जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग एकोणीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शब्दाने शब्द वाढवू नये.
अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो. रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल.
ही जगाची रिती आहे. जगायची नीती आहे.
आणि गरज नसताना शब्दाने शब्द का वाढवावा ? याने भांडण वाढते. भांडण मिटवायचे असेल तर एकाने तलवार काढली तर दुसऱ्याने ढाल स्विकारावी. म्हणजे भांडण मिटते.
उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये. या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !
उंबरा हा घराला असतो. उंबरा ही घराची सुरवात आहे.
बाहेरील काही सरपटणारी जनावरे दरवाजा आणि त्याखालील जमिनीच्या फटीतुन आत येऊ नयेत, यासाठी घराच्या पुढील आणि मागील मुख्य दरवाज्यांना उंबरठा असतो. म्हणजेच उंबरा हा घराचे एका अर्थाने संरक्षण करीत असतो.
घर हे सर्वांचेच असते. घरात राहून काम करणाऱ्यांचे आणि घराबाहेर राहून घरासाठी राबणाऱ्यांचे. मग ती स्त्री असो वा पुरूष. आणि हो, घराच्या मर्यादाची काही लिखित संहिता नाही की, उंबरठ्यावर बसून नियम तपासून घरात प्रवेश. घराच्या मानमर्यादांचे उल्लंघन होऊ नये, एवढंच. या मानमर्यादा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतील. काही जणांच्या कपड्यांच्या, काही जणांच्या सोवळ्याच्या, काही जणांच्या डोक्यावरून पदर घेण्याच्या तर काही जणांच्या चेहेरा सुद्धा झाकून घेण्याच्या या परंपरा त्या त्या घरानुसार पाळल्या गेल्या पाहिजेत. इथे त्या घराचा आत्मसन्मान, समाजातील स्थान, लपलेलं असतं. जसं एखाद्या डाॅक्टरकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. त्याने नीटनेटके कपडे घालावेत, जरा चांगले दिसावे, त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे. हे चुक नाही. समजा, एखादा डाॅक्टर आडव्या चट्यापट्याचा शर्ट, शर्टची वरची दोन बटणं उघडी, डोळ्यावर मल्टीकलर गाॅगल, पान चघळतोय, केसांचा स्पाईक, खांद्यावर रूमाल आणि स्वतः रिक्शा चालवित, ओपीडी मधे आला तर वेटींगमधे बसलेल्या रुग्णांना कसे वाटेल ? त्यांच्या मनातील डाॅक्टर या प्रतिष्ठेला धक्का बसेल.
अशीच प्रतिष्ठा प्रत्येक घराला जोडलेली असते. घराला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला जोडलेली असते. घराची ही प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे.
घराच्या उंबऱ्याचे हे नियम गृहीत धरलेले असतात. आणि तसं बघायला गेलं तर हे नियम कुठे आहेत? घराचा उंबरठा ही घराची प्रतिष्ठा आहे. तुम्ही असं काही करू नका, ज्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचेल, असं खरं तर म्हणायचं असतं आईला !
पण आता घराला उंबरेच कुठे दिसतात ? तेच तर गायब झालेत आणि त्याबरोबर घराची प्रतिष्ठा देखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply