घडवलेली रचना, तयार केलेली आकृती, काढलेला आराखडा …. म्हणजे कल्पना ….
कल्पकता ही आपल्यामध्ये आहेच पण तीची जागरूकता मात्र आपल्याला नसते. ही काल्पनिकता आधी आपल्याकडे इच्छा स्वरूपात जन्मलेली असते आणि मग तीला आपण वाढवतो ते कल्पना तयार करुन. कल्पनेमुळेच इच्छेचे स्वरूप कळुन येते.
कोणतेही कार्य सुरु करण्यापुर्वी त्या गोष्टीची कल्पना ही मनामध्ये तयार करावी लागते, तेव्हाच आपण ती गोष्ट प्रत्यक्षात साकार करु शकतो. जसे एखाद्या कागदावर चित्र काढण्यापुर्वी त्या चित्रकाराच्या मनात आधीच आपल्या चित्राची आकृती तयार असते, रंग तयार असतात, म्हणूनच रंग छटेतुन आपल्याला चित्रकाराच्या मनातल्या भावना समजुन येतात, त्यातील गुढता, त्यातले रहस्य समजते. चित्रकाराला नेमके काय सांगायचे आहे ते समजुन येते. मूर्तीकाराच्या मनात मुर्ती तयार करण्यापूर्वीच त्या ठराविक मूर्तीचा जन्म हा झालेला असतो, ज्या मुर्तीला मुर्तीकाराने आधीच आपल्या मनात घडवलेले असते. त्या मुर्तीमध्ये जिवंतपणा येतो ते मुर्तीकाराच्या कल्पनेवर असलेल्या ध्यानभक्तीमुळेच…… घरं बांधणाऱ्या गवंडीला आधीच आपल्या वास्तूचा आराखडा सांगावा लागतो, सुताराला देखील आधीच आपल्याला हव्या असलेल्या नक्षीकामाची कल्पना द्यावी लागते. तसेच लेखकाला आणि कवीकाराला देखील कल्पनेच्या विश्वात रमल्याशिवाय काहीच सुचत नाही. अश्या या कल्पनेचे विश्व हे फार मोठे आहे जे कोणतेही कार्य घडवून आणण्यासाठी आधी जाग्रुत करावेच लागते.
विश्वनिर्मितीसाठी साक्षात त्रिदेवांनी देखील सर्व प्रथम कल्पना रचवीली होती आणि मग सुंदर अशा या सृष्टीचा जन्म झाला. आई जगदंबेने सुद्धा गणेशांना घडवण्याआधी एका सुंदर गोजिरवाण्या गणुबाळाची कल्पना केली आहे आणि आपल्या सर्वांना आपले बाप्पा प्रथम पुज्यनीय आहेत. श्रीरामांनी देखील माता सितेला रावणाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लंकेला जाणाऱ्या सेतुची कल्पनाच केली होती. अश्या या कल्पनेतुनच अनेक कार्यांमध्ये सिद्धी मिळाली आहे. सिध्दी प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनेवर ध्यान लावणे फार गरजेचे आहे….
म्हणूनच जीवनामध्ये कल्पनेवर ध्यान असणे खुप महत्त्वाचे आहे. आणि हे नियमितपणे केलेल्या ध्यानातुनच कळुन येते. ध्यानामुळेच कल्पनाभक्ती वाढते.
— स्वाती पवार
मराठी सृष्टी सलाम