अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेली ही कथा.
खिडकीतून नजरेस पडणारी सूर्याची लालबुंद चकती एव्हाना क्षितिजाआड लुप्त झाली होती. आकाशात चंद्राची चंद्रकोर डोकं वर काढीत होती. ताऱ्यांचा अंधूक प्रकाश धुक्यातून वाट काढीत आल्यासारखा वाटत होता. कातरवेळेने परिसराचा कब्जा घेतला होता. तोच दरवाजाची बेल वाजली. मम्मीने दार उघडलं. महेश कामावरून परतला होता. येतायेताच त्याने विचारलं, “रुबी कुठाय?”
“ती झोपते आहे. प्रिया तिला तुमच्या बेडरूममध्ये झोपवते आहे.”
“अन पप्पा कुठे दिसत नाहीत ते.”
“त्यांनी आजपासून नवी नोकरी घेतली आहे. मी त्यांचीच वाट पाहत आहे.”
“नवी नोकरी? पण कशाला? ते निवृत्तीच्यावेळी म्हणत होते की त्यांचे पेन्शन आणि एफ.डी. वरचे व्याज पुरेसे आहे म्हणून.’
पण पप्पांनी ममीला किंचित कल्पना दिली होतीच. तीही अंतर्यामी दुखावली होतीच, ती काही बोलली नाही.
तोच दरवाजाची बेल वाजली. पप्पा कामावरून आले होते. एरवी, ते बाहेरून येतायेताच ‘माझी शोणूली कुठे आहे?’ अशी हाळी देतच घरात घुसत. बेबी देखील त्यांच्या हाकेने सजग होत जोरजोरात हातपाय हलवित आपला आनंद व्यक्त करी. ‘आजू’ने आपल्याला कवेत घेऊन आपले लाड करावेत म्हणून ती उतावीळ होई… तिचा ‘आजू या बोबड्या हाकेसाठी पण तिला कितीतरी लाडक्या नावांनी पुकारीत असत.
‘माझी सोनुली’.
‘माझी छकुली’.
‘माझी परीराणी’.
‘माझी सानुला’.
‘माझे लबाड लाडके डोंगर’.
‘My Barbie Doll
‘My Twinkle Little Star,
My little Princess…
पण पप्पा आज मुकेमुकेच होते. महेशकडे बघत, ‘लवकर आलास वाटतं’ असं रूक्षपणे विचारत ते आपल्या खोलीत घुसले.
“तुम्ही सोनुलीला माझ्यापासून तोडणारच आहात, तेव्हा तिला माझा आणि मला तिचा लळा न लागलेलाच बरा अन्यथा, ते आम्हाला दोघांना खूप त्रासदायक ठरेल,” महेशला पप्पांचे शब्द आठवले. तो कटू प्रसंग आठवताच महेश विमनस्क झाला. पण प्रियाच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला होता. एरवी नातीबाबत पप्पांचा उत्साह किती उतू जायचा, रुबीच्या आगमनाची चाहूल लागली होती तेव्हा ते किती हरखून गेले होते. लाडक्या नातीसाठी काय करू नि काय नको, असे त्यांना होऊन गेले होते. अंगाई गीते, बडबड गीते, गोष्टी, खेळणी त्यांनी जमा करून ठेवली होती. मागे, काश्मीरला गेले होते तेव्हा छकुलीच्या पायात बसतील अशा नक्षीदार चपला घेऊन आले होते.
“आता मी काही कामधाम करणार नाही, नुकत्याच निवृत्त झालेल्या पप्पांनी तेव्हा जाहीर करून टाकले होते. ते एका खाजगी कंपनीत मोठ्या अधिकाराच्या पदावर होते. ‘सोणूली माझा फुलटाईम जॉब बरं का!’ त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उतू जात होता.
आठवड्यापूर्वीची गोष्ट. महेश पप्पांना काहीतरी आडून आडून बोलायचा प्रयत्न करीत होता, “तुला जे काही सांगायचे आहे ते आडून नको बोलूस. आपली मते स्पष्टपणे सांगायची हा या घरचा शिरस्ता आहे.”
“हो पप्पा, प्रिया म्हणते आपण वेगळे राहू या.’
“हो का? अन ते का बरं?”
“ती म्हणते, मग आपण रुबीला आधुनिक पद्धतीने वाढवू शकू. आता तुमचे ठीक आहे, हो. पण ममी शिकलेली नाही ती किती वेंधळी वागते त्यामुळे आमच्या बेबीवर गांवढळ संस्कार होतील. ममी रुबीला झोपवताना ती कसली गाणी म्हणते.”
‘रमदाये माते, ऐक माझा गाराना’… किंवा ‘मुगले मुगले नासला’… All Bullsheet,
“पण तू तर त्याच गाण्यांवर वाढला होतास,” असे पप्पा म्हणणार होते. पण ते चूप बसले, हे सारे निमित्त, हे त्यांना कळून चुकले होते. खरे तर महेशने आपल्या आईविषयी जे उद्गार काढले होते, ते ऐकून त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली होती. पण ते संयमी होते आणि कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा ते टाळत. मागे, एकदा त्यांच्या मित्राच्या मुलाने बायकोचे ऐकून वृद्ध आई-वडिलांना वेगळे केले होते, तेव्हा पप्पांनी त्या मुलाची बैल म्हणून निर्भर्त्सना केली होती. चांगल्या संस्कारात वाढलेला आपला मुलगादेखील त्याच पातळीचा निघाला याचे पप्पांना मनस्वी दुःख होत होते.
“असं म्हणतोस, मग ठीक आहे.’ पण इतक्या सहजपणे आपला प्रस्ताव मान्य करतील असे त्याला स्वप्नात देखील वाटले नव्हते. कधी एकदा प्रियाला ही खूषखबर सांगतो असे त्याला झाले. तरीही एक महत्त्वाचा मुद्दा बाकी होता.
“पप्पा, आपल्याकडे दोन फ्लॅट्स आहेत. मागे तुम्ही निवृत्त झालात तेव्हा सांगितलं होतं त्यातला एक मला आणि एक रुनाताईला देणार म्हणून,” महेशने खडा टाकला. ते त्याला प्रियाने पढवून ठेवले होते. कारण शहरात फ्लॅटच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. वेगळा फ्लॅट घेणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. भाड्याने घर घेणेसुद्धा परवडणारे नव्हते.
“हो मी तेव्हा असं म्हणालो होतो खरं पण तुम्हा भावंडांना ते फ्लॅट्स मी आणि ममी गेल्यानंतर मिळतील. तसा उल्लेख मी माझ्या मृत्युपत्रात करून ठेवला आहे… ‘हे फ्लॅट्स घेताना मी माझ्या प्रॉव्हिडंड फंड उचलला होता आणि तुझ्या ममीने आपले दागिने बँकेत गहाण ठेवले होते. हे तुझ्या बायकोला सांगितले होते का?” महेशने पप्पांच्या रोखलेल्या तीक्ष्ण नजरेतले भाव ओळखले होते.
“पण पप्पा… आम्ही राहणार कुठे?”
“दॅट इज युवर प्रॉब्लेम. निर्णय तुमचा आहे त्यानुसार तुम्ही सोय केलेली असणारच.”
पप्पांच्या सडेतोड उत्तराने महेश निरुत्तर झाला. हे प्रकरण वाटले होते तेवढे सोपे नाही हे त्याला समजून चुकले होते.
“तरीही तुम्ही ममीशी बोलून ठरवा ना!” काहीसा नर्व्हस होत महेश म्हणाला.
“त्याची काही गरज नाही. फारतर तुम्हाला आमचा तो दुसरा फ्लॅट सध्याच्या बाजारभावाने भाड्याने मिळेल. रीतसर करारपत्र करून…’
आपले मनसुबे धुळीस मिळत आहेत हे पाहून प्रियाने खूप धूसफूस केली. तिला फ्लॅट घेऊन देण्याइतका तिचा बाप भोळसट नव्हता. तिच्या डॅडींनं तिला तसं निक्षून सांगितलं होतं. महेशला हे प्रकरण नीट हाताळता आलं नाही म्हणून तिनं त्याला दोष दिला. घरात तर सन्नाटाच पसरला. पप्पा आपल्या स्वत:ला खोलीत कोंडून घेऊ लागले. रुबीच्या रडण्याचा आवाज आला की त्यांचा जीव तळमळे. मग वेळ जाण्यासाठी त्यांनी नोकरी घेतली. आपल्या ज्ञानाचा वापर होईल आणि चार पैसे हाती येतील हा हेतू होता. पण घरातला नितळपणा दूषित झाला होता. महेश खूप अस्वस्थ झाला होता.
महेशने सेल बाहेर काढला आणि एक मेसेज टाईप केला, ‘My apology, Pappa.’
‘पण नक्षीदार काचेला तडा गेला ती चीर कायम नजरेस पडते, त्याचं काय? तू भिंतीवर खिळा ठोकला आहेस व तो आता जरी उपटून काढला तरी भिंतीवर पडलेली खाच ही मागे असणारच… त्याला उत्तर आले.
-जोसेफ तुस्कानो
मोबाईल क्र. : ९८००७७८३६
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply