मनलोचनांनी नेहमी प्राप्तअवस्थेत सत्यता , शुचिता आणी सुंदरता शोधत रहावी हा सुंदर संस्कार आहे. खरंतर जगात सर्वांनीच इतरांकडून सदैव शिकण्यासारखे खुपच असते. माणूस हा तसा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. सर्वांनीच नवीन नवीन नेहमीच शिकत राहिलं पाहिजे.
आपल्याला बालपणापासून घरात बाहेर जे संस्कार लाभले त्यामुळे आपले जीवन आज समृद्ध झाले आहे याची जाणीव होतच असते.
सभोवती अनेक प्रकारची फुले असतात, खरे तर सर्वच सुंदर असतात. कुरूप फुल हा शब्दप्रयोग तर कधीच प्रचलीत नाही.
सृष्टीतील उमलणं आणि कोमेजणं अन अंती निर्माल्य होणं हा मानवी जीवनाशी सुसंगत असा दृष्टांत आहे.
सुंदर विचार , सुंदर निरीक्षण , सुंदर सहवास , सुंदर व्यक्तता , सुंदर निष्पाप प्रीत , मैत्रभाव , परस्पर सहकार्य हीही विवेकी संस्कृती आहे.
भगवंताने मानवाला पंचेंद्रिये दिली आहेत त्या सोबत विवेक, संयम, अशा सद्गुणी कल्याणप्रदी गोष्टीही दिल्या आहेत त्याचा आपण सतर्कतेन उपयोग केला पाहिजे. त्यातूनच सात्विक , आत्मिक शाश्वत सुखाची अनुभूती येते हे मात्र खरं !
मी परवा पोस्ट केलेली यामिनी ही सत्य घटना आहे. त्यावर मी लिहिण्याचा संक्षिप्त प्रयत्न केला आहे.
ही यामिनी अंध असून देखील ती डोळस आहे . हा विरोधाभास असला तरी तिच्या वैचारिक काव्यरचनेतून ती अंध आहे असे जाणवले नाही. अगदी सहज लीलया आत्ममुख , अंतर्मुख होवून सुंदर शब्दभावनेतून तीच व्यक्त होणं ही खरंच एक दिव्य अनुभूतीच होती.
जन्मजात काळोखातून वैचारिक भावनिक प्रकाशकिरणांचा शोध घेवुन मुक्त व्यक्त होण्याची तिची संवेदनशील अभ्यासक प्रवृत्ती म्हणजे , निश्चितच दैविकृपा म्हणावी लागेल.
विविध क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठणाऱ्या साऱ्याच महान व्यक्ती म्हणजे सृष्टीतील एक ईश्वरीय साक्षात्कार म्हणावा लागेल.
मुकं करोती वाचालं
पंगुम लभयते गिरिम्
अंधम् रचीयते काव्यम्
ही सत्यता आहे. असे दृष्टोपत्तीस येते.
विधात्याने ही सृष्टी , हे जग खूप सुंदर बनविले आहे. मानवाला संस्कारक्षम विवेकबुद्धी दिली आहे .सर्वांगसुंदर दृष्टी दिली आहे हे निर्मळ सत्य आहे .
तेंव्हा या चराचरातील सारी सुंदरता शोधण्याचा प्रयन्त आपण सुंदर नजरेतून करून आपणच जीवनात आनंदोत्सव साजरा करीत राहिलं पाहिजे. हा एक सदविचार आहे.
” जनी निंद्य ते सोडुनी द्यावे “
” जनी वंद्य ते सर्वभावे करावे “
” ठेविले अनंते तैसेची रहावे “
” चित्ती असू द्यावे समाधान “
इती लेखन सीमा.
— वि.ग.सातपुते.
9766544908
दिनांक: १३ – ३ – २०२२.
Leave a Reply