नवीन लेखन...

निरंजन – भाग ४९ – घाव शिल्पकाराचे

एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची….

एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. मंदिराचे बांधकाम हे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही व्हावी. या बद्दल सर्वांचच एकमत झालं आणि कामाला सुरुवात झाली.

मंदिराचं बांधकाम एकीकडे सोपवण्यात आलं. तर दुसरीकडे एका शिल्पकाराकडे श्री गणेशांच्या मूर्तीचे काम देण्यात आले. या शिल्पकाराचं नाव होतं विदुर. विदुर हा शिल्प घडविण्यात अतिशय पारंगत होता. पाषाणातून एक जागृत आणि बोलक्या डोळ्यांची जिवंत प्रतिमा उभी करणं हे विदुरचं एक वेगळच वैशिष्ट्य…. पण हे वैशिष्ट्य साध्य करी ते केवळ ध्यानामुळेच… विदुर हा ध्यानस्थ गुरूंचा शिष्य होता. ध्यानगुरूंकडून विदुरने कित्येक वर्षे ध्यान-ज्ञान आत्मसात केले होते. म्हणून तो प्रत्येक शुभकार्यासाठी सहजरीत्या ध्यान लावी आणि त्यातून यश मिळवत असे. म्हणूनच प्रत्येक मूर्ती विदुर ध्यान लावून घडवत असे. त्याच्या या ध्यानामुळेच पाषाणाला ही जागृत अवस्था मिळे.

या मंदिरात असलेली पूर्वीची श्रीगणेशांची मूर्ती देखील विदूरच्या पूर्वजांकडूनच कोरण्यात आली होती. म्हणूनच जशीच्या तशी हुबेहूब मूर्ती घडवणं हे विदुरलाच शक्य आहे. असा गावकऱ्यांचा ठाम विश्वास होता. पण विदुरला शिल्प कोरण्यासाठी इतर शिल्पकारांपेक्षा काहीसा अधिक कालावधी लागेल, याची सुद्धा गावकऱ्यांना जाणीव होती. आणि हे मान्यही होते. कारण मंदिर नव्याने उभं करण्यासाठीही तितकाच कालावधी लागणार होता.

इथे नव्याने मूर्ती कोरण्यासाठी मोठ्या दगडाची आवश्यकता होती. म्हणून विदुरने काही दिवसातच मूर्ती घडविण्यासाठी लागणारा एक मोठा दगड शोधून काढला आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा ठराविक पटीने लहान असा दुसरा दगड शोधून काढला. मोठा दगड हा साक्षात श्री गणेशाची मूर्ती घडविण्यासाठी होता तर लहान दगड हा मूषकाची  मूर्ती घडविण्यासाठी होता.

थोडाही वेळ न घालवता विदुर ने आपले काम हाती घेतले. मूषकाची मूर्ती बऱ्यापैकी लवकर होईल, या विचाराने विदुरने सर्वात प्रथम लहान दगड निवडला आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे लहान दगड समोर ठेवला. आणि त्यावर ध्यान लावले. ध्यान लावल्यानंतर विदुरने दगडाशी बोलून त्याला कोरण्यासाठी त्याची अनुमती मागितली. लहान दगडाने होकार दिला. विदूरने आपले काम सुरू केले. विदूर प्रत्येक मूर्ती घडवताना आपली नेहमीची एकच लहानशी चिनी आणि हातोडी वापरत असे. आपल्या हलक्या हाताने दगडाला कोरत असे. जेणेकरून त्या दगडांमध्ये प्राण आहेत.

विदुरने सुरुवात करायला घेतली तोच त्या लहान दगडाला लगेच वेदना व्हायला लागल्या. विदुर थोडं थांबला आणि पुन्हा त्याने थोड्यावेळाने सुरुवात केली. पुन्हा त्या दगडाला वेदना व्हायला लागल्या. शेवटी विदुरला त्या दगडाने स्पष्ट सांगून टाकले की, “अरे बाबा, मला सोड, मला नको कोरूस. कोण या अवजारांचा घाव सोसेल, मला ते काही जमणार नाही, जिथून तू मला आणलंस. पुन्हा मला तिथेच नेऊन ठेव. मला या असहाय्य वेदना नकोत, मला जाऊदे परत त्याच जंगलात….!

विदुरने हे सर्व शांतपणे ऐकले. आणि त्याने या लहान दगडाला एका बाजूला ठेवले. तो तसाच उठला आणि काहीही उत्तर न देता मोठ्या दगडाजवळ गेला. आपल्या रोजच्या सवयी प्रमाणे काही वेळ ध्यान लावले. शुभ संकेत ऐकले आणि आपल्या शुभ कार्याला सुरुवात केली. मोठा दगड खूप आनंदी होता. वेदना या सारख्याच होत्या. मोठा दगड हा आकाराने मोठा असल्यामुळे त्याला अधिक वेदना सहन कराव्या लागणार होत्या. पण यासाठी त्याची तयारी होती. या वेदनांचा त्याला स्वीकार होता. जमिनीतून मोत्यासारखे दाणे तेव्हाच उगवतात, जेव्हा ती जमीन नांगराचे घाव सहन करते. प्रत्येक ऋतूंचे परिणाम सहन करते. याची त्या दगडाला परिपूर्ण जाणीव होती म्हणून या दगडाला विदुरचे घाव सहन होत होते.

कित्येक महिने या दगडावर कोरीव काम सुरू होते. पण त्या दगडाने आपली सहनशक्ती वेळेनुसार वाढवली होती. सहन करण्याची क्षमता वाढवली होती. बघता बघता इकडे मंदिर उभे राहिले. दीड वर्षे कधी निघून गेली कळलेच नाही. मंदिराचं बांधकाम फार सुंदर झालं होतं. आता गावातल्या सर्वांना यात स्थापित होणाऱ्या मूर्तीचं विशेष कुतूहल होतं. गावातल्या काही मुख्य लोकांनी काही जणांना विदूरच्या घरी मूर्ती घडविण्याचे शिल्पकाम कितपत पूर्ण झाले हे पाहण्यासाठी पाठवले. त्याचप्रमाणे चार-पाच जण तिथे मूर्ती कितपत पूर्ण झाली आहे हे पाहण्यासाठी आले. विदुरने त्यांचे आदरातिथ्य केले. आणि मूर्तीला दाखवून म्हणाला, “अजून चार-पाच दिवस मला द्या, काम पूर्ण होतच आले आहे.” त्याच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक होकार देऊन तिथून निघून गेले.

विदुरने मूषकाची मूर्ती कोरली नव्हती, म्हणून श्रीगणेशांच्या मूर्तीच्या चरणी त्याने मूषकाचे रूप घडविले आणि चार-पाच दिवसातच मूर्तीला परिपूर्ण केले. पाच दिवसांनी विदुरच्या सांगण्याप्रमाणे गावकरी लोक विदुरच्या घरी आले. आणि सोबत गाडी देखील घेऊन आले. कारण श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत वाजत-गाजत न्यायची होती. विदुरने मूर्ती गावकऱ्यांना सोपवली. गावकऱ्यांनी मूर्तीला पाहिले. सर्वांना मनोमन फार आनंद झाला. अगदी हुबेहूब पूर्वीच्या मूर्तीचेच स्वरूप घडविलेले होते. त्या सर्वांनी श्री गणेशांच्या मूर्तीला नमस्कार केला. आणि आदराने उचलून ती मूर्ती गाडीमध्ये ठेवली. मूर्तीच्या मागेच मूषक कोरण्यासाठी आणलेला लहान दगडही त्यांना दिसला. त्यांच्यातल्याच एकाने तोही उचलला. आणि मंदिरात याचा काहीतरी उपयोग करू, या विचाराने तोही गाडीमध्ये ठेवला.

श्री गणेशांची मूर्ती मंदिरापर्यंत आली. गावकऱ्यांनी मिळून मूर्तीला गाभाऱ्यामध्ये स्थापित केले. मंदिराच्या पूजाऱ्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पूजा-अर्चना केली. आरती केली. सर्वांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. तोच त्यातल्या त्यात एकाच्या लक्षात आले की, आपण गाडीमधून आणलेला एक लहान दगड जर येथे ठेवला तर नक्कीच नारळ फोडण्यासाठी त्याचाही उपयोग होईल….. त्याने लगेचच जाऊन तो दगड मंदिरात आणला आणि बाजूला ठेवून दिला. आता प्रत्येक जण त्यावर नारळ फोडू लागला. या दगडाला आधीच वेदना सहन होत नव्हत्या आणि त्यात अजून या वेदना…. तो फार रडू लागला.

हळूहळू भक्तांची गर्दी कमी झाली आणि मध्यान होताच पुजाऱ्यांनी गाभार्‍याचे दार लावून घेतले. तोच लहान दगडाने मोठमोठ्याने हंबरडा फोडला. तो खूप मोठ्याने रडू लागला. आणि श्री गणेशांच्या मूर्तीकडे पाहून तो म्हणाला. जर त्यावेळी मी ही त्या शिल्पकाराचे घाव सोसले असते, तर आज माझीही जागा वेगळी असली असती आणि मी इथे पडून राहिलो नसतो. माझी आरती झाली असती, ओवाळणी झाली असती, पूजा-अर्चना झाली असती, नैवेद्य दाखवला गेला असता, मलाही फुलांनी सजवले गेले असते, पण हे सर्व मी गमावले कारण तेव्हा मी सहन केले नाही. त्यामुळे आता या मोठ्या दुःखाला मला सामोरे जावे लागतेय.

कधीकधी खूप कमी वेळ दुःख सहन करून, अनंत काळापर्यंतचा आनंद मिळवता येतो….

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..