जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग पंचवीस
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
पाचकळ बाचकळ बोलू नये
ज्या बोलण्याचा काहीच फायदा होत नसतो, ते बोलण्यात उगाच वेळ घालवू नये. आपल्या बोलण्यातून दोन अर्थ निघतील, असं पाचकट बोलणं झालं तर ऐकणारा तुमची वैचारिक पातळी ओळखतो. आपणच आपली किंमत कमी करून घेत असतो. म्हणून कधी पाचकट बोलू नये.
बाचकळ म्हणजे बालीश बोलणे करू नये. आपली पत, आपली योग्यता, आपला व्यवसाय, आपल्या समाजातील मानाच्या स्थानाला कधीही धक्का पोचेल असे आपले बोलणे करू नये, विशेषतः बालीशपणाने पण बोलू नये. आपल्या बोलण्याने आपल्याच माणसाची मानहानी होईल असे वागू नये. वेळ काळ पाहून बोलावे.
फिदी फिदी उगा हसू नये
चार चौघात असताना उगाच गरजेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात हसू नये, याने खरंतर आपलेच हसे होत असते.
भोकाड मोठे पसरू नये
रडणे हा जरी मनावरचा ताण कमी करणारा वेग असला तरी त्याचे उदीरण किंवा प्रवर्तनाचे नाटक होऊ नये. रडण्यामुळे मनावरचा ताण हलका होतो. पण अति सर्वत्र वर्ज्ययेत या न्यायाने मोठ्या आवाजात रडू नये. आपले रडणे चार भिंतींच्या आत असावे. ते पलिकडील भिंतीला कळले की तिसऱ्या कानाला सुद्धा आपोआपच समजते. आणि भिंतीच्या कानाचे ओठ होतात, आणि ते बोलू लागतात.
फुकाचे बोल बोलू नये
वांझोट्या चर्चा करून काहीही साध्य होत नाही. ज्यातून काहीही निष्कर्ष निघण्याची शक्यताच नसते, अशा गोष्टी करून काय साध्य होणार असते ?
समर्थ म्हणतात, अशा ठिकाणी आपली बुद्धी वेळ आणि पैसा संपवू नये.
धकाधकीचा मामला
कैसा घडे अशक्ताला ……..
जो वैचारिक दृष्टीने अशक्त आहे त्याला विज्ञानातील मोठे मोठ्या जड शब्दांचे अर्थ कसे समजणार ?
प्रयत्न कधी सोडू नये.
सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील रहावे. नवनवीन पद्धतीने कार्य करावे. शंभर घाव घातले की फुटणारा दगड नव्याण्णव घाव घालून फुटत नाही, आता काही होणार नाही, असे म्हणून प्रयत्न थांबवणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. मागाहून येणारा एकमेव शेवटचा घाव दगडावर घालतो आणि त्याच्या एका घावाने दगड फुटतो. म्हणून प्रयत्न कधी सोडू नयेत.
प्रयत्न सोडणे म्हणजे जगण्यावरील विश्वास सोडून देणे. हे जे आई मुलांना सांगते त्यात आईचे काय चुकले ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply