जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंधरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आप्त म्हणजे जाणकार.
ही जाणकार मंडळी सांगतात, तान्ह्या बाळांना अंगाला तेल लावावे, कानानाकात तेल घालावे, ताळु भरावी, हाता पायाला तेल चोळावे.
प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी लहान मुलांना दिवसातून दोन वेळा तेल लावणे, तेल लावल्यावर बाहेरचा वारा लागू न देण्यासाठी त्यांना मऊ कपड्यात गुंडाळून ठेवणे, डोक्यावरची ताळु भरण्यासाठी ब्रह्ररंध्राच्या दिशेत चारही बाजूने तेल लावणे, वर कापसाचे वा विड्याचे पान ठेवून त्यावर टोपरे बांधणे इ. सर्व गोष्टी पूर्वी केल्या जायच्या. पण आज या सर्व गोष्टी कालबाह्य, अंधश्रद्धा म्हणून उपेक्षित झाल्या आहेत.
त्यातल्या त्यात एक बरे आहे,” हे असले नको ते उद्योग अजिबात करू नका” म्हणून सांगणाऱ्या भारतातील पाश्चात्य शिक्षणाने प्रभावीत झालेल्या तज्ञ डाॅक्टर मंडळींना त्यांच्या लहानपणी हे सर्व ( नको उद्योग ) केले होते, त्या आप्त आया आणि बाया अजूनही पुरावा म्हणून हयात आहेत.
लहान मुलांच्या अंगाला तेल लावणे ही एक कला आहे. हे शिक्षण जगातले सोडूनच द्या, भारतात देखील अजूनही कोणत्याही आयुर्वेद महाविद्यालयात दिले जात नाही. हे ज्ञान देण्यासाठी आपल्याकडे या ज्ञानाने समृद्ध असलेल्या आप्तांची संख्या सुदैवाने चांगली आहे.
जसे, आता उत्तम गुणांच्या, मूळ भारतीय बियांणाचे वाण संपत आलेले आहे, तसे या भारतीय परंपराचे ज्ञान जपून शिल्लक ठेवण्यासाठी या आप्त मंडळींची आवश्यकता आहे. ही मंडळी कदाचित निरक्षर अंगठेबहाद्दर असतील, कदाचित सही सुद्धा करता येत नसेल, त्यांना कदाचित आपण करत असलेल्या कृतीमागील शास्त्र काय आहे, हे शास्त्रीय वैज्ञानिक भाषेत सांगता येणार नाही. पण त्यांच्या राकट हातातील ही हळुवार कला जपणे आणि जोपासणे, त्याला संरक्षित करणे, संवर्धीत करणे हे भावी सुदृढ बलवान भारताला आवश्यक आहे.
आरोग्याशी संबंधित असलेल्या या अशा प्रत्येक गोष्टीमागे दडलेले शास्त्र, वैज्ञानिक दृष्टीने समाजासमोर आणणे आणि पुनर्स्थापित करणे ही काळाची गरज आहे.
ही आपली सर्वांची जबाबदारी आहे…..
……संपूर्ण भारत निरोगी होण्यासाठी, आप्त बनत चाललेल्या वैद्य म्हणवून घेणाऱ्या, अंगी सुप्त गुण असलेल्या गुणवान वैद्यांची देखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०४.०८.२०१७
Leave a Reply