सर्जनाला अनेक हात लागतात. कलाकृतीची निर्मिती अनेक हातांपासून संपन्न होते. पण बरेचदा हे निर्मितीचे हात अदृश्य असतात. काहीतरी नवं तयार करणं यासाठी दैवी घटक तर लागतातच पण मानवी मदतही तितकीच गरजेची असते.
कलाक्षेत्र हे निर्मितीच्या हातांवर पेलले आहे- संगीत, गायन, चित्रकला, मूर्तिकला,शिल्पकला या साऱ्यांसाठी लागणारे हात असामान्य असावे लागतात. शिक्षण क्षेत्रातील गुरुजन अशाच निर्मितीच्या हातांचे धनी असतात आणि शिकवण्या/कोचिंग क्लासवाली मंडळी दुरुस्तींच्या हातांचे मालक असतात.
पण निर्माण झालेली प्रत्येक वस्तू वापर झाल्याने कालांतराने झिजते आणि नादुरुस्त होते. मग त्यासाठी दुरुस्त करणाऱ्या हातांची शोधाशोध सुरु होते. प्रत्येक निर्मिलेल्या वस्तूला दुरुस्तीच्या हातांची गरज असते. मग ते हात प्लम्बरचे असोत, सुताराचे असोत, पंक्चर दुरुस्त करणाऱ्यांचे असोत किंवा वैद्यकीय क्षेत्रातील भिषग्वर मंडळींचे असोत. या हातांमध्ये कौशल्य असते आणि त्यांच्यामुळे बिघडलेली वस्तू पूर्ववत होते. कदाचित त्या वस्तूची पूर्वीची कार्यक्षमता कमी होत असेल पण ती पुन्हा वापरण्याजोगी नक्कीच होते. दुरुस्तीचा खर्च कदाचित निर्मितीच्या खर्चापेक्षा जास्त असू शकतो.
येथे विध्वसांच्या हातांचा उल्लेख मी करत नाहीए.
पण एक नक्की – निर्मितीचे हात आणि दुरुस्तीचे हात वेगवेगळे असतात किंवा एकच असूही शकतात.
मात्र एका क्षणी निर्मितीचे व दुरुस्तीचे हात एकाकार होऊन “विसर्जनाचे ” हात होतात.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply