संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. पण त्याला परिसा भागवत म्हणून ओळखले जायचे. जसे संत नामदेव विठ्ठलाचे भक्त होते, तसे भागवत माऊली रुक्मिणीचा भक्त होता. श्रीविठ्ठल मंदिरामध्ये जाऊन तो माता रुक्मिणीची मनापासून पूजा-अर्चना करीत असे. त्यानंतर तिथेच बसून तो ध्यानस्थ होत असे आणि मग भजन करून, नैवेद्य दाखवून, घरी येई. घरी आल्यावर संसार, प्रपंच आणि नेहमीचा दिनक्रम सुरू करी. पण या प्रपंचामध्ये देखील भागवत माऊलीचे विस्मरण होऊ देत नसे. भागवत क्षणोक्षण माऊली रखुमाईचे चिंतन करण्याचा प्रयत्न करी. पण रोजच्या त्याच्या संसारामध्ये त्याचे ध्यान एकाग्रतेने होत नसे. याची त्यालाही मनापासुन जाणीव होती म्हणून त्याला मनोमन याची खंतही वाटे. असाच एकदा देवळामध्ये असताना भागवत माऊलीचे स्मरण करता करता त्याचे एकाग्रतेने ध्यान लागले.
ध्यानावस्थेत माऊली रखुमाईने भागवताला दर्शन दिले. त्याच्यावर कृपा केली आणि म्हणाली, “भागवता, बाळ ऊठ, मी तुझ्यासमोर उभी आहे. मला सांग, तुला काय हवे माझ्याकडून?” तेव्हा माऊलीचा स्वर ऐकून भागवताने आपले डोळे उघडले. त्याला अतिशय आनंद झाला. परमानंदात विरघळून गेलेल्या भागवताला माऊलीकडे पाहून अतिशय भरून आले. त्याचे अश्रू अनावर झाले. ते खूप काही बोलून गेले. तरीही त्यावर भागवत म्हणाला, “माऊली मला तुमची अखंडित भक्ती करता यावी याच्यापलीकडे मला अजून दुसरे काही नको,” पण किती काही म्हटले तरी भक्ताच्या मनातले त्याच्या दैवताशिवाय अधिक कोण जाणू शकेल. माऊलीला भागवताच्या अडचणी परिपूर्ण माहिती होत्या. शिवाय या जगाचा व्यवहार कोणत्या गोष्टीवर चालतो हे साक्षात या देवी धनलक्ष्मी जाणत होत्या. तिथल्या वास्तवाची मातेला जाणीव होती. म्हणून माऊलीने भागवतला एक परीस दिला. आणि हसुन म्हणाली, “आता तुझ्या ध्यानधारणेत व्यत्यय नाही ना येणार भागवता?” असे बोलून माऊली अंतर्ध्यान पावली. भागवताने नमस्कार केला आणि अतिशय आनंदाने तो घरी जायला निघाला. परमानंदात भिजलेला भागवत आता व्यवहारिक आनंदाने सुद्धा न्हाऊन निघाला होता.
घरी आल्य-आल्या त्यांने देवळामध्ये घडलेला हा चमत्कार आपल्या पत्नीला कमळजाला सांगितला. परीसही दाखवला. हाती आल्या आल्या दोघांनी परिसाचा प्रयोग लहान-सहान लोखंडी वस्तूंवर करून देखील पाहिला आणि पाहताच क्षणी त्यांचे सोने झाल्याचे देखील पाहीले. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. भागवत जितका निष्ठावान भक्त होता. तितकाच तो नम्र होता. तो आपल्या पत्नीला आणि स्वतःला सावध करीत म्हणाला, “कमळजा आपल्याकडे परीस आहे, हे कोणालाही कळता कामा नये. कोणालाही सांगू नकोस. आपण पंढरपुरात राहतो. ही सज्जन संतांची भूमी आहे. त्यांना जर हे कळलं की भागवताने माऊलीला प्रसन्न करुन, माऊलीजवळ मागून मागून तरी काय मागावे तर परिस….. आणि जरी मी म्हणालो की, माऊलीने प्रसन्न होऊन मला परिस दिला आहे तरी देऊन देऊन माऊलीने काय द्यावे तर परीस…. आणि यामुळे माझ्या पूर्वजांच्या संस्कारांना गालबोट लावल्यासारखे होईल. म्हणून गरीबा सारखे गप्प राहिलेले बरे. आता भागवताची दिनचर्या नेहमीपेक्षा अधिक उत्साहाने सुरू झाली. घरात वावरताना एक वेगळाच आनंद आणि बाहेर वावरताना मात्र निपचित पडलेला चेहरा घेऊन भागवत आणि कमाळजाचे दिवस सुखासमाधानाने चालले होते. अंगावरची वस्त्रे ही जुनीच होती. पण त्या वस्त्रांमागे तूपा-लोण्याचे जेवण घेऊन तुकतुकीत झालेली कांती मात्र लपत नव्हती. काहीना ते भक्तीचे तेज वाटे तर काही चाणाक्ष निरीक्षक आणि परीक्षकांना मात्र याची जाणीव होती की भागवताकडे कोणते तरी मोठे सुख धावून आले आहे. त्यांना भागवताची उदासीनता ही खरी वाटत नव्हती. असेच दिवसांमागे दिवस सुखासमाधानाने चालले होते.
एके दिवशी भागवताची पत्नी कमळजा नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला तिथे संत नामदेवांची पत्नी राजाई भेटली. कमळजाला पाहताच राजाईने हाक दिली आणि म्हणाली, “अगं कमळजा जरा थांब हा, मी आलेच ही घागर भरून. मग आपण संगतीनं घरी जाऊ. कमळजा थांबली. राजाई नदीवरून घागर भरून आली. चालता-चालता दोघींच्याही आपापल्या संसाराच्या गोष्टी सुरु झाल्या. राजाईचे लुगडे साधेच होते आणि खाणं-पिणं ही बेताचच, म्हणून कमळजानं तिला अगदी निरखून पाहिलं आणि म्हणाली, “अगं राजाये, खरं-खरं सांग हा, कसं चाललंय तुझं? तू सुखी तर आहेस ना? संसार सुखाचा होतोय ना? आनंदाने नांदत तर आहेस ना? आपल्या शेजारीणशी आणि जिवाभावाच्या मैत्रिणीपासून कधी काही लपवू नकोस गं, राजाई यावर कोरडीच हसली आणि म्हणाली, “अगं लपवायचं काय त्यात? जे दिसत आहे तीच परिस्थिती आहे, तुला तर सर्वच ठाऊक आहे. आमचे धनी विठ्ठलाच्या भजन भक्तीत रंगलेले आणि त्यातच गुंगलेले, ते तल्लीन असल्यामुळे व्यापार आणि व्यवसायाकडे पाहिजे तेवढे लक्ष जात नाही गं.. त्यामुळे सर्व काही चाललयं आपलं अगदी साधेपणानं आणि काटकसरीनं…. तू सांग आता, तुमचं कसं चाललंय?” यावर कमळजा जरा उत्साहानेच सांगू लागली. अगं, आमचे हे रुक्मिणीचे भक्त. ते माऊली रखुमाईची भक्ती करतात. त्यामुळे आमचं बरं चाललंय. पुन्हा दोघेही पुढे पाऊल वाट धरून चालू लागल्या.
थोडया वेळाने पुन्हा कमळजा बोलली, अगं ज्या झाडाला ना पान, ना फळ, ना फूल, त्या झाडाला काय व्यर्थ शिणावे. अगं राजाई, मला सांग पाहु, जो सोयरा लग्न, उत्सवातही आहेर देत नाही. त्याला कोणी बोलावतं का ग? पंढरीनाथाचे एवढे मनोभावे भजन कीर्तन करून देखील आपल्या भक्ताची पोटापाण्याची अडचण दूर करू शकत नाही, अशी भक्ती काय कामाची? कमळजा राजाईला इतकं सर्व बोलली पण तरी कमळजेच्या मनात राजाईबद्दल माया होती. प्रेम होतं. कमळजाचं घर जवळ आलं. ती राजाईला म्हणाली, “राजाये, जरा थांब हा… मी येतेच आतून..कमळजा आत जाऊन परीस घेऊन आली. आणि राजाईला दाखवून ती म्हणु लागली, “हे बघ, हा परीस आहे… माझ्या नवऱ्याने रुक्मिणीची खूप भक्ती गेली. आणि ती माऊली प्रसन्न झाली. तिने हा परीस आम्हाला दिला. हा परीस तू घे. तुझ्या सर्व अडचणी दूर कर. आणि तुझी गरज भागवून घे. मग लगेचच तो मला आणून दे.. हे बघ आपल्या दोघांच्याही नवर्यापैकी कोणा एकालाही या गोष्टीची कल्पना येऊ नये. याची मात्र आपण काळजी घेतलीच पाहिजे. कितीही काहीही झालं तरी परीस मात्र आठवणीने आणून दे..
राजाई भान हरपून गेली. तिला फार आनंद झाला.. तिने तो परीस हाती घेतला आणि आपल्या घरी निघून आली. घरी आल्यावर राजाईने लहान-सहान गोष्टींना परीस लावुन पाहिला, लगेचच त्याचे सोन्यात रुपांतर झाले, घरी असलेल्या सुया, कात्र्या, किल्ल्या सोन्याच्या केल्या. आणि त्यातील काही मोजक्या वस्तू सोनाराकडे घेऊन तिने धन घेतलं. ते घेऊन ती वाण्याच्या दुकानात गेली. घरात लागणारं तेल-तिखट, मीठ-पीठ अशा सर्व गरजेच्या गोष्टी घरी घेऊन आली. सोबत स्वतःला आणि नवऱ्याला काही कपडे देखील घेतले.. घरी आल्यावर सर्व जेवण अगदी उत्साहाने तयार केलं. केर कचरा काढून नवी साडी नेसून राजाई अंगणामध्ये संत नामदेवांची वाट पहात बसली…
थोड्याच वेळात तिथे नामदेव आले. हात-पाय स्वच्छ करून जेवायला बसले. अन्नपूर्णा मातेला नमस्कार केला. विठ्ठलाचे नामस्मरण केले आणि जेवणातले काही अधिक पदार्थ बनवलेले देखील पाहिले, लगेचच त्यांनी संपुर्ण घराकडे नजर फिरवली. काही नव्या गोष्टी घरात आलेल्या दिसल्या. राजाईकडे पाहीले. तेव्हा तिने नेसलेली नवी साडी सुद्धा त्यांच्या नजरेत आली.. त्यांनी लगेचच तिला प्रश्न केला. अगं राजाये या सर्व गोष्टींची सोय तू कुठुन केलीस? इतकी सामग्री घरात आली तरी कशी? पण त्यावर राजाई मात्र गप्पच… नामदेवांनी पुन्हा विचारले. तेव्हा कुठेतरी राजाईने कसेतरी इकडून-तिकडून, वळणं-वळणं घेत सांगायचा प्रयत्न केला. पण नामदेवांना काही पटायला तयार नाही. ते म्हणाले, हे बघ, खरं काय ते अगदी स्पष्टपणे सांग. नाहीतर मी जेवणार नाही. असे बोलल्यावर राजाईने अगदी रडवेला चेहरा करून सर्व काही सांगितले की “माऊली रखुमाईने भागवत भाऊंच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना एक परिस दिला आणि कमळजाने आपली मैत्रीण म्हणून तो परीस, आपली गरज पुर्ण होण्यासाठी, फक्त आजच्या दिवसासाठी तो मला दिला. अहो तुम्ही लहानपणापासून पांडुरंगाची भक्ती करत आहात, भजन कीर्तन करत आहात. नामस्मरण करत आहात. ध्यान-चिंतनात देखील असता, पण तरीही आपल्या घरामध्ये खाण्यापिण्याची योग्य सोय नाही. अंगावर कपडा नाही. आपली कोणतीही गरज आपल्या इच्छेप्रमाणे भागत नाही. आपल्यावर पांडुरंगाची कृपा नाही, मग असली भक्ती काय कामाची? कितीही शांत असले तरी या वाक्यावर मात्र संत नामदेवांना अतिशय राग आला. तरीही ते काहीशी शांतता घेऊन म्हणतात, “अगं राजाये, आपण त्यांची भक्ति करतो हेच आपले सौभाग्य. आपला जन्म त्यांच्या भक्तीसाठी आहे. त्यांच्या नामस्मरणासाठी आहे. हेच आपलं सौभाग्य. अजून दुसरं काय हवं आपल्याला.. लोखंडाचे सोने करणारी ही असली किमया आपल्या काय कामाची..बघू दाखवू मला तो परीस”. आता राजाईने तो परिस अगदी भीत नामदेवांच्या हाती दिला. नामदेव चटकन उठले आणि सरळ चंद्रभागेच्या दिशेने चालू लागले. नामदेव नदीजवळ आले आणि हातातला परिस त्यांनी अगदी सरळ नदीमध्ये भिरकावून लावला.
राजाई मागून धावत धावत येत होती. ओरडत होती. म्हणत होती की ,अहो जरा थांबा, माझं ऐकुन तर घ्या, तो परीस मला कमळजानं दिला आहे, तिला तो परत द्यायचा आहे. तो तिला दिला पाहिजे. तिने माझ्या गरजेपोटी तो मला दिला होता. माझ्यामुळे तिला शिक्षा भोगावी लागेल. ती अडचणीमध्ये येईल. आणि इथे मात्र नामदेव परीस नदीमध्ये सोडून विठ्ठलाच्या समोर असतात. आपल्या बालपणीच्या सवयीनुसार विठ्ठलाशी बोलू लागतात, म्हणतात, की “विठ्ठला, पांडुरंगा, माझ्या श्रीरंगा, मला असा मोह कसा झाला, मोह मला नाही झाला असं तरी मी कसं म्हणू, राजाई म्हणजे पण मीच ना? आम्ही दोघं वेगळे नाही विठ्ठला, तिला मोह झाला याचा अर्थ हा मोह मलाच झाला. इथे संत नामदेवांचे संभाषण सुरुच होते. तर तिकडे घरी भागवत आपल्या नेहमीच्या जागी परिस शोधत होता. तिथे त्याच्या हाताला तो परिस लागला नाही. डोळ्यांनाही दिसला नाही. अगदी अधीर मनाने भागवताने आपल्या पत्नीला, कमळजाला विचारले, की “तो परिस घेतला होतास का गं? नेहमी इथेच ठेवतो मी, मग आज कुठे गेला, असे अनेक एका मागोमाग एक प्रश्न ऐकल्यावर कमळजेने खरे काय ते सांगुन टाकले. त्यावर भागवत म्हणाला, अगं तो परीस आहे, कोणता साधा दगड नव्हे. आणि असं कसं तु मला न विचारल्याशिवाय कोणाला दिलास? आता ती येण्याची वाट न बघता लगेचच तिच्या घरी जाऊन तू स्वतःहून तो परीस घेऊन ये आपल्याकडे.
कमळजा धावत धावत राजाईच्या घरी आली. राजाई घरी नव्हती… दूरवर राजाई धावत धावत चंद्रभागेच्या दिशेला जाताना दिसली. हे पाहून कमळजाने राजाईला हाक मारली, राजाई कमळजाचा आवाज ऐकून तिथेच थांबली. तिने मागे वळून पाहिले. कमळजा घाबरली. राजाई का रडतेय, हे असे सर्व पाहून कमळजाने तिच्या जवळ धाव घेतली. राजाईने सर्व घडलेली घटना कमळजाला सांगितली. कमळजा रडू लागली. आता दोन्ही संतांच्या पत्नी रडत रडत नदीपाशी का निघाल्या, हे पाहून आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे इतर लोकही त्यांच्या मागोमाग नदीपाशी निघाले. ‘नामदेवाने भागवताचा परीस चोरला’, ‘नामदेव भागवताचा परीस घेऊन पंढरपूर सोडून गेला’, ‘नामदेवाने भागवताचा परीस लपवून ठेवला आहे’ अशा अनेक नाना तर्हेच्या बातम्या लोकांमध्ये पसरल्या आणि ही बातमी भागवताने देखील ऐकली. म्हणून तोही नदीकडे धावत आला. नामदेव विठ्ठलाचे नामस्मरण करत नदीपाशी बसले होते. लोकांमधून धाव घेऊन भागवताने नामदेवांना पाहिले आणि दुरूनच तो नामदेवांना म्हणाला, “अरे नामदेवा कसली ही खोटी भक्ती करतोस, माझा परीस घेतलास आणि इथे भक्तीचा देखावा करतोस, माझा परिस माझ्या हाती दे, नामदेवा, हे बरे केले नाहीस तू? हे ऐकून काही लोक नामदेवांना दुषणे देऊ लागली, म्हणू लागली’ बघा बघा भक्तीच्या नावाने किती भोंदू असतात, तर काही म्हणू लागले एकीकडे परिसाची चोरी आणि दुसरीकडे विठ्ठलाचे भजन…. किती हा देखावा तर काही लोकं भागवताला दोष देऊ लागले, म्हणू लागले, हा नेहमी उदास आणि पडलेला चेहरा दाखवणारा भागवत परीस लपवून बसला असेल, असे वाटले नव्हते. परमार्थाच्या नावाखाली केवढा मोठा हा खेळ या दोघांचा. हे सर्व ऐकून देखील नामदेव मात्र शांत होते.
पण भागवताने ठसकावुन विचारले, “नामदेवा, कुठे आहे माझा परीस, त्यावर संत नामदेव म्हणाले, परीस… परिस माझ्या काय कामाचा, मी तो नदीमध्ये फेकून दिला. यावर भागवत म्हणाला, “जर तुझ्या कामाचा नव्हता तर माझा मला परत द्यायचा होतास, नदीमध्ये फेकायची काय गरज होती? यावर संत नामदेव म्हणाले “भागवता तू स्वतःला विरक्त आणि संसारामध्ये आसक्ती नसल्यासारखे दिन उदासीन असल्यासारखे दाखवत होतास, आणि गुपचूप व्यवहार करत होतास, हे सर्व का? कशासाठी? मी तुझा परीस हा नदीमध्ये टाकून दिला आहे. तु तो नदीमधुन शोधून घे. यावर भागवत म्हणाला, “तुम्ही टाकलात आणि आता शोधायचा आम्ही, तुम्हीच मला माझा परीस आणून द्या, यावर संत नामदेवांनी थोडाही विचार न करता नदीच्या तळाशी उडी घेतली. तिथली ओंजळभर माती आणि वाळू, दगड ते काठाशी घेऊन आले. “हे घे भागवता, बघ यामध्ये आहे का तुझा परीस? भागवत रडू लागला. त्यात परीस नव्हता. भागवत म्हणाला, “अरे या वाळू, दगड, रेती मध्ये कुठे मला माझा परीस सापडणार, पण तरीही उत्साह संचारलेला तिथल्या जमलेल्या काही लोकांनी संधी मात्र सोडली नाही. त्यांनी लगेचच खिशातल्या किल्ल्या, तर कोणी दातकोरणं, तर कोणी जवळ असलेला अडकित्ता अशा लहान सहान लोखंडी वस्तू नामदेवांच्या ओंजळीतल्या दगड, माती, रेती, आणि वाळूला लावून पाहिल्या, बघतात तर काय? लगेचच त्या सगळ्या वस्तू क्षणात सोन्याच्या झाल्या. आनंदाने गोंधळ उडाला. लोकांना आश्चर्य वाटले.
नामदेवांना अपशब्द वापरल्यामुळे त्यांना त्याची लाजही वाटू लागली. भागवतही हे पाहून आश्चर्य चकित झाला आणि नामदेवांच्या चरणाशी नमस्कार घालून तसाच पडुन राहिला. नामदेवांना म्हणाला, “महाराज, माऊलीने प्रसाद म्हणून दिलेल्या परिसाचा मी मोह धरला, मी तुमच्यावर रागावलो, पण तुमचा हा हातच परीस आहे. तुम्ही साक्षात परीस आहात. तुमच्या कृपेचा हात माझ्या मस्तकी सदैव ठेवा. जेणेकरून माझं आयुष्य समाधानी होईल, तिथे असलेल्या सर्वांनी संत नामदेवांची माफी मागितली, नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. आणि परिसा भागवताने मात्र संत नामदेवांची गुरुकॄपा म्हणुन जीवनप्रवासात सदैव साथ मागितली.
— स्वाती पवार
Leave a Reply