नवीन लेखन...

निर्मळ आरसा

परवा शोभाने कपाटातले नको असलेले कपडे काढले. प्रत्येक शर्ट हातात घेऊन ती निरखून पहात होती. त्यामध्ये मला एका जवळच्या मित्राने वाढदिवसाला भेट दिलेला हिरव्या रंगाचा शर्ट होता. तो खूपदा वापरल्याने काॅलर व मनगटावर विरळ झाला होता. एक आठवण म्हणून तो लपविण्याचा माझा प्रयत्न निष्फळ ठरला आणि त्याची रवानगी इतर कपड्यांबरोबर ‘न वापरण्याच्या कपड्यात’ झाली.
मला त्या शर्टाकडे पाहून, सर्व आठवणी जाग्या झाल्या होत्या. त्या मित्राला माझी जन्मतारीख हवी होती, ती मी काही सांगितली नाही. त्याने ती चातुर्याने मिळवली. त्या दिवशी मी नको नको म्हणताना त्याने मला शर्टचं बाॅक्स हातात दिलं…
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मित्र भेटत राहतात. त्यातील काही शाळेपुरते तर काही काॅलेजपुरते मर्यादित कालावधीचे असतात. त्यातील काही आयुष्यभर साथ देखील देतात.
वयाच्या तिशीनंतरची मैत्री परिपक्व होत जाते. अशा मैत्रीमधून काय शोधतो आपण? फोनवरच्या, हाॅटेलमधल्या अघळ पघळ गप्पा? पिक्चर, पार्ट्या? मुळीच नाही. जेव्हा आपण आपल्या कुटुंबात रमलेलो असतो तेव्हा आपल्या एखाद्या निर्णयावर मत घेण्यासाठी मित्राचाच आधार घेतो, जो आपल्याला पूर्णपणे जाणून असतो.
आपल्यावर वाईट वेळ आली तर आपण जवळच्या नातेवाईकांना सोडून पहिल्यांदा आपल्या मित्राकडे मन मोकळं करतो. संकटाच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहतील अशी किती माणसं आयुष्यात कमावतो आपण? जी घर, गाडी, पैसा बघून नाही, तर आपल्या हाकेसरशी लगोलग धावून येतील?
अशा मित्र मैत्रिणींशिवाय जगता येईल? कुणालाही हे विचारलं तर त्याचं उत्तर हे ‘नाही’ असंच येईल. माझी पिढी ही शेवटची पिढी आहे की, आम्ही ‘फ्रेंडशिप डे’ शिवाय मैत्री साजरी केली. खास मित्र, अभ्यासू मित्र, कलाकार मित्र, खेळाडू मित्र अशी बिरुदावली आम्हीच ठेवली. कधी काही कारणास्तव कुणाशी मैत्री तुटली तर, होणाऱ्या वेदना आमच्या पिढीनेच सहन केल्या. आताच्या पिढीतले मित्र फेसबुकवरच्या लाईक्सवरुन मोजले जातात, ज्यांना कधी प्रत्यक्ष पाहिलेलंही नसतं.
थोडक्यात काय? आपल्याला ‘खास मित्र’ नावाचा आरसा हवा असतो. नेहमीच खरं बोलणारा आरसा…
तू कसा आहेस याची जाणीव करून देणारा, कधी प्रतिक्रिया न देता ऐकून घेणारा, हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख जाणणारा, हक्काने सोबत करणारा आणि एकटेपणाची गरज असताना स्वतःहून बाजूला होणारा, सतत बदलणारी आपली रूपं तितक्याच समंजसपणे सामावून घेणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, झालेल्या चुकाही माफ करुन आपलसं करणारा, आपण एकटे नाही ही जाणीव सतत देणारा, आपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!!
तो असतोही बरेचदा…पण नुसता असून काय उपयोग? त्याला पुसून लख्खं ठेवायला नको का? त्या आरशावर रागाच्या, अपमानाच्या, गृहीत धरलेल्याच्या, दुर्लक्षित केल्याच्या आठवणी चिकटलेल्या नाहीत ना, हे निरखून बघितलंय तुम्ही कधी? जुन्या वादांचे, भांडणाचे पुसट ठसे प्रेमाने पुसले आहेत कधी?
त्याला आपल्या आयुष्यात असलेल्या त्याच्या स्थानाची करुन दिलेली जाणीव, मनापासून व्यक्त केलेल्या भावनांची अलगद घातलेली फुंकरही स्वच्छ करायला पुरेशी आहे….
स्वच्छ पुसलेला चकचकीत आरसा आपल्या व्यक्तीमत्त्वाचं प्रतिबिंब आहे, हे किती सहज विसरतो आपण….
माझ्याकडे असे बरेच आरसे आहेत, त्या सगळ्यांकडे मला व्यक्त व्हायचं आहे…त्यांना परत एकदा लख्खं करायचं आहे…उशीर होण्याआधी!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३०-६-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on निर्मळ आरसा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..