भारतीय अध्यात्म निरिच्छ होऊन जगण्यात सर्वोच्च आनंद असल्याचं निरीक्षण नोंदवतं. झाडं निरिच्छ होऊन फळं देतात. वनस्पती निरिच्छ होऊन फुलं फुलवतात. त्यांना बाह्य जगाकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नसते, ते स्वतःच्या वैशिष्ठयामध्ये रममाण झालेले असतात असे योगी आणि कलावंतच निरिच्छ आयुष्य जगू शकतात. माझं गाणं माझी कला जग कशा पद्धतीत वापरत आहे, त्याची कोणतीही तमा न बाळगता ते स्वतःजवळचं सर्वोच्च असं नक्षत्रांचं देणं जगाला देत राहतात. माझ्या गोष्टी सांगून कुणी भरपूर पैसे कमावतो आहे, कमवून दे. माझ्या कलेचे कुणी विडंबन करून वाईट गोष्टींसाठी वापर करतो आहे, करून दे. मी जेवढा निरिच्छ होत जातो तेवढा मी माझ्या कलेतून निर्मळ पणे व्यक्त होऊ शकतो. सेवा परोपकार त्याग या सर्वांपेक्षाही अतिशय वेगळ्या प्रकारचा अत्युच्च अनुभव आहे.
भारतीय संगीताचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाणारे पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र पंडित मुकुल शिवपुत्र हे त्यांच्या अतिशय निरिच्छ जीवन पद्धती विषयी प्रसिद्ध आहेत. भारतातील संत वाङ्मय हे निरिच्छ वृत्तीतून तयार झालेल्या सर्वोच्च कलाकृती आहेत. ज्यांच्याकडे अमूल्य ज्ञान भांडार आहे, वैशिष्ठ्यपूर्ण कला आहेत, विचारांची ताकत आहे, असे महाभागच समाजात राहून निरिच्छ जीवन पद्धतीचा अनुभव घेऊ शकतात. वेद या जीवन पद्धतीला राजयोग असे नांव देतो. आंब्याच्या झाडाला ज्या निरिच्छ विचारांनी फळं लागतात, फळं लागल्यानंतर लोक दगडं मारतात का फांद्या तोडतात, याची तमा न बाळगता राजयोगी प्रवृत्तीचे लोक आपले वैशिष्ठ्य प्रसवत राहतात.
नर्मदा परिक्रमा, या निरिच्छ आयुष्य जगण्याचा परमानंद घेण्यासाठी करावी असे विवेकानंद सांगतात. निरिच्छ याचा अर्थ सर्वसंगपरित्याग नाही, निरिच्छ याचा अर्थ आत्मत्याग नाही, निरिच्छ याचा अर्थ स्वत्वाचा त्यागही नाही. निरिच्छ याचा अर्थ, जग माझ्याशी कसेही वागले तरी मी माझ्या प्रवृत्ती कायम आनंदी ठेवून माझ्यातील सर्वोच्च वैशिष्ठ्ये प्रसवत राहणे, एवढाच आहे. जग माझी परीक्षा माझ्या दिसण्यावरून करते, माझ्या वागण्यावरून करते, माझ्या कपड्यावरून करते, पण जेव्हा मी कसाही असलो तरी जगाला माझ्या गुणांच्याच प्रेमात रहावेसे वाटते तेव्हा हि गुणांना मिळणारी पावतीच म्हणावी लागेल. अनेकदा अशा दिव्य गुणवत्ता असणाऱ्या कलावंतांना जगाकडून प्रचंड संपत्ती मिळते तरीही देणाऱ्यांना ती कमीच वाटते आणि घेणाऱ्याला ती अनावश्यक वाटते.
आयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते.
— विनय भालेराव.
अति सुंदर विचार. आपला याबाबत अनुभव व धोरण हे कळवा. पंडित मुकुल शिवपुत्र उत्तम उदाहरण. आभार.