|| ॐ श्री सरस्वती माता नमो नम: ||
तुम्ही गती; बुद्धिमती; तुम्हीच ब्रह्मांडाची किमया
तुम्ही नीती; तुम्ही नियती; ब्रह्ममुहुर्ताची तुम्ही माया
तुम्ही वीणा; तुम्ही वाणी; तुम्ही बासरीचा ध्वनी
तुम्ही गीता तुम्ही गाथा तुम्हीच वेदांची लेखणी…..
माता सरस्वती….
आपल्या ज्ञानमाता ….
आपल्या बुद्धिमाता ….
बुद्धिमातेची भक्ती करुन प्राप्त होते ती बुद्धिमता…
बुद्धिमुळेच आपल्या आचरणाला सुंदर रीत मिळते. कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आलेल्या संकटातुन बाहेर कसं पडावं हे तल्लख बुद्धी मुळेच शक्य होतं…
वेगवेगळ्या क्षेत्रातील कला, जसे चित्र, शिल्प, नृत्य, संगीत या सारख्या अनेक कलांचा जन्म हा मातेच्या विणेमधुनच झालेला आहे. मातेच्या हातातील विणा हा बुद्धीशक्तीचा विणा आहे. मनामध्ये ज्ञान ग्रहण करण्यासाठी ज्या शक्तीची आवश्यकता असते त्या शक्तीला जागृत करण्यासाठी हा बुद्धीचा विणा आहे. पृथ्वीतलावरची संपूर्ण कला, शास्त्र आणि ध्वनी ही मातेची निर्मिती आहे. ध्वनी म्हणजेच आपल्या जिव्हेवरची मधुर वाणी. या वाणीमुळेच माणसे मना-मनाने जुळतात. ध्वनीमुळेच मनातले भाव प्रकट होतात. हा ध्वनी म्ह्णजे?? ध्वनी म्ह्णजे नाद, तरंग, कंपने, कुठुन निर्माण झालीत ही कंपने?? कुठे झाली यांची निर्मीती…. ज्यातुन भाव प्रकट होतात आणि त्या भावनांची जाणीव मनापर्यंत पोहोचते. तर चला पाहुया, यावर आध्यात्म काय म्हणतं.
अध्यात्मावरिल एक सुंदरशी कथा ….
एकदा त्रिदेवांनी मिळून एक सुंदर सृष्टी निर्माण करण्याची कल्पना मनात रचली. आणि या निर्मितीचा कार्यभार प्रामूख्याने श्री ब्रह्मदेवांकडे दिला. जिथे ज्ञानाचा सागर उगम पावतो. सुंदर अश्या सृष्टीचा जन्म झाला. त्रिदेवांची कल्पना साक्षात साकारली गेली. पण ती साकारलेली सृष्टी पाहाण्याची इच्छा त्रिदेवांच्या मनात प्रकट झाली. म्हणुन तिन्ही देवांनी पृथ्वीला भेट देण्याचे ठरवले. तीन्ही देव मिळुन भुतलावर आले. पण त्यांनी असे अनुभवले की तिथे कोणताही ध्वनी नव्हता. एक अदभुत अबोला … एकमेकांच्या बोलण्याचाही आवाज त्यांना ऐकु येत नव्हता. एक्मेकांचा संवाद हा मुखातुन बाहेर उमटत नव्हता, पण असे का?? हे काय घडते आहे, हे कोणालाही काही उमजत नव्हते. म्हणुन पुन्हा त्रिदेव आपापल्या स्थानी आले. आणि आपसुकच त्यांना आपापला आवाज एकमेकांचे बोलणे पुर्वीप्रमाणे ऐकु आले. पुन्हा तीन्ही देव मिळुन भुतलावर आले. आणि पुन्हा पुर्वीप्रमाणे त्यांनी तोच अबोलपणाचा अनुभव घेतला… नाही पक्ष्यांचा किलबिलाट, नाही नद्यांची सळसळ आणि नाही वार्यांची सरसर. त्रिदेवांनी हे सर्व काही अनुभवले. या अबोलपणाची कटुता फक्त ध्वनी निर्माण झाली तरच दुर होऊ शकत, हे त्यांच्या लगेचच लक्षात आले. त्यांना जाणीवही झाली. कारण ध्वनीमधुनच निर्माण होतात कंपने, कंपनातुन पसरतात तरंग, तरंग निर्माण करतात लय, लयीतुन निर्माण होतो स्वर, स्वरातुन निर्माण होतात शब्द आणि शब्दातुन जन्म घेतात भावना. आपल्या मनातले भाव खुप सोप्या पद्ध्तीने हे शब्दातुन प्रकट होतात.
श्री ब्रह्मदेवांच्या या निर्मीतीला सजवण्यासाठी त्यांच्या या साकारलेल्या कार्याला आकार देण्यासाठी सोबत अर्धांगीनी असणे हे श्री महादेवांना आणि श्री हरिंना खुपच महत्वाचे वाटले. आपल्या या निर्णयावर तिन्हीदेवांनी स्वतःची सहमती दर्शवली आणि पुढच्या या सुंदर रचनेसाठी ध्यान सुरु केले. साक्षात महादेवांनी आपल्या महाध्यानातुन एक सुंदर आकृती प्रकट केली. शुभ्रवर्णी वस्त्रामधुन सोबत ज्ञानविणा घेऊन माता सरस्वती अवतरल्या. त्यांच्या अवतरण्याने तरंग निर्माण झाले. त्यांच्या विणेमधुन कंपने निर्माण झाली. मातेने आपल्या विणेमधुन संगीतातले पहीले दहा थाट वाजवले आणि संगीत निर्माण झाले वारा गाऊ लागला. नद्या हसु लागल्या. पक्षी किलबील करु लागले. चिमुकल्या शंखातुनही सागरध्वनी घुमु लागला…
हाच तो दिवस ज्याला आपण वसंत पंचमी म्हणुन साजरा करतो. या दिवशी संगीत सरस्वती मातेचे पुजन होते.
मातेचा जन्मदिवस हा वसंत पंचमी म्हणुन ओळखला जातो. म्हणुनच बुद्धीध्यान भक्ती खुप महत्वाची आहे. बुद्धीमातेचे ध्यान करणे खुप महत्वाचे आहे. बुद्धीध्यान भक्तीतुनच बुद्धीध्यान शक्ती वाढते.
— स्वाती पवार
Leave a Reply