निरंजन उजगरे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४९ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुबंईत झाले. ते व्ही.जे.टी.आय मधून मेकॅनिकल इंजिनीअर झाले . त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांना हा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला असावा कारण त्यांचे आजोबा भाषाभास्कर भास्करराव उजगरे , त्यांनी दाते शब्दकोशासाठी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करून शब्द पुरवले. होते , म्ह्णून त्यांना ‘ भाषाभास्कर ‘ ही पदवी मिळाली होती . त्याचप्रमाणे एकट्या कवीचा काव्यसंग्रह काढण्याचा पायंडा भास्करराव उजगरे यांनी पाडला. त्यांचे पणजोबा हरिपंत केळकर हेदेखील कवी , लेखक होते , ते पनवेलचे होते त्याकाळी त्यांचीही पुस्तके प्रसिद्ध झालेली होती. निरंजन यांचे लेखन चालू होते त्यावेळी त्यांनी स्वतःची छोटी इंजिनिरिंग कंपनी सुरु केली. निरंजन उजगरे यांनी ‘ आधी नवे घर ‘ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह लिहिला त्यानंतर ‘ त्यांचा ‘ दिनार ‘ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला , त्याचे भाषांतर उर्दूत झाले . उर्दू मध्ये भाषांतरीत झालेला हा पहिलाच मराठीतील काव्यसंग्रह होता. त्याला राज्य उर्दू अकादमीचाही पुरस्कार मिळाला. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांचे प्रहार , परिच्छेद , दिपवा हे काव्य संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचा ‘ तत्कालीन ‘ हा शेवटचा काव्य संग्रह होता .
निरंजन उजगरे ह्यांनी जे लेखन केले ते फार डोळसपणे केले ते लिहिण्यामागे एक वेगळी उर्मि होती . त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले ‘ हिरोशिमाच्या कविता ‘ त्यांनी अनुवादित केल्या. त्याच्या हिरोशिमाच्या कविता या काव्यसंग्रहाला सोविएत लँड नेहरू अवॉर्ड १९८९ साली मिळाले. त्याच पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगांवकर हे त्यांच्या आत्याचे पती होते. खरे तर पाडगावकरांमुळे ते खूप वाचू लागले कारण मंगेश पाडगांवकर त्यांना सुरवातीपासून पुस्तके देऊन वाचण्यास प्रवृत्त करत होते. अनेक वेळा पाडगावरांशी चर्चा चालू असताना वादही होत परंतु ते तेवढ्यापुरतेच असे.निरंजन उजगरे याचा स्वभाव बोलका होता आणि कुणालाही ते दुखवत नसत . अर्थात त्याचे फटके त्यांना बसत असत . असेच एका प्रसंगात त्यांना आपल्याच मित्रांकाडून कटू अनुभव आला असता ते दुःखी झाले जो प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्यादिवशी सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर त्यांच्या घरी आले होते तेव्हा ते म्हणाले . ‘ एक लक्षात ठेव, मित्र खूप असतात , परंतु ज्याच्या खाद्यावर आपल्याला डोके ठेवून रडता येते तोच आपला खरा मित्र असतो , बाकी नुसतीच ओळख असते.” त्यांच्या पत्नी अनुपमा उजगरे ह्याही उत्तम कवयत्री आहेत. उजगरे पती-पत्नी यांनी जवळ जवळ १०० कवींच्या कविता असलेल्या ‘ मर्ढेकरांपासून आजपर्यंत ‘ ह्या दर्जेदार कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही केले. ते इतके लोकप्रिय झाले की सुनीताबाई-पुलंनतर चांगल्या सादरीकरणात निरंजन-अनुपमा ह्या उजगरे दांपत्याचे नाव घेतले जाऊ लागले. निरंजन उजगरे यांनी हिब्रू कवितांचे भाषान्तर देखील केले . त्याच्या हिब्रूतून भाषांतर केलेल्या काव्य संग्रहाचे नाव आहे ‘ विणू लागली आजी ‘ . त्यांनी मूळ सिंधी कवितांचा अनुवाद ‘ फाळणीच्या कविता ‘ या नावाने केला . मूळ तेलगू भाषेतील पाणी या विषयाला वाहिलेल्या दीर्घ कवितांचा अनुवाद ‘ पाण्याचं गाणं ‘ या पुस्तकात केला आहे. त्यांनी भारतातील विविध भाषेतील उत्तमोत्तम कवींच्या कविता मराठीत आणल्या हे महत्वाचे. निरंजन उजगरे यांना चित्रकलेचाही नाद होता. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन त्यावेळी विख्यात चित्रकार आरा यांनी मुबंईत भरवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी ‘ जायंटव्हील ‘ नावाची एक अनोखी कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत वस्तूप्रदर्शन भरवणाऱ्या व्यवसायाशी निगडित असलेल्या एक अनोख्या विश्वाशी मराठी वाचकांचा पहिल्यांदा परिचय झाला. त्यांनी उर्दू कवी ‘ पाश ‘ ह्याच्या कवितांचे भाषांतर केले ‘ पाशच्या कविता ‘ या नावाने तो निरंजन उजगरे यांचा शेवटचा अनुवादित संग्रह ठरला.
सतत नवीन, वेगळे करण्याचा त्यांचा ध्यास होता त्यात कुठलेच राजकारण नव्हते किंवा कुठलाही स्वार्थ नव्हता. त्यांना अनेक मनसन्मान मिळाले , अनेक ठिकाणच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले खरे परंतु अशा गोष्टीत ते जास्त रमले नाहीत. त्यांनी अनेक भाषांमधील कविता मराठीत आणून मराठी कविता समृद्ध केलेच परंतु ते नुसते अनुवादक नाही झाले तर त्याच दर्जाचे स्वतंत्र लेखनही चालू ठेवले हे महत्वाचे. बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात निरंजन उजगरे यांनी वर्तमानपत्रातून आव्हान करून तरुण कवीकडून कविता मागवल्या होत्या ६५० कवीकडून सुमारे १४०० कविता आल्या होत्या त्यांची योग्य प्रकारे निवड करून ५० कवीच्या ५० कविता निवडल्या होत्या. हे काम अथकपणे निरंजन-अनुपमा उजगरे यांनी केले. पुढे त्या कवितांचे पुस्तक झाले.निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत. परंतु या व्यापामुळे, प्रदूषणामुळे त्यांची फुफुस्से निकामी झाली हे डॉक्टरांच्या लक्षात आले . त्याचा शेवटचा काव्यसंग्रह ‘ तत्कालीन ‘ हा होता, त्यात त्यांच्या जानेवारी ते डिसेम्बर २००३ पर्यंतच्या कविता त्यात होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘ कांगारूचे आप्त ‘ ह्या नावाचे ऑस्ट्रेलिया येथील मराठी बांधवांच्या लेखनाचे पुस्तक ‘ ग्रंथाली ‘ ने काढले. त्यांचे ‘ काव्यपर्व ‘ तर साकार झाले परंतु त्यांचे ‘ जीवनपर्व ‘ मात्र अकाली संपुष्टात आले . हळूहळू त्याची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी ठाण्यात अकाली निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply