लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा…
रात्रीचं चांदण….. आणि यांमध्ये लोभस दिसणार चंद्राचे स्वरूप….. या सुंदर वातावरणातच एकदा वैकुंठामध्ये श्रीहरी आणि त्यांच्या अर्धांगिनी माता लक्ष्मी, खूप छान गप्पा करीत होते. गप्पागोष्टी करता करता विषय खूप सुंदर रंगले. या विषयांमध्ये सृष्टीचा विषय मात्र खूपच रंगला. या विषयांमध्ये श्रीहरी आणि माता लक्ष्मी खूप आनंदात होते. श्री हरीचे चरण हाती असतानाच माता लक्ष्मीच्या मनात एक कल्पना सुचली. त्यांना वाटले की, आज आपण श्रीहरींची थोडीशी गंमत करूया. म्हणून सृष्टीकडे म्हणजेच पृथ्वीकडे ध्यान देत देत माता लक्ष्मी श्रीहरींना हसत हसत म्हणाल्या, “प्रभू, तो पहा पृथ्वीवर, तो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला भटोबाबुवा असं म्हणतात. तो ब्राह्मण स्वभावाने अतिशय कंजुष आहे. पण तो ब्राम्हण माझा खूप मोठा भक्त आहे. त्याची माझ्यावर खूपच भक्ती आहे. तो अजिबात लोभी नाही. पण ही गोष्ट श्रीहरी ना कुठेतरी मनाला न पटण्यासारखी वाटली. या त्यांच्या मनोमनी उद्भवलेल्या भावनेला माता लक्ष्मी ओळखत देखील होत्या म्हणुनच त्या मुद्दामहुन सुचवतात की, श्रीहरींनी त्या लोभ नसलेल्या भटोबाची एखादी परीक्षा घ्यावी. त्यांनी भटोबाकडून फक्त दहा रुपये आणावे. अशी इच्छा त्या श्रीहरींजवळ प्रकट करतात. श्रीहरी देखील या भटोबाची परीक्षा घेण्याचे ठरवतात. आणि पहाटे पहाटे पृथ्वीवर ब्राम्हण रूपामध्ये जाण्याचे ठरवतात.
पृथ्वीतलावर असलेला भटोबा मात्र पहाटे समुद्रकिनारी आंघोळीसाठी आलेला असतो. श्रीहरी त्या भटोबाला दुरूनच पाहतात. काही वेळाने नुकतीच अंघोळ करून बाहेर आल्यावर, श्रीहरी भटोबाला अडवतात आणि म्हणतात “महाशय, “तुम्ही माझे दहा रुपये दयायचे बाकी आहात. अचानक समोर येऊन कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या कडून दहा रुपये मागत आहे, याचे या भटोबाला फार आश्चर्यकारक वाटते. थोड्या वेळासाठी भटोबा विचारच करीत बसतो. म्हणून पुन्हा ब्राह्मणाच्या रुपामध्ये आलेले श्रीहरी त्या भटोबाला पुन्हा एकदा तेच म्हणतात, की “तुम्ही माझे दहा रुपये द्यायचे बाकी आहात, महाशय” यावर भटोबा श्रीहरिंना विचारतो, की “कसले दहा रुपये? यावर श्रीहरी म्हणतात, तुम्ही या समुद्रात अंघोळ केलीत, म्हणून दहा रुपये, कारण हा समुद्र माझा आहे”. इथल्या वातावरणाचे सेवा ही मी घडवितो. भटोबा हे सारं ऐकून तर घेतो. पण दहा रुपये देण्याचा विचार देखील त्या भटोबाच्या मनात येत नाही. कारण भटोबा हा स्वभावाने फार कंजूस असतो. पैसे देण्याचे टाळण्याच्या विचारांमध्ये भटोबा काहीतरी निमित्तं देण्याचा विचार करतो. भटोबा श्रीहरी ना म्हणतो. पहाटेच्यावेळी आंघोळीसाठी येताना मी काही इथे आणले नव्हते, त्यामुळे तुमचे पैसे मी आता देऊ शकत नाही. यावर श्रीहरी म्हणतात “ठीक आहे, तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन चला आणि मग द्या. त्या भटोबाला त्यांची चिकाटी समजते पण पैसे मात्र अजिबात घ्यायचे नसतात. म्हणून भटोबा म्हणतो की, “आता मी जरा घाईत आहे, पण नंतर तुम्ही माझ्या घरी येऊन घेऊन जा” यावर श्रीहरी हसतात आणि म्हणतात कि ठीक आहे. श्रीहरींनाही त्या भटोबाची वेगवेगळी निमित्तं ही कळतच असतात. आणि त्याची पैसे न देण्याची जिद्द सुद्धा समजत असते. पण माता लक्ष्मींसोबत लावलेली पैज ही लक्षात येत असते आणि म्हणुन कसेही करून दहा रुपये मात्र घेऊन जायचेच असतात.
काही वेळाने भटोबा घाईघाईने आपल्या घरी पोहोचतो आणि घरी गेल्यागेल्या आपल्या पत्नीलाही घडलेल्या या प्रकाराबद्दल सर्व काही सांगतो. पत्नीला सुद्धा आश्चर्य वाटते. पण आपण मात्र दहा रुपये देण्यापासून वाचलो आणि आपली सुटका मात्र झाली. या गोष्टीचा तो भटोबा खूपच आनंद घेत असतो. थोड्याच वेळात दरवाजावर कोणीतरी ठोकावते. भटोबा दचकतो आणि दहा रुपये मागण्यासाठी तर कोणी आले नसेल ना?, या विचाराने तो अतिशय संशयित होतो आणि दरवाजा न उघडताच, आधी हाक देऊन आतून आपल्या पत्नीला बोलावतो आणि तिला म्हणतो, “बघ शारदे, दरवाजा उघडून कोण आले आहे आणि जर का तो ब्राह्मणच आपले दहा रुपये घेण्यासाठी आला असेल तर मात्र मी झोपलो आहे असे निमित्तं दे” आणि कसेही करुन त्याला इथुन परत पाठवून दे, असे सांगून भटोबा आपल्या आतल्या खोलीत जाउन झोपण्याची सोय करतो. श्रीहरींना त्याची ही सारी क्रिया मनोमनी कळत असते आणि या गोष्टीचा ते सुद्धा फार आनंद घेत असतात. भटोबाची पत्नी शारदा दरवाजा उघडते आणि पाहते तर काय? ….
समुद्रावर आपल्या पतींकडून दहा रुपये मागणारे ब्राह्मण आपल्या घरापर्यंत आलेले आहेत. याचे पत्नीला देखील खूप मोठे आश्चर्य वाटते. पण भटोबाने सांगितलेले कारण देऊन ती त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न मात्र करते. पण ब्राह्मणरूप घेऊन श्रीहरीदेखील त्यांच्या पत्नीला म्हणतात, “ठीक आहे, ते जागे होईपर्यंत मी त्यांची वाट पाहतो. त्यांना तिथपर्यंत निवांत झोपु द्या. पत्नी लगेचच आपल्या आतल्या खोलीत जाते. झोपेचे सोंग घेतलेल्या भटोबाला हे सर्व सांगायची गरज नसते, कारण त्याने बाहेर घडलेला सर्व प्रकार आपल्या कानांनी अगदी लक्षपूर्वक ऐकलेला असतो.
पत्नी जेव्हा आपल्या खोलीत येते तेव्हा भटोबा हळूच तिच्याशी संवाद साधतो आणि तिला म्हणतो, “शारदे, आता मला कोणतीतरी वेगळीच युक्ती करावी लागणार आहे, भटोबाची पत्नी मात्र यागोष्टीला सहमत नसते. ती त्याला समजावते देखील पण कंजूस भटोबाला समजावणार कोण? तो अजिबात पत्नीचा ऐकायला तयार होत नाही. उलट तो आपल्या पत्नीलाही या सोंगामध्ये सहभागी करून घेतो. तो तिला म्हणातो, “शारदे, हा ब्राहमण घरातुन जायला ही तयार नाही. आणि आपले दहा रुपये सुद्धा सोडायला तयार नाही. आणि या ब्राह्मणाला इथून पळवण्याचा आता एकच शेवटचा उपाय शिल्लक आहे आणि तो म्हणजे, मला हे जग सोडुन जाण्याचेच सोंग करावे लागणार, हे जर त्याला कळले की मीच आता हयात नाही तर मात्र तो नक्की इथुन निघुन जाईल. आणि त्यामध्ये तू माझी परिपूर्ण साथ दे.” यावर पत्नी पण नाइलाजाने सहकार्य करते. कारण आपला कंजुष नवरा भटोबा आणि बाहेर थांबलेले चिकट ब्राहमण अश्या दोघांमध्ये ती विना़कारण गेलेली असते. कुठेतरी हे प्रकरण थांबावावे असे तिलाही वाटते. आतल्या सर्व गंमती ब्राह्मणरूप घेतलेल्या श्रीहरींना बाहेर समजत असतात. पण तरी त्या ब्राह्मणाकडून श्रीहरींना दहा रुपये मात्र घेऊनच जायचे असते. म्हणून ते झोपचे सोंग घेतलेल्या भटोबाची बाहेर वाट बघत असतात. ब्राह्मण काही बाहेर येत नाही पण त्याची पत्नी मात्र येते आणि अगदी भटोबाने सांगितल्याप्रमाणे रडत रडत सांगते की, “माझे पती आता हयात नाहीत. ते हे जग सोडुन गेलेत.
श्रीहरींना याचे आधीच कल्पना होती. हे सर्व आधीच कळलेलं असतं आणि आच्छर्य सुद्धा झालेलं असतं. पण तिथून निघून जाण्याचे सोडुन श्रीहरींनी देखील आपली युक्ती लावाली. तेही मोठ्या तिव्रतेने यावर दु:खं व्यक्त करतात. आणि अगदी गांभीर्याने म्हणतात, “हे असे अचानक कसे काय घडले. या दु:खाच्या प्रसंगी मी इथुन निघुन जाणे म्हणजे मानवता नसल्यासारखे होईल, मी आज शेवटपर्यंत इथेच थांबेन, आपल्याला आता आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाही सांगावे लागेल. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना देखील सांगा. कारण आता अंत्यविधी झाल्यावरच मी इथुन निघेन”. असे म्हणून अखंड आजूबाजूच्या परिसरामध्ये ही बातमी श्रीहरी घरोघरी सांगतात.
भटोबाचा सर्व खेळ पाण्यात जातो. भटोबाची पत्नी हे सर्व घरातूनच पाहतच बसते आणि जिथे एक संकट संपत नव्हतं तिथे दुसरं सुरु होत होतं. भटोबा मात्र पुर्वीप्रमाणेच श्वास रोखून सोंग धरुन झोपलेला असतो. अजिबात पैसे देण्याचा विचार देखील करत नाही. आजुबाजुची लोकं घराभोवती जमु लागतात. एकमेकांशी चर्चा करु लागतात. आणि इथे श्रीहरी मात्र अंत्यविधीची तयारी सुरू करु करतात. पण भटोबा अजिबात सोंग सोडायला तयार होत नाही, हळूहळू तयारी पूर्ण होऊ लागते. आजूबाजूचे जमलेले लोक सुद्धा तयारीसाठी हातभार लावतात. त्यांची देखील एकमेकांशी चर्चा ही सुरूच असते की अचानक असे कसे झाले? भटोबाला मात्र काही चिंता नसते. एक मात्र चिंता असते की मी जर हे सोंग सोडले तर मात्र नक्कीच मला दहा रुपये द्यावे लागणार, म्हणून भटोबा आहे त्या स्थितीत राहूनच सर्वकाही जाणून घेत असतो. शेवटची विधी सुरू होते. लोक त्याचा देह खांद्यावर उचलतात आणि आपल्या खांद्यावर घेऊन स्मशानभुमीच्या मार्गी चालु लागतात. इतर लोक अंत्यविधीच्या यात्रेत सहभागी होतात. श्रीहरींना आता पूर्ण कल्पना येते, की आपण आता दहा रुपये नक्कीच घेऊन जाऊ. यासाठी ते सुद्धा आपली जिद्द अजिबात सोडत नाहीत. विधीमध्ये सुद्धा ते आपली जिद्द सोडत नाहीत. पण शेवटी मात्र स्मशान भूमी वर गेल्यावर आलेल्या लोकांपैकी काही जण पुढे होऊन शरीर उचलतात आणि चितेवर ठेवतात. त्यावेळी मात्र भटोबाला भीती वाटते. पण सोंग सोडु कसे? आणि दुसरीकडे श्रीहरींना देखील कुठेतरी त्याची काळजी वाटु लागते. त्याच्या जीवनाचे विचार मनात येऊ लागतात. कारण भटोबाचं आयुष्य किती मोठं आहे हे त्यांना माहित होतं. इतक्यातच जर त्याने ते संपवले तर मात्र यामध्ये आपण दोषी ठरु आणि ब्रह्मदेवांनी रचलेल्या त्याच्या कुंडलीमध्ये आपल्या हातुन खुप मोठा फरक होईल. शिवाय आपण पापाचे भागिदारी देखील ठरु. पण एक मात्र प्रसन्नता होती की, खरोखर या ब्राह्मणाने श्रीलक्ष्मीला अगदी आपल्या मुलीप्रमाणे जपले आहे. आपल्या श्वासाच्याही पलीकडे जपले आहे. अगदी संपूर्ण ध्यान त्यांच्यावर लावले आहे. आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले आहे. म्हणून आपण आपला निर्णय बदलला पाहिजे. तेव्हाच अग्नी देण्याच्या काही वेळापुर्वी श्रीहरी भटोबाच्या कानाजवळ येऊन म्हणतात, की “भटोबाबुवा, मला सत्य ठाऊक आहे की आपण जिवंत आहात. आणि फक्त दहा रुपये न देण्यासाठी हा इतका मोठा खेळ रचलात., मी काही ब्राह्मण नाही, मी श्रीहरी आहे, लक्ष्मी चे पती विष्णु आहे. अश्या वेशात तुझी परीक्षा घेण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि तुझ्यावर फार प्रसन्नही आहे म्हणून तुला जे हवे ते माग. हे ऐकुन भटोबाला यावर फार आश्चर्य वाटते. चट्कन त्याने आपले डोळे उघडले. हे दॄश्य पाहुन अंत्यविधीला जमलेली सर्व मंडळी तिथुन घाबरुन पळुन जातात. आणि श्रीहरी भटोबाला आपल्या सत्यस्वरुपात दिसतात. भटोबा हे सर्व क्षणासाठी पाहतच बसतो आणि म्हणतो, की मला काहीही नको, मी खुप समाधानी आहे. फक्त आज तुम्ही जे माझ्याकडे दहा रुपये मागत आहात ते फक्त सोडून द्या याच्या व्यतिरिक्त मला तुमच्याकडून काहीही नको. श्रीहरी यावर अजून प्रसन्न होतात आणि दहा रुपये सोडुन आपल्या वैकुंठात परततात.
अशी ही कथा होती लोभ नसलेल्या भटोबाची.
— स्वाती पवार
Leave a Reply