही गडबडलात वाटते. राजगुरू शांतपणे म्हणतात, “नाही, इंद्रजीत फक्त इतकेच ध्यानात ठेव की कधीही अहंकार करू नकोस. इंद्रजीतला यावर ही हसू येते आणि तो म्हणतो, “राजगुरू, तुम्ही मला माझं भविष्य सांगा, माझ्या स्वभावाचे गुण मी तुम्हाला विचारले नाहीत”. असे ऐकून देखील राजगुरू त्यावर रागवत नाहीत. ते जितके होईल तितके प्रयत्न करून त्याचे भविष्य सांगायचे टाळतात. ते म्हणतात, “इंद्रजीत, हे लक्षात ठेव की, आपल्या स्वभावाच्या आणि सवयीच्या गुणधर्मानुसारच आपल्याकडून कर्म घडत असते. आणि त्या कर्माचा परिणाम आपले भविष्य घडवते. पण इंद्रजीतला मात्र आपले भविष्य ऐकायचेच असते. तो म्हणतो, “राजगुरू, तुम्ही मला माझे भविष्य फक्त सांगा, हे इतर पुराण मला ऐकायचे नाहीये,” शेवटी राजगुरूंना खरे ते सांगावेच लागते. ते म्हणतात, “इंद्रजित, तू आजपासुन फक्त जास्तीत जास्त ९० दिवस जगू शकतोस. तुझे जीवन तुला ९० दिवसच सोबत देईल. त्यानंतर तुला मृत्यू घ्यायला येईल”.

हे ऐकून इंद्रजीतला धक्काच बसतो. कारण राजगुरूंचे आधीचे सिद्धांत खरे ठरलेले असतात. अखंड राज्यात त्यांना त्यांच्या ज्ञानाबद्दल खूप मोठा मान आहे हे ही इंद्रजीत ला माहित होते. राजमहालामध्ये देखील राजाने त्यांना त्यांच्या ज्ञानामुळेच उच्च स्थान दिले होते. त्यामुळे त्यांनी केलेली भविष्यवाणी कधी मिथ्या होईल याचा विचार देखील इंद्रजीतच्या मनाला स्पर्श करीत नाही. राजगुरू तिथून निघून गेलेले असतात पण इंद्रजीत मात्र खोलवर विचारात गेलेला असतो. तो विचार करत करत घरी येतो. त्याचे कशातच मन लागत नाही. विचारांमुळे त्याचे नेहमीचे जीवनकर्म देखील विस्कळीत होते. आपल्या आवडत्या कलेत, मुर्त्या घडविण्यात देखील मन रमत नाही. काही दिवस असेच निघून जातात. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचते. तो मनाशी ठरवतो. आज आपण मृत्यूच्या विचारांनी विस्कळीत झालो आहोत. जर या मृत्युलाच आपण फसवले तर….! म्हणून उरलेल्या ऐंशी दिवसांमध्ये तो दिवस रात्र मेहनत करून आपल्यासारख्याच दिसणार्‍या हुबेहूब आणि जिवंत वाटणार्‍या अशा पन्नास मुर्त्या घडवण्याचा निर्णय घेतो. म्हणजे जेव्हा मृत्यू त्याला घ्यायला येईल तेव्हा काही क्षणासाठी का असेना खराखुरा इंद्रजीत कोण या विचाराने नक्कीच स्तब्ध होईल आणि त्याच्या मृत्यूची वेळ टळून जाईल.

“मी माझ्या कलेने मृत्यूलाही मात देईन” अशा अहंकारी विचाराने तो आपले प्रयत्न सुरू करतो. दिवसांमागुन दिवस सरतात. इथे मुर्त्या घडत असतात. तर तिथे इंद्रजीतचा अहंकार दिवसेंदिवस वाढत जात असतो. शेवटी पन्नास मुर्त्या तयार होतात. वेगवेगळ्या क्रिया करत असतानाची प्रत्येक मूर्ती तयार होते. आणि प्रत्येक मुर्ती अगदी हुबेहूब आणि जिवंत वाटत असते.

शेवटचा नव्वदावा दिवस उजाडतो. आज आपल्या घरी आपल्या कलेमुळे मृत्यू देखील फसेल, अशा विचाराने इंद्रजीत देखील त्या मुर्त्यांमध्ये स्वतः एक ठराविक स्थिती घेऊन मूर्तीप्रमाणेच स्तब्ध उभा राहतो. मृत्यूसमय जवळ येताच त्याच्या घरी यमराजांची स्वारी प्रकट होते. पण यमराज काही क्षणासाठी पाहतच राहतात. आणि कोणत्या मूर्तीत श्वास आहे हे देखील ओळखतात पण इंद्रजीतच्या अहंकाराला नष्ट करूनच आपण आपले कार्य पार पाडायचे असे ठरवतात म्हणून ते अगदी मुद्दामहुन मोठ्या स्वरात बोलतात, “व्वा….सुरेख्….खुपच अप्रतीम….सर्व मुर्त्या अगदी सुंदर आणि हुबेहुब आहेत” इंद्रजीत हे सर्व ऐकत असतो. आनंदाने त्याचे डोळे चमकतात आणि लगेचच त्यावर यमराज म्हणतात, “अरेरे… हे काय! या मूर्तीमध्ये तर प्राणच नाहीत, असे भासते. इतर मूर्तींपेक्षा ही मूर्ती अगदी निर्जीव का वाटते?… हे ऐकून इंद्रजीतचे हावभाव बदलतात आणि त्याला आपल्या कलेतली शोधलेली ही उणीव सहन होत नाही. न राहवुन तो लगेचच आपल्या स्थितीमधून बाहेर येतो आणि म्हणतो, “कुठे काय कमतरता आहे यात? सर्व काही योग्यच घडवले आहे”. हे पाहुन यमराज जोरजोरात हसू लागतात व म्हणतात,”तू आपल्या अहंकारामुळे देवांनाही फसवण्याचा विचार केलास इंद्रजीत आणि स्वतः त्यात फसलास. अहंकाराला कधीही चुकीची कबुली नसते आणि म्हणूनच मी मुद्दामहुन चूक शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुला ती सहन झाली नाही. कारण अलौकिक यश प्राप्त केल्यामुळे तुला त्याचा गर्व झालेला आहे आणि तोच गर्व तुझ्या मृत्यूचे आज कारण ठरले आहे. असे बोलून यमराज त्याचे श्वास हरून घेतात….

— स्वाती पवार 

 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..