शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील . आजपर्यंत केसगळतीपासून ते कर्करोगापर्यंत हरेक समस्येवर जालीम उपाय म्हणून सुचविल्या जाणाऱ्या या उपायांची जागा कोरोनाच्या साथीपासून एक गोष्ट बळकावू लागली आहे ती म्हणजे ‘ इम्युनिटी ‘ किंवा ‘ रोगप्रतिकारशक्ती ‘ ! पण गंमत अशी आहे की , आजार होऊ नये यासाठी लागणारी जी शरीराची शक्ती , ती मिळवणे हे अशा प्रकारे काही मिनिटे , तास किंवा आठवड्यात साध्य करता येण्यासारखे नाही ‘पी हळद अन् हो गोरी ‘ हे रोगप्रतिकारशक्तीबाबतही खरे होत नसते . त्यामुळे ही शक्ती वाढवायची तर त्यासाठी करायच्या प्रयत्नातही सातत्य हवेच .
एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती ही त्या व्यक्तीला आजारांपासून दूर ठेवणे आणि एखादा आजार झालाच तरी तो फारसा त्रासदायक न ठरता लवकरात लवकर बरा व्हावा या दोन्हीसाठी कार्यरत असते . याचाच अर्थ असा की , रोगप्रतिकारशक्ती ही स्वास्थ्य निर्माणाचे कार्य करीत असल्याने स्वास्थ्य मिळविण्यासाठीचे , टिकविण्यासाठीचे जे उपाय तेच रोगप्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी आणि वाढविण्यासाठीचेही मूलभूत उपाय आहेत .
कोणताही रोग तुमच्या शरीर , मन आणि इंद्रियांवर कितपत कब्जा करेल हे तुमचे शरीरातील तीन योद्धे किती ताकद आणि सामग्री बाळगून आहेत यावर अवलंबून असते . त्यामुळे एखाद्या रोगाशी सामना करताना आपला विजय व्हावा आणि स्वास्थ्य मिळावे असे हवे असेल तर या तिन्ही योद्ध्यांना सुयोग्य आहार , विहार आणि उपक्रमांच्या आधारे योग्य ती रसद पुरवून , नित्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे गरजेचे असते . याकरिताच , स्वास्थ्यवर्धक उपायांमध्ये नित्यक्रमातील गोष्टींना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे .
आयुर्वेदात या सर्व घटकांचा समावेश ‘ स्वस्थवृत्त ‘ या विषयांतर्गत केला जातो . रोजच्या रोज , दिवसरात्रीनुसार वातावरणात घडणाऱ्या बदलांचा स्वास्थ्य वाढवण्यासाठी वापर करून घेता यावा यासाठी दिनचर्या नावाने काही विशिष्ट नियम आणि स्वास्थ्यवर्धक उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत . दिवसभरात एखाद्या व्यक्तीने काय करायला हवे , कधी करावे , किती प्रमाणात करावे या सर्वांबाबत सखोल विचार आयुर्वेद करतो . दिनचर्येचा भाग असणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे उपक्रम पुढे थोडक्यात पाहू .
• सकाळी उठण्याची वेळ – आयुर्वेदानुसार ब्राह्म मुहूर्त ही सकाळी उठण्याची सुयोग्य वेळ आहे . हा मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण दीड तास . भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साधारण ४.३० ची वेळ .
• शौचविधी – सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम आदल्या दिवशीच्या पचनातून निर्माण झालेला मळ बाहेर टाकावा . वर सांगितलेल्या वेळेत उठण्याची सवय केल्यास हा मल बाहेर टाकण्यासाठी अधिक जोर किंवा उपाय करण्याची वाट बघण्याची वेळ सहसा येत नाही आणि शरीर खऱ्या अर्थाने फ्रेश होण्यास मदत होते .
• दंतधावन आणि जिव्हानिर्लेखन – म्हणजेच दातांची , जिभेची आणि संपूर्ण तोंडाची स्वच्छता . दातांच्या स्वच्छतेसाठी कडुनिंब , खैर अशा वेगवेगळ्या वनस्पतींच्या काड्यांचा वापर करण्यास सांगितलेला आहे . दात व संलग्न अवयवांची स्वच्छता ज्याने करायची त्या वस्तूची चव ही कडू , तिखट , तुरट यापैकी असणे गरजेचे आहे . म्हणूनच वनस्पतींच्या काड्या जरी नाही वापरल्या तरी , रोज वापरायची टूथपेस्ट ही किमान गोड , आंबट किंवा खारट असू नये याची काळजी आपण घ्यायला हवी . जिभेच्या स्वच्छतेसाठी धातूच्या पट्ट्यांचा वापर करावा .
● अंजन – दात व जिभेच्या सफाईनंतर सुरम्यासारखे अंजन डोळ्याला लावल्यास बाहेर पडणाऱ्या पाण्यासोबत डोळ्यात साठून राहिलेले मळ सहज बाहेर पडतात आणि
निर्मळ , स्पष्ट व तीक्ष्ण दृष्टी प्राप्त होते.
● नस्य – डोळ्यांनंतर येते ती नाक व नाकाशी संलग्न अवयवातील कफप्रधान मळ बाहेर काढण्याची क्रिया . यासाठी अणुतेलासारख्या औषधी तेलाचे काही थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावयाचे असतात . असे औषधी तेल साठलेल्या मळाला बाहेर काढण्यासोबतच नाक , कान , डोळे अशा सर्व इंद्रियांची ताकद उत्तम राखण्यास मदत करते .
● गंडूष – मुखातील दात ,हिरड्या , जीभ , ओठ , घसा , गालांचा आतील भाग हा अन्न पचविण्याच्या , बोलण्याच्या रोजच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा असतो . या सर्व प्रक्रियांमध्ये रोजच्या रोज त्याची होणारी झीज भरून काढून या सर्व भागांचे बळ वाढवायचे असेल तर सदर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरतो . यामध्ये तीळतेल , वनस्पतींचे काढे किंवा दूध असे औषधी द्रव पदार्थांना काही विशिष्ट कालावधीकरिता तोंडात धरून ठेवायचे असते . निर्धारित कालावधी पूर्ण झाला की ते पदार्थ बाहेर टाकून द्यायचे .
• धूमपान – विशिष्ट औषधींपासून तयार केलेल्या विडीसारख्या धूपन कांडीच्या साहाय्याने तयार झालेला औषधी धूर नाकावाटे व तोंडावाटे आत घेणे आणि तोंडाने बाहेर सोडणे अशी प्रक्रिया यात असते . अशा धूमपानामुळे डोक्यातील जडपणा , शूळ , शीर प्रदेशातील त्रासदायक कफासारखे स्राव हे सर्व नाहीसे होऊन सर्व इंद्रियांना उत्तम बळ मिळते आणि अनेकविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होते.
• तांबूल सेवन – वरील सर्व उपचारांतून बाहेर पडणाऱ्या मलस्वरूप द्रव्यामुळे मुखदुर्गंधी होऊ नये व तजेला वाटावा याकरिता तांबूलसेवन उपयुक्त ठरते . विड्याचे पान किंवा जायफळ , लवंग यासारख्या सुगंधी द्रव्यांपासून बनलेला मुखवास सेवन करावा
● अभ्यंग- अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला कोमट तिळाच्या तेलाने मालिश करणे . रोज केलेल्या अभ्यंगाने शरीर लवकर म्हातारे दिसत नाही , त्वचा तजेलदार बनते , वाताचे आजार दूर ठेवता येतात , डोळ्यांची शक्ती वाढते आणि सर्व शरीराला पुष्टी प्राप्त होते .
● व्यायाम – व्यायाम म्हणजे शरीराची अशी हालचाल ज्याने शरीर अधिकाधिक स्थिर होण्यास मदत होईल आणि बळ वाढेल . अन्यथा याचा पूर्णतः विपर्यास होऊन शरीराला दमवणारा , थकवणारा असा व्यायाम सध्या केला जातो . परंतु हे शास्त्रीय तत्त्वाच्या विरोधी असल्याने दमवणाऱ्या व्यायामाने स्वास्थ्य वाढेल ही अपेक्षाच करणे खरे तर चूक ठरते . टीव्ही किंवा सिनेमात एखाद्या पैलवानाला अंग रगडून घेत असल्याचे तुम्ही पाहिले असेल , यालाच अंगमर्दन असे म्हणतात . व्यायामाने दमलेल्या शरीराला आलेले श्रम नाहीसे होण्यासाठी , आपल्याच हाताने सुखावह ठरेल इतकासा दाब देऊन अंगमर्दन करावे .
• उद्वर्तन – विशिष्ट औषधींची चूर्णे सर्व शरीरावर घासून लावणे याला उद्वर्तन असे म्हणतात . व्यायामानंतर उद्वर्तन केल्यास शरीर दृढ होण्यास मदत होते , त्वचेचे सौंदर्य वृद्धिंगत होते आणि सोबतच शरीरातील अनावश्यक मेद पातळ होण्यास व झडण्यास मदत होते.
व्याधिक्षमत्व
• स्नान – अभ्यंग , व्यायाम व उद्वर्तनानंतर क्रमाने स्नानाची वेळ येते . मानेच्या खालील शरीरावर गरम पाण्याने , तर वरील भागावर मात्र किंचित कोमट किंवा थंड पाण्याने स्नान करावे . डोक्यावरून गरम पाण्याने स्नान केल्यास ते डोळे आणि केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते .
• भोजन / अन्नसेवन – स्नानाने शुद्ध व स्वच्छ झाल्यावरच आता क्रमाने भोजन किंवा अन्नग्रहण याचा विचार येतो . याचाच अर्थ वरील सर्व गोष्टी या सकाळी उठल्यापासून क्रमाने करून झाल्याशिवाय खरे तर काहीही खाणे योग्य नाही . आदल्या दिवशी ग्रहण केलेल्या अन्नपाण्याच्या पचनातून तयार झालेला मल , अस्वच्छता , आळस , जडत्व हे सगळे गेल्यानंतरच आजच्या दिवसासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ज्याला यज्ञकर्माची उपमा दिली आहे असे अन्न सेवनाचे कार्य करावे . अशाप्रकारे आधीच्या अन्नाचे पचन पूर्ण झाल्यावर , चांगली भूक जाणवल्यावर , शरीर वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल अशाप्रकारचा आहार योग्य प्रमाणात सेवन केल्यास अन्न सुलभतेने पचते आणि बलदायी ठरते .
दिवसाच्या इतर सर्व कामांची सुरुवात वरील उपक्रम झाल्यानंतर करणे हे आदर्श आहे . अशाप्रकारे दिनचर्येत नमूद केलेल्या वरील गोष्टींना जीवनशैलीचा भाग बनविल्यास नक्कीच उत्तम स्वास्थ्य आणि रोगप्रतिकारशक्ती मिळविणे शक्य होईल . तसेच थोड्याथोडक्या आजारांनी शरीराला हानी न पोहोचता शरीर आजारांना दूर ठेवू शकेल व यदाकदाचित झालेल्या आजारांचा समर्थपणे सामना करण्यायोग्य बनेल.
वैद्य. देवश्री फाटक
श्रीगजानन महाराज मेडिकल सेंटर ,
शिवाई नगर , ठाणे ,
७३०४७९०३५८
Leave a Reply