नवीन लेखन...

निरंजन – भाग ५२ – सवय

एक व्यापारी होता. तो धनवान होता. नाव ही होते धनाजी. गरजेपेक्षा अधिकाधिक धन त्याने आपल्या भविष्यासाठी कमावून ठेवलं होतं. पण ते नुसत्या मेहनतीने आणि बुद्धीने नाही, तर सततच्या कंजूस सवयीमुळे…त्याला आपल्या जीवनात कोणतीही कमतरता नव्हती. पण खिशातून पैसा काढताना मात्र तो अतिशय दुःखी होत असे. कोणासाठी पैसा खर्च करण्यासाठी किंवा एखाद्याला त्याचा मोबदला देण्यासाठीही तो सतत दिवसांमागून दिवस ढकलत असे. आपल्या व्यापारात आणि घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील तो त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी प्रमाणाबाहेर उशीर करी. दरवेळी त्यांना थांबवून ठेवत असे. आपल्या मालकाकडे कोणतीही कमी नाही. तरी पगार देण्यासाठी मात्र मालकाचा हात कधी वेळेला-गरजेला पुढे येत नाही. या त्याच्या सवयीची कित्येक कर्मचाऱ्यांना जाणीवही होती.  म्हणून कितपत सहन करणार, काही काळ थांबून ते काम सोडून जात असत. त्यामुळे व्यापाराच्या उद्योग-धंद्यावरही त्याचा परिणाम होत असे.

एकदा असेच घरी निवांत बसलेल्या व्यापाराला त्याच्या पत्नीने त्याला चिंतेत पाहिले. तिचं नाव होतं कौशल्या. कौशल्या स्वभावाने सोज्वळ होती. तिलाही व्यापाराच्या कंजूस सवयीची जाणीव होती. त्याबद्दल परखडपणे कित्येक वेळा तिने आपलं मत मांडलं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. व्यापाराला त्याच्या चिंतेचं कारण तिने विचारलं. पण व्यापाऱ्याने ते सांगायचं टाळलं. व्यापाऱ्याचा अगदी जवळचा मित्र, अधून-मधून व्यापाराला भेट देण्यासाठी येई. कदाचित त्यांना काहीतरी नक्कीच माहित असणार, अशा विचाराने कौशल्याने त्यांच्याजवळ चौकशी केली. तेव्हा असं कळलं की, अचानक दहा ते बारा कर्मचारी एकत्र काम सोडून गेले आहेत. कौशल्येच्या लगेचच लक्षात आलं की, हा परिणाम यांच्या कंजूसपणाच्या सवयीमुळे आहे. कौशल्याने हा विषय घरी काही मांडला नाही. आणि नाही अगोदर काही याबाबत विचारपूस केली. पण अडचणीतून बाहेर येण्यासाठी मार्ग मात्र काढला. आणि सहज बोलता-बोलता व्यापाऱ्याला आपल्या गुरूंची आठवण करून दिली. त्यावर त्याला लगेचच लक्षात आलं की, कुठेतरी आपल्या सवयीमुळे अडचण आहे. कंजूसपणाची सवय असल्यामुळे आपल्या व्यापारावर याचा परिणाम होतोय. मला माझ्या गुरुंकडे जाऊन यावर मार्ग काढला पाहिजे. असा विचार करून धनाजी दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्या गुरुंकडे गेला. गुरुंना नमस्कार केला आणि आपली अडचण त्यांना सांगितली. त्यावर गुरु म्हणाले, “जर तुला माहीतच आहे की, हे सर्व तुझ्या सवयीचे दुष्परिणाम आहेत, तर मग तुला तुझी सवय बदलायलाच हवी. धनाजी यावर म्हणाला,”गुरुदेव,  हीच मोठी अडचण आहे माझी, कि ही सवय माझ्याकडून  सुटतच नाहीये. या सवयीने मला अगदी घट्ट धरून ठेवलेय की यातून बाहेर पडणं मला अशक्य झालेय. माझीही मनापासून इच्छा आहे ही वृत्ती सोडण्याची. पण माझ्याकडुन होतच नाहीये. मला तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा, जेणेकरून ही सवय मला सोडेल.

गुरुनी मंद हास्य दिलं आणि म्हणाले, “धनाजीराव, उद्या दुपारी माझ्याकडे या. मी तुम्हाला अगदी उत्तम मार्ग देतो. हे ऐकून धनाजी निवांत होऊन उठला आणि घरी आला.

दुसऱ्या दिवशी भर दुपारी धनाजी गुरुंजवळ आला. तेव्हा गुरु एक गरम रजई अंगाभोवती गुंडाळून ध्यान करत बसले होते. उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात भर दुपारची वेळ. त्यामुळे घामाने भिजले होते. धनाजी समोर आले. याची गुरुंना जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडले. धनाजीने लगेचच विचारले. गुरुदेव तुमची तब्येत ठीक नाही का?  गुरु म्हणाले, “नाही… मी अगदी ठीक आहे. त्यावर धनाजी म्हणाला मग इतक्या कडक उन्हाळ्यात गरम रजई का गुंडाळून बसले आहात तुम्ही?

यावर गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू. पण होतच नाहीये. धनाजीला आश्चर्य वाटले. पण हळूहळू गुरुजींचे बोललेले सर्व शब्द त्याच्या लक्षात आले आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळाले.

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..