जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस
बाबा सांगतात…
आपले नुकसान करणाऱ्या शत्रुवरही प्रायः उपकारच करावा.
यातील “प्रायः” हा शब्द महत्त्वाचा ! या शब्दाला विशेष महत्त्व आहे. हा शब्द नसता तर अनर्थ झाला असता. आजच्या भाषेत गांधीगिरी करावी.
महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील झालेल्या युद्धांचा विचार करता, पहिल्या अनेक युद्धात महंमद हरला. त्याने माफी मागितली आणि पृथ्वीराजने ती माफी दिली. त्याला जिवंत सोडले. शेवटच्या युद्धात मात्र घौरी विजयी झाला आणि त्याने कोणत्याही प्रकारे दयामाया न दाखवता पृथ्वीराज चौहानला ठार केले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, हे सूत्र खरंतर घौरीने आम्हाला शिकवले.
आणि नंतर शिवरायांनी प्रत्यक्षात अंमलात आणले. प्रचंड ताकदीच्या, धूर्त, कपटी अफजलला कपटानेच ठार मारले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, भरवसा ठेवू नये, कधी गाफील राहू नये, आपले आणि आपल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी ‘डिप्लोमसी’ करावी लागली तरी चालेल. पण शत्रूवर कधीही उपकार करू नयेत. मिडीयाला सांगताना मात्र हेच सांगावे, की कट्यारीचा पहिला वार त्याने केला म्हणून स्वसंरक्षणार्थ मला वाघनखे वापरावी लागली. नाहीतर आम्ही अहिंसेचेच पुजारी आहोत. आम्हाला हिंसा करणे कधीही आवडत नाही. किंबहुना ती आमच्या रक्तातच नाही. म्हणूनच तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही युद्धाची सुरवात भारताने केलेली नाही. पण कधीतरी सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही देखील शिवरायांचे वंशज आहोत, हे दाखवलेच पाहिजे. शिवरायांना युद्धनीतीचे आदर्श मानणाऱ्या लढाऊ इस्राईल सारख्या छोट्याश्या देशाकडून, शत्रूशी कसे वागावे, हे आपल्या देशातील राजकीय मंडळीनी शिकण्यासारखे आहे. अशा शिवरायांकडून “”प्रायः” शब्दाचा अर्थ आम्हाला समजला.
संपत्ती आणि विपत्तीमधे एकच चित्तवृत्ती ठेवावी.
संपत्तीचा अभिमान जरूर असावा, पण माज असू नये. विपत्ति आली तरी बुद्धी स्थिर रहावी. तिचा तोल ढळू देऊ नये. म्हणजे कितीही श्रीमंत असली तरी अंतिम क्षणी आपल्यासाठी मांजरपाटाचाच तुकडा येणार आहे हे विसरू नये.
एखाद्याच्या चांगल्या गुणाविषयी इर्षा करावी.
थोडेसे विपरीत वाटणाऱ्या या वाक्यातील मुळ अर्थ लक्षात घेऊया. इर्षा हा वाईट गुण सुद्धा चांगला बनवण्यासाठी दृष्टीकोन बदलला पाहिजे. इथे इर्षा हा शब्द “स्पर्धा” या अर्थाने वापरलेला आहे. स्पर्धा चांगल्या गुणांची करावी. आपल्यात एखादा चांगला गुण कमी असेल, तर दुसऱ्याकडून तो आत्मसात करावा. शिकून घ्यावा.
शिकण्याची तयारी असेल तर शत्रूकडूनही शिकता येते. फक्त शिकण्याची आपली तयारी हवी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply