निरासक्त कर्म, सोडावा स्वधर्म
व्हावे श्रीमंत योगी, नसावे लोभी
हीच श्रींची इच्छा, म्हणोनि जगावे
समाजात तेव्हाच मानाने फिरावे!!
अर्थ–
माणसाचा जन्म मिळणे हे फार भाग्याचे आहे आणि तो आत्मा माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हाच त्याच्यात काही गुण तसेच काही दोष हे उपजत आलेले असतात. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगतात की थोर भाग्य मिळाला मनुष्य जन्म, ईश्वरी कार्यास अर्पण द्यावा, लोभ-द्वेष-ईर्षा लोटूनी द्यावे, धर्म-प्रेम-कारुण्य भरोनी घ्यावे!
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साठी स्वराज्य उभारले नाही. आपल्या घरातल्या लोकांच्या सुखासाठी झटले नाहीत. त्यांची ही भावना अशीच होती, ” हे स्वराज्य व्हावे हें तो श्रींची इच्छा ” यातून लोकांसाठी असलेले प्रेम, काळजी व्यक्त होते. सिंहासनाची ओढ होती म्हणून स्वराज्य घडले नाही तर स्वराज्य वाढायला सिंहासनाची अत्यंत गरज होती म्हणून सिंहासन मांडले गेले तेही लोकांच्या कल्याणासाठी.
काम करताना यातून मला काय मिळणार आहे या कडे न पाहता याने कोणास आनंद मिळणार आहे या हेतूने ते कार्य केले की तुम्हाला समाधान प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. आजकाल दुसऱ्यांना लुटून स्वतःची ओळख निर्माण करणारे समाज प्रतिनिधी, राजकारणी, व्यवसाय पंडित पाहायला मिळतात पण सेवेचे ठायी तत्पर म्हणून कार्य करणारे दिसत नाहीत कारण, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी गत झालेली आहे.
स्वतःला ओळख प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर दुसऱ्याची ओळख पुसायला जाऊ नये.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply