जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेअडतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग बत्तीस
बाबा सांगतात…
देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये. आणि कठोर शब्दांनी बोलू नये.
राजाला योग्य तो मान दिलाच पाहिजे. जरी लोकशाही असली तरी तो लोकमान्य लोकनेता आहे. हे विसरून चालत नाही.
दारी आलेला याचक ओळखून त्याला यथाशक्ती मदत करावी. तो किती मागतोय, यापेक्षा माझी दातृत्व शक्ती किती आहे, हे एकदा तपासून पहावे. काळाची पावले ओळखून, काहीवेळा “नाही” म्हणायलादेखील शिकले पाहिजे.
अतिथी म्हणजे ज्याची येण्याची आणि जाण्याची तिथी निश्चित नसते. म्हणजे न सांगता येतो आणि न सांगता जातो. सांगून येतो तो “पाहुणा” !
या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे.
अतिथी आणि याचक यांच्यातही फरक आहे. अतिथी हा आपल्या परिचित असतो तर याचकाची मर्यादा दरवाज्यापर्यंतच असतो. याचक काहीतरी मागण्यांसाठीच आलेला असतो. अतिथीची अशी काही अपेक्षा असत नाही.
वनवासामधे जाताना कोळ्याच्या घरी रामराया राहिले होते, ते अतिथी म्हणून. आणि सीता हरण करण्यासाठी रावण सीतेच्या पर्णकुटीपर्यंत आला होता, तो याचक बनून !
सांगायचं काय तर या दोघांचाही योग्य तो मान राखला पाहिजे. बदलत्या काळानुसार यातील फरक लक्षात यावा म्हणून उदाहरण दिले.
महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मणाने आखून दिलेल्या रेषेचा भंग होऊ नये. आजच्या काळात ही लक्ष्मणरेषा म्हणजे आपल्या बॅक अकाऊंटचा पासवर्ड म्हटला तरी चालेल.
ही रेषा फक्त सीतेसाठीच आहे, असे नाही. तर सर्वांसाठीच आहे. या रेषेचे महत्त्व सर्वांनीच लक्षात ठेवावे, म्हणजे झाले. कारण आज समाजात रामापेक्षा रावणांची संख्या वाढली आहे. कोणाला किती जवळ करावे, हे ओळखता येणे कठीण आहे. कोण कसे फसवेल हे समजणे पण कठीण झाले आहे. सज्जन आणि दुर्जन ओळखणे कठीण झाले आहे.
ज्या शब्दात आपण बोलतो ते शब्द कोणाला दुखावणारे असू नयेत. आपला अपमान झाला अशी भावना कोणाच्या मनात तयार होऊ नये, असे शब्द असावेत. बोलताना सूर, ताल आणि त्यामुळे बदलणारे शब्दांचे अर्थ यानी अनर्थ होतात, हे बोलण्यापूर्वीच लक्षात ठेवावे. कारण एकदा बाहेर पडलेला शब्द ( आणि वाॅटसपवरील एन्टर केल्यानंतरचा मेसेज ) काही झाले तरी मागे घेता येत नाहीत.
आपण दुसऱ्याला कधी फसवू नये, पण आपण दुसऱ्याकडून फसवले जाणार नाही, एवढा शहाणपणा आपल्या अंगी नक्कीच बाणवावाच लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply