सविता आज राजेशला भेटायला चालली होती. गेल्याच आठवड्यात तिचा आणि राजेशचा मोठ्या थाटामाटांत साखरपुडा झाला होता. दोघेही खूप आनंदात होते. सविता एकवीस वर्षाची एक सुंदर तरुणी. तांबूस गोरा वर्ण, धारधार नाक, टपोरे डोळे, नाजूक जिवणी, कुरळे केस, सुडौल बांधा आणि अतिशय टापटीप राहणीमान याने ती कोणाचेही लक्ष वेधून घेत असे. डोंबिवलीला रहाणारी सविता दादरला एका सरकारी बँकेत नोकरीला होती. सविताचा स्वभाव मोकळा व बोलका होता त्यामुळे तिची पटकन कोणाशीही मैत्री जमायची. आपल्या याच स्वभावामुळे बँकेत तिच्याकडे “मे आय हेल्प यु” हा कौंटर सोपवला गेला होता. त्यामुळे तिचा लोकसंग्रह वाढत होताच आणि बँकेच्या ग्राहकांच्या संख्येत पण वाढ होत होती. याच ठिकाणी तिला राजेश भेटला. राजेश पंचविशीचा उमदा तरुण, दिसायला देखणा, दादरला शिवाजी पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणी राहणारा आणि एका खाजगी सोफ्टवेअर कंपनीत काम करणारा. राजेशला प्रथमदर्शनीच सविता आवडली. काहीतरी निमित्त काढून राजेश वरचेवर बँकेत येऊ लागला. सविताची व त्याची ओळख वाढू लागली. दादरला राहणारा असल्यामुळे राजेशच्या खूप ओळखी होत्या. आपल्या कंपनीतील मित्रांचे व दादरमधल्या ओळखीच्या माणसांचे रेफरन्स त्याने सविताला देऊन त्यांचे अकौंट तिच्या बँकेत उघडून घेतले होते. त्यामुळे सवितावर बँक व्यवस्थापक खुश झाले होते, तिचा बँकेने गौरव केला होता. अर्थात या मदतीसाठी राजेशचा हातभार होता त्यामुळे तिने त्याचे आभार पण मानले होते. या प्रसंगातून ते जास्त जवळ आले. आता ते एकमेकांची थट्टामस्करी पण करू लागले, अधूनमधून दोघेजण चहा कोफी घ्यायला तर कधी लंच डिनरसाठी निरनिराळ्या हॉटेलात जाऊ लागले. एकमेकांना काही निमित्ताने भेटवस्तू देणे सुरु झाले. मोबाईलवरुन मेसेज सुरु झाले. दोन तीन दिवस जरी बँकेत राजेश फिरकला नाही तरी सविताला त्याची उणीव भासत असे तर बँकेत आल्यावर राजेशची नजर पण सविताला शोधत असायची. आता सविताला बँकेत राजेशवरून चिडवणे पण सुरु झाले. सविताला पण राजेश आवडला होता. त्या दोघानाही जाणवले की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. आता सविता आणि राजेश यांच्या भेटी वाढू लागल्या एक दोन वेळा राजेशच्या घरी पण सविता गेली होती. राजेशला मोठी बहिण होती. तिचे लग्न झाले होते. तिच्या नवऱ्याचा माहीममध्ये होलसेल कपड्याचा मोठा बिझनेस होता. ते माहिमला राहात होते. राजेशचे घराणे खानदानी श्रीमंताचे. राजेशचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. राजेशच्या आईनेच दोन्ही मुलांना घडवले होते. राजेश आपल्या आईला खूप मानायचा. सविता पण राजेशचे श्रीमंती घर पाहून खुश होती. राजेश तिला आवडत होताच. शिवाजी पार्कच्या समुद्र किनाऱ्यावर एकांतात जेव्हा राजेशने तिला लग्नाबद्दल विचारले तेव्हा सविताला ते अपेक्षितच होते. तिने लगेच होकार दिला. नंतर दोघांनीही घरी सांगितले होते. सविताला एक छोटी बहिण होती, ती फर्स्ट इअर कौमर्सला होती. तिचे बाबा रेल्वे खात्यात नोकरी करायचे तर आई शिक्षिका होती. मुळात राजेश व सविता एकमेकाला अनुरूप होतेच त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळीनी त्यांच्या लग्नासाठी मोठ्या आनंदाने परवानगी दिली आणि गेल्याच आठवड्यात मोठ्या थाटात त्यांचा साखरपुडा झाला होता आता दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होते. आज अचानक राजेशचा ‘अर्जंट भेटायला ये’ असा आलेला मेसेज बघून न राहवल्यामुळे सविताने लगेच त्याला फोन पण केला होता पण राजेश फोनवर तुटकपणे ‘भेटल्यावर बोलूया’ असे बोलला होता.त्याचं फोनवरचं थोड तुटक बोलणं सविताला खटकलं होतं पण त्यावर ज्यास्त विचार न करता ती लगेच राजेशला भेटायला निघाली होती.
*********
सविता आणि राजेश दादरच्या त्यांच्या नेहेमीच्या हॉटेलमधे बसले होते. राजेश थोडा गंभीर दिसत होता तो सविताला म्हणाला “सविता मला पहिल्यांदा मला सांग काय ओर्डर करू तुझ्यासाठी ? मी नाश्ता करून आलोय मी कॉफी घेणारे”
“मी सुद्धा कॉफीच घेईन, पण राजेश अचानक बोलावलस, फोनवर पण काही बोलला नाहीस, काय झालय ? तू एवढा सिरीयस का दिसतो आहेस?” सविताने विचारले.
”हो सांगतो पण रागावू नको, मला सांग दोन दिवसापूर्वी तू माहीम मध्ये होतीस आणि तुझ्याबरोबर महेश होता?” गंभीरपणे राजेशने विचारले. सविता थोडी आश्चर्यचकित झाली. महेश तिचा बालपणापासूनचा मित्र होता, तिच्या शेजारीच राहायचा. लग्न ठरल्यावर जेव्हा राजेश डोंबिवलीला सविताच्या घरी आला होता तेव्हा सविताने आपण होऊन महेशची ओळख करून दिली होती.
“अरे तू आला होतास आमच्याकडे तेव्हा मी ओळख नव्हती का करून दिली महेशशी ? मित्र आहे तो माझा पण त्याच काय ?”
“अग ताईने आणि जीजाजीनी तुला आणि महेशला हॉटेलमध्ये बघितले, तुम्ही लंच घेत होता, हसत खेळत गप्पा चालल्या होत्या तुमच्या. ताईला धक्काच बसला. जिजाजी संतापले. कालच ताई आली होती आमच्याकडे. आईला कळल्यावर आई खूप भडकली रात्रीच तुमच्या घरी फोन करणार होती. नशिबाने मी होतो, मी थांबवलं त्यांना. म्हटलं अग तो तिचा कोणी नातेवाईक असेल मी विचारीन तिला मग त्या शांत झाल्या. सविता मी तुला सांगितलं होत ना माझी आई थोडी जुन्या वळणाची आहे तेव्हा आपल्या लग्नानंतर तुला वागताना काळजी घ्यायला लागेल. आता मी सांभाळून घेतलय. तेव्हा तू आईला सांग तुझ्याबरोबर तुझा दूरचा भाऊ होता म्हणून, त्याने आईचे समाधान होईल. तू मात्र यापुढे काळजी घे” राजेश सविताला समजावत म्हणाला. मात्र राजेशच बोलण ऐकून सविताला खूप मोठा धक्का बसला. ती म्हणाली “ राजेश अरे महेशने त्याच लग्न ठरवलंय. तिला भेटायला गेलो होतो आम्ही. दुपारी जेवायची वेळ होती आम्ही गेलो हॉटेलात लंचला यात कसली आली आहे अमर्यादा? तू का खोट बोललास? मी काही लपवलं नाही तुझ्यापासून, तुला सर्व माहित आहे. मला लोकात मिसळायला आवडत. मला जशा मैत्रिणी आहेत तसे मित्र पण आहेत. माझ्यावर विश्वास ठेव अरे, प्रेम मी फक्त तुझ्यावर केल आहे, तेव्हा तुला खटकतंय का माझं वागण ? महेश तर माझा बालपणापासूनचा मित्र आहे”.
“सविता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग पण लक्षात घे मी माझ्या आईला खूप मानतो,तिला हे नाही चालणार. मी तिला नाही दुखवू शकत. त्यामुळे तुला आपल्या प्रेमासाठी, माझ्यासाठी मी सांगतोय तस वागावं लागेल”. राजेश तिची समजूत घालत म्हणाला.
“राजेश, अरे नवीन नाती जुळली की जुनी नाती तोडून टाकायची का? स्त्रीच्या वागण्याच्या मर्यादा मी चांगल्या जाणते व मी कधीच मर्यादा सोडून वागले नाही आणि वागणारही नाही. पण तुझ्याशी माझे लग्न झाले म्हणून मी माझे एखाद्याशी असलेले निर्मळ मैत्रीचे नाते तोडून टाकू ? आता सविता थोडी संतापाने म्हणाली.
“अग माझ्यापेक्षा तुला महेश महत्वाचा आहे का? मी एवढ कळकळीने सांगतोय त्याच काहीच नाही का? अग माझ्या आईला नाही चालणार लग्न झाल्यावर तुला कोणी मित्र असलेला. ती म्हणते मैत्री केव्हा मर्यादा सोडेल याचा नेम नाही, त्यामुळे लग्नानंतर तुला एकच मित्र तो म्हणजे मी. माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला ही तडजोड करावी लागेल” नकळत सविताला राजेशच्या स्वरात एक हुकुमत जाणवली.
“शी,किती बुरसटलेले विचार आहेत हे ? कोणत्या काळात आहात तुम्ही ? आणि राजेश तुझ्यासारख्या कॉर्पोरेट कल्चर मध्ये वावरणारया माणसाला हे सर्व पटत? आईच सोडून दे, आपल्या बायकोला मित्र असू नये हे तुझ सुद्धा मत दिसतेय” सविताचा राग आता अनावर होत होता.
“मला काय पटत ते या क्षणाला महत्वाचं नाही. माझ तू ऐकणार आहेस की नाही?” राजेश पण थोडासा चिडून बोलला.
“राजेश मला नाही वाटत मी काही गुन्हा केलाय आणि खोट का बोलायचं? लग्नानंतर मी माझ्या मित्राशी बोलले तर ते तुमच्या घरी चालणार नाही?” सविताने विचारले.
“सविता एक लक्षात घे, तुझ्या या हट्टापाई आई आपलं लग्न मोडू शकते मग मला पण नाही तुझा बचाव करता येणार, आपल नात तुला तुटलेल चालेल? एवढा तो महेश महत्वाचा आहे का तुला ? अग साखरपुडा झालेल्या मुलीच लग्न मोडल तर काय होत याची कल्पना नाहीये तुला. त्यातून तुला एक छोटी बहिण आहे, तिचं लग्न जमण पण मुश्कील होईल. तुझ्या आईवडिलांचा, बहिणीचा तरी विचार केलायस का तू?” राजेशचा पारा पण आता चढला.
राजेशच्या या उद्गारांनी सविता हादरली. तिचा खूप मोठा अपेक्षाभंग केला होता राजेशने. नकळत त्याच्या मनाची एक वेगळीच खिडकी उघडली गेली होती. एका निश्चयी स्वरात ती राजेशला म्हणाली “वा राजेश, नाते टिकवणे, त्याग करणे ही सर्व माझीच जबाबदारी समजतोयस तू. एवढ्यावरून तू नात तोडायला निघालास, अरे अजून लग्न नाही झालय आपल पण नवरेशाही गाजवतोयस, आपल नात तुटल्याच तुला काहीच वाटणार नाही का? एका अर्थाने बर झालं, मला आधीच सगळ समजल नाहीतर लग्नानंतर माझी घुसमट झाली असती. पण आता मलाच हे लग्न नको आहे. हे सांगताना मला दुःख होतंय कारण मी मनापासून प्रेम केले होते तुझ्यावर. पण लग्नानंतर सतत तडजोड करीत दडपणाखाली जगायला मला नाही आवडणार. माझी खूप घुसमट होईल. माझा हा निर्णय मी माझ्या घरच्यांना समजावेन त्यांना थोडं वाईट वाटेल पण माझी बाजू ते नक्की समजून घेतील. आपलं लग्न न होण हेच योग्य आहे अस मला वाटत. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!” हे बोलताना तिचे डोळे थोडे भरून आले होते आणि एका वेगळ्याच आवेशात सविता हॉटेलच्या बाहेर पडली. तिचं हे बोलण आणि कृती राजेशला पूर्णतः अनपेक्षित होती. तो गोंधळून गेला, तिला थांबवावे याचे भान पण त्याला राहिले नाही एक टक तो सविता गेलेल्या दिशेने बघत राहिला …….
(कथेतील पात्रे प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत)
(ही माझी कथा २८ जुलै २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे.)
विलास गोरे
९८५०९८६९३४
Leave a Reply