नवीन लेखन...

निर्गुण्डी – एक चित्तवेधक महाऔषधी

आयुर्वेदात असे म्हटले आहे की – निर्गुडति शरीरं रक्षति रोगेभ्य तस्माद् निर्गुण्डी, याचा अर्थ असा की जो शरीराचे रोगापासून रक्षण करतो तीच निर्गुण्डी आहे अभिधानमंजरी व राजनिघंटू या संस्कृत ग्रंथांत या वनस्पतीच्या (सं. निर्गुंडी) गुणधर्मांविषयी उल्लेख आला आहे.

निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो

निर्गुण्डी (निर्गुण्डी) हा संस्कृत शब्द आहे जो Vitex negundo ला संदर्भित करतो , जो फुलांच्या वनस्पतींच्या (कुल-व्हर्बिनेसी) कुटुंबातील एक मोठे झुडूप आहे. कारक-संहिता आणि सुश्रुत-संहिता यांसारख्या आयुर्वेदिक साहित्यात त्याचा वापर केला जातो. इंग्रजीमध्ये, वनस्पतीला इतरांबरोबर “हॉर्सशू विटेक्स” किंवा “चायनीज चास्टेट्री” म्हणून ओळखले जाते. निर्गुंडीचे दोन प्रकार ओळखले जातात: एक फिकट निळ्या फुलांची (श्वेतपुष्पी), आणि दुसरी निळी फुले असलेली (पुष्पनातिका). तमिळ लोकांमध्ये, या वनस्पतींपैकी एक नर आणि दुसरी मादी असावी असे मानले जाते. याची आणखी एक प्रजाती काळी निर्गुण्डी म्हणून ओळखली जाते. ती अतिशय दुर्मिळ आहे.

निर्गुडी : (निगडी, निर्गुंडी हिं. संभालू गु. निगोड क. लक्की, नुक्की सं. निर्गुंडी, सिंधुवार इं. इंडियन प्रिव्हेट लॅ. व्हासटेक्स निगुंडो कुल-व्हर्बिनेसी). सु. ४•५–६ मी. उंचीचे हे लहान सदापर्णी क्षुप (झुडूप) सिंध, श्रीलंका, अफगाणिस्तान, फिलिपीन्स इ. प्रदेशांत व भारतात (महाराष्ट्र–दख्खन कोकण) पडीक जागी विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने भरपूर आढळते. खोडाची साल पातळ व करडी कोवळे भाग लवदार व पांढरट पाने संमुख (समोरासमोर), संयुक्त, ३–५ दली असून दले २•५–४ सेंमी. लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी, खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात. मुख्य देठ २•५ सेंमी. लांब असतो. फुलोरा अग्रस्थ, शाखायुक्त परिमंजरी असून त्यावर लहान, निळसर किंवा पांढरी फुले मार्च ते मे मध्ये येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे व्हर्बिनेसी कुलात (साग कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) वाटाण्याएवढे व पिकल्यावर काळे असते. त्याखाली संवर्त सतत असतो, उंच व झुबक्यांनी वाढते. खोड (मूलस्तंभ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. निरगुडीच्या वरच्या भागात फुले असतात.

इंद्राणी, लिंगूर किंवा निर्गुंडी या नावांनी निर्गुंडीच्या वंशातील आणखी एक जाती (व्हायटेक्स ट्रायफोलिय) हिमालयाच्या पायथ्यापासून ते खाली दक्षिणेत भारतात सर्वत्र आढळते. तिला साधी किंवा संयुक्त पाने असून सर्व दले बिनदेठाची असतात. ही वनस्पतीही कुंपणाच्या कडेने लावतात.

निर्गुण्डी (निर्गुण्डी):- रसशास्त्र ग्रंथानुसार (रस साहित्य) सत्तर महाऔषधींपैकी एक. ही औषधे पारा (रसा) वर प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहेत, जसे की सुता-बंधन आणि मारण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायनिक प्रक्रिया.

निर्गुंडीचा पाला ग्रामीण भागात खूप परीचयाचा असतो. निर्गुंडीची झाडे तेथे बरीच बघायला मिळतात. याला उग्रगंध असतो. सिन्दुवार, शेफाली अशी नावे याला आली आहेत. याची पाने मूळे आणि बीज औषध म्हणून वापरण्यात येते. याची सहसा लागवड केली जात नाही.

निर्गुण्डी पाळीव पशूंची संजीवनी :

पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो. जनावरांमध्ये सांधेदुखी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. सांध्यामध्ये मार लागणे हे सर्वत्र आढळते, परंतु यात जर जखम झाली किंवा सांध्यास जिवाणूंचा संसर्ग झाला तर तो सुजतो. यामुळे जनावर लंगडते, सांध्यामध्ये वेदना होतात. जीवाणूंच्या संसर्गामुळे जनावरास ताप येतो, आजाराची तीव्रता वाढते, सांध्यामध्ये पू होतो. या आजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे योग्य ते निदान करून प्रतिजैविकांच्या सोबतच वेदनाशामक, सूज विरोधी औषधांचा वापर करावा.

उपयुक्त औषधी वनस्पती निर्गुडी:

• निर्गुडीचे पान सूज विरोधी आहे. मानवाच्या आजारात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यामध्ये निर्गुडी पाला वापरून त्याचा लेप बाधित भागावर लावतात. यामुळे येथील सूज व वेदना कमी होतात.
• या आजारात बाधित भागावर लावण्यासाठी निर्गुडीच्या पानांबरोबर निलगिरीच्या पानांचा
वापर करावा.
• वनस्पतीची पाने व तेल यांचा वापर औषधीमध्ये करतात.
• निर्गुण्डी पानाचा लेप बाधित भागावर लावावा किंवा निलगिरी तेलाने बाधित भागावर मसाज करावा.
• कापूर: आपल्या रोजच्या वापरात असलेला कापूर हा वनस्पतिजन्य असतो. कापराचा वापर निर्गुण्डी बरोबर बाधित भागावर लावण्यासाठी करावा.
• रोहिष तेल हे एक वनस्पतिजन्य तेल असून संधिवात, मुका मार यावर अत्यंत गुणकारी आहे.
• निलगिरी तेलाप्रमाणे याचा देखील वापर करावा. परंतु रोहिष तेल कमी मात्रेत वापरावे.
• रोहिष तेल हे तीळ तेल किंवा नारळ तेलात मिसळून बाधित भागावर लावावे. नाहीतर त्वचेस याचा त्रास होऊ शकतो.
• निर्गुण्डी तेल व लसूण याचा वापर बाह्य उपचारासाठी करावा. लसूण बारीक करून त्याचा लेप बाधित भागावर लावावा. आले लसणाप्रमाणेच आल्याचा वापर करावा. सूजेवर गोखरू, पुनर्नवा उपयुक्त. शरीराच्या एखाद्या भागात पाणी साचून त्या भागावर सूज येणे यालाच शोथ किंवा इडीमा असे म्हणतात. जनावरांमध्ये पोटाच्या भागावर, मानेच्या खाली अशा प्रकारची सूज बऱ्याच वेळी दिसते. शरीरात रक्त वाहत असताना खनिजे, अन्नद्रव्य व जलद्रव्याची रक्तवाहिन्या व पेशी मध्ये देवाण-घेवाण चालू असते. या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील जलद्रव्य पेशींमध्ये साठवून राहतात.
• हृदयाचे आजार, गर्भ काळ, सूज, कर्करोग, ॲलर्जी, जिवाणू, विषाणू व परोपजीवी जंतू यांच्या संसर्गामुळे वरील आजार संभवतो.
• या आजारामध्ये सूज आलेल्या भागावर हात लावल्यास आतमध्ये पाणी असल्याचे जाणवते, परंतु त्या भागात वेदना होत नाही.
• वरील आजारात बाधित भागावर लावण्यासाठी निर्गुडीच्या पानांचा वापर निलगिरी सोबत
करावा.
• या वनस्पतीची पाने व तेल यांचा वापर औषधीमध्ये करतात.
• निरगुडीचा पाला कापराचा वापर करून बाधित भागावर लावण्यासाठी करावा. गरम करून सुजेवर बांधले जाते. निरगुडीच्या गरम पाल्याने सूज आणि ठणका दोन्ही थांबते.
• निर्गुडी तेल एक वनस्पतिजन्य तेल असून संधिवात, मुका मार यावर अत्यंत गुणकारी आहे.
• निलगिरी तेलाप्रमाणे याचा देखील वापर करावा.
• ही वनस्पती मूत्रल म्हणून कार्य करते. म्हणजेच या वनस्पतीमुळे शरीरामध्ये साचलेले पाणी बाहेर पडते.
• निर्गुण्डीची पाने मूळे आणि बीज औषध म्हणून वापरण्यात येते.
• निर्गुण्डी वाताला कमी करते त्यामुळे शिरःशूल, संधिवेदना, आमवात अशा सूज किंवा वेदना जास्त असणाऱ्या विकारांमधे निर्गुंडीची पाने गरम करून त्याचे पोल्टीस बांधल्याने वेदनाशमन होते. गर्भाशय, वृषण, गुद या अवयवावर सूज असल्यास निर्गुंडीचा काढा तयार करावा. या काढ्याने भरलेल्या टबमधे बसावे.(Sitz bath)
• कंठभागी वेदना सूज असेल तर निर्गुंडीच्या काढ्याने गुळण्या कराव्या. वाळलेल्या पानांचा उपयोग शिरःशूल व सर्दीमधे धूपन स्वरूपात केला जातो. निर्गुण्डी केसांकरीता उपयोगी आहे. केस गळणे रुक्ष होणे तसेच केसांत ऊवा कोंडा होणे अशा केसांच्या तक्रारीवर निर्गुंडी तेल उपयोगी ठरते.
• जखम होणे, खरचटणे व्रण होणे यावर निर्गुंडी पाने वाटून हळदीसह लेप लावावा. जखम भरून येण्यास मदत होते. सूतिका म्हणजेच बाळंतीणीच्या सर्व विकारांमधे निर्गुंडीच्या पाल्याचा उपयोग होतो. बाळंतीणीला गरम पाण्यात निर्गुण्डीची पाने टाकून स्नान केल्यास वातशमन होते. सांधे दुखत नाही तसेच वात वाढत नाही.
• सांधेदुखी आणि वेदनांपासून आराम मिळतो
• सांधे आणि स्नायूंमधील कडकपणा कमी करण्यास मदत करते
• शरीराची लवचिकता आणि गतिशीलता सुधारण्यास मदत करते
• सांधे आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते
• निर्गुण्डी तेल सर्व प्रकारच्या वातव्याधींवर मालीश करता वापरता येते. याने सूज वेदना कमी होतात. थंडीमुळे शरीर जकडणे, वातामुळे हात पायाची बोटे दुखणे अशा विकारामधे निर्गुंडीपाने टाकलेल्या पाण्याची वाफ घेतल्यास फायदा होतो.
• हर्निया व अर्धशिशी यावर घरगुती उपचार करतात व त्याचा हमखास गुण येतो.
• ही वातशामक वनस्पती विविध वात कफ विकारात उपयुक्त आहे.
• कफावरती पानाची वाफ घेतात. पोट बिघडले असेल तर फुलांची मात्रा घेतात. स्नायूंचे, पाठीचे व सांध्याच्या वेदनावरती निर्गुण्डीचे तेल हा रामबाण उपाय आहे.
• निर्गुण्डी पुनरुत्पादन संस्थेच्या विकारावर वापरली जाते. स्त्री किंवा पुरुषाच्या कामोत्तेजना कमी करण्याकरता याचा उपयोग होतो.
• निर्गुंडीच्या बिया ह्या हिस्टेरिया (उन्माद), फिट व मानसिक विकारावर कमी करण्याकरता वापरतात.
• ह्याच्या पानांचे चूर्ण तुपाबरोबर एकत्र करून त्वचेच्या बुरशी विकारावर वापरतात.
• स्तनदा मातांना दूध यावे म्हणून खोड व फळांचे चूर्ण देतात.

इतर उपयोग:

खरंतर या झाडांचा बागेत किंवा शोभेकरिता वापर होतो. या झाडाचं लाकूड कठीण असल्याने त्याचा जळणासाठी देखील वापर होतो. या झाडांच्या फांद्यांचा उपयोग हा टोपल्या किंवा खुप बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात होतो. फांद्यांचा उपयोग ताटी, कूड, टोपल्या इत्यादीकरिता करतात. मुळे कफोत्सारक (कफ काढून टाकणारी), ज्वरनाशक व पौष्टिक असतात. पाने कृमिनाशक, सुवासिक, पौष्टिक असून डोकेदुखीवर त्यांची पूड तपकिरीप्रमाणे ओढतात. संधिवातात सांध्यांच्या सुजेवर व प्रमेहामुळे होणाऱ्या वृषणाच्या (पुं-जनन ग्रंथीच्या) सुजेवर बांधण्यास व गळवे निचरण्यास पाने वापरतात. शुष्क फळे कृमिनाशक असून पानांचा रस व्रणशुद्धीवर गुणकारी असतो.

निर्गुडीचे रासायनिक घटक :
फेनॉल्स, अल्कोलॉइड्स कॅमफीन A आणी B, आर्लेमीसिन, कास्टिसीन, डुलसिट्रॉल इत्यादी

नुकसान:
वात प्रकृतीच्या लोकांनी या पासून दूर रहावे. जास्ती मात्रा घेतल्यास डोकेदुखी, जुलाब,व मूत्रपिंडावर दबाव वाढतो. बाह्य अंगाकरता बराच काळ वापरू शकतो. पण नस्य चिकित्से करिता एक महिन्याच्या वर वापर टाळावा. म्हणजेच वैद्याच्या देखरेखी खाली औषधोपचार घ्यावेत.

दुष्परिणाम :
१. पोट बिघडणे .
२. त्वचेची खाज व जळजळ
३. गर्भवती स्त्रियांनी ह्या पासून लांब राहावे.

निर्गुंडीचा वापर कसा करावा?
१. निर्गुण्डीचा रस
निर्गुण्डीचा रस खोकल्या साठी दहा ते वीस मिली दिवसातून दोनदा घ्यावा.
२. निर्गुण्डी पावडर
सांधे दुखी करता ३-६ ग्राम पावडर कोमट पाण्याबरोबर वेदना कमी होईस्तोपर्यंत घावी.
३. निर्गुण्डीच्या गोळ्या (कॅप्सूल)
रोज एक गोळी किंवा वैद्यांनी सांगितल्या प्रमाणे डोस जेवणानंतर घ्यावा.
वरील सर्व उपचार तज्ञ् वैद्यांच्या देखरेखी खाली घ्यावेत.

पुण्याच्या राष्टीय रासायनिक प्रयोग शाळेत निर्गुंडीच्या उतिसंवर्धनावर बरेच संशोधन झाले आहे. क्लोनल गुणाकार प्रसाराची ( Clonal Multiplication ) पद्धत विकसित केली आहे.

सर्व फोटो गुगल च्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
तारीख: ०८/०४/२०२४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 75 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..