जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सव्वीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आई तेच सांगतेय, जे आयुर्वेदातील ग्रंथकार सांगत आहेत फक्त काळाचा आणि त्यामुळे शब्दांचा फरक पडलाय एवढंच.
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
मनावरचा प्रत्येक ताण हा त्याच क्षणाला स्नायुपर्यंत पोचत असतो. आणि तिथेच राहतो, जोपर्यंत तो मनातून जात नाही. असे असंख्य ताण मनावर साठलेले असतात, याचा ताण स्नायुंना सहन होत नाही. मग एखादा स्नायु आखडला जातो. किंवा ताणला असेल तर त्याच अवस्थेत राहतो. मग वेदना निर्माण होते. ही वेदना मनातून, ताणातून निर्माण झालेली असल्याने नुसत्या वेदनाशामक गोळ्या खाऊन, या मनातील वेदना कशा कमी होतील ?
अनेक रुग्ण वेदना हे लक्षण घेऊन जेव्हा वैद्यांकडे जातात, तेव्हा त्या वेदना शरीरातील कारणामुळे निर्माण झालेल्या आहेत की मानसिक कारणामुळे, हे शोधून काढावे लागते. नुसत्या व्हिटामिनच्या गोळ्या खाऊन या वेदना कधीच कमी होत नाहीत. त्यासाठी वेदनेच्या मुळापर्यंत जाऊन पोचणे आवश्यक आहे.
समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही, एवढी सावधानता बोलताना बाळगली तर अनेक वेदना निर्माण होण्यापूर्वीच आपण थांबवू शकतो.
माहेरचे अति कौतुक जसे मुलीने करू नये, असे आईला वाटते, तसेच मुलाच्या आईने पण आपल्या मुलाला हे सुनावले पाहिजे की, सांगे वडीलांची किर्ती, तो एक मुर्ख. आपण आपल्याच घराण्याचे कौतुक उगाळण्याची काही आवश्यकता नसते. जो काही पुरुषार्थ दाखवायचा आहे, तो स्वकर्तृत्वावरच दाखवावा म्हणावं. बापजाद्यांच्या किंवा पिढीजात पुण्याईमुळे जे काही मिळाले आहे, त्याची टिमकी वाजवायची काही गरज नाही.
छत्रपती संभाजी राजेंना समर्थ रामदास स्वामींनी केलेला उपदेश इथे लक्षात घेण्यासारखा आहे. शिवरायांच्या पश्चात शंभूराजे अस्वस्थ होते, त्या अस्वस्थपणामुळे काही निर्णय चुकीचे घेतले जात आहेत, असे जेव्हा समर्थांच्या कानी गेले, तेव्हा एक खरमरीत पत्र समर्थांनी, वडीलकीच्या नात्याने शंभूरायांना लिहिले.
“पाणवठी तुंब निघेना” अशी सुंदर उदाहरणे देऊन शेवट “तरीच म्हणावे पुरुष” इथपर्यंत केलेली कानउघाडणी प्रत्येक पुरुषाने अभ्यासली पाहिजे. संसार स्वतःचा असो वा जगाचा, आत्मभान जागृत ठेवले गेले पाहिजे.अन्यथा विनाश अटळ आहे.
ही समिक्षा, हा विवेक सतत जागृत हवा. म्हणजे देहाचे असो, वा देशाचे आरोग्य चांगले राहातेच. प्रत्येकाचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून केलेला उत्सव हा सगळ्यांनाच कल्याणकारी असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१५.०८.२०१७
Leave a Reply