रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच हवा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत याबद्दल
————————————————————————-
व्यायाम हे नेहमी आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते नियमितपणे केले पाहिजेत, असे आपण ऐकतो, परंतु त्याच्यामुळे होणारे आपले फायदे काय असतात, हे आपल्या लक्षात येत नाही, व्यायामामुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
१. व्यायाम केल्यामुळे कार्यक्षमता वाढते, कारण व्यायामामुळे शरीराला आणि सर्व अवयवांना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन जास्त प्रमाणात पोचवला जातो. ज्यामुळे शरीरातील उत्साह व चैतन्य वाढते.
२. व्यायामामुळे वाढलेले वजन कमी करण्यास आणि वजन कमी असल्यास ते वाढण्यास मदत होते. व्यायामामुळे वाढलेल्या कॅलरी वापरल्या जातात.
३. व्यायामामुळे शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते.
४. व्यायामामुळे मनाची स्थिती सुधारते, तसेच आत्मविश्वास वाढतो.
५. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती सुधारते आणि काम करण्याची सहनशक्ती वाढते.
६. व्यायामाने चांगली झोप मिळण्यास मदत होते. कारण दिवसभराच्या कसरतीमुळे लवकर आणि शांत झोप लागते.
७. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि हृदय, मेंदू यंसारख्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळे हृदयाचे विकार, रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो.
८. आजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी व्यायाम हे अतिशय मदत करतात. घाम येईपर्यंत व्यायाम केल्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
९. व्यायाम केल्यामुळे डिप्रेशन, चिंता यांसारखे मानसिक रोग बरे होतात.
१०. व्यायामानंतर शरीरामध्ये रक्तपुरवठा वाढल्यामुळे मेंदूचाही रक्तपुरवठा वाढतो. यामुळे मेंदूमध्ये नवीन सेल्सची निर्मिती होते आणि यामुळे ‘डिजनरेशन’ कमी होण्यास मदत होते.
११. त्वचा हा एक शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. व्यायामामुळे त्वचेलासुध्दा रक्तपुरवठा वाढविला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात आणि त्वचेला पोषक घटक पोचवले जातात.
१२. नेहमी व्यायाम केल्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते आणि त्यामुळे फ्लू वगैरे आजार होत नाहीत.
१३. स्त्रियांमध्येही अनेक रोगांसाठी व्यायाम महत्त्वाचे आहेत. गर्भावस्थेतसुध्दा नियमित व्यायाम केल्यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते.
व्यायामाचे प्रकार –
साधारणतः व्यायामाचे चार मुख्य प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे सांगता येतील.
१. कार्यक्षमता वाढविणारे व्यायाम
२. शारीरिक शक्ती वाढविणारे व्यायाम
३. संतुलन ठेवणारे व्यायाम
४. लवचिकता आणणारे व्यायाम यामध्ये अनेक कृती या दोन किंवा तीन प्रकारांमध्येसुध्दा
येऊ शकतात.
१ कार्यक्षमता वाढविणारे व्यायाम
-एरोबिक्स
-जोरात चालणे
-जॉगिंग
-बागेतील काही काम करणे.
-नृत्य करणे.
२. शारीरिक शक्ती वाढविणारे व्यायाम
-वजन उचलणे.
-रेझिस्टन्स बॅडचा वापर करणे.
३ संतुलन ठेवणारे व्यायाम
-एका पायावर उभे राहणे.
४. लवचिकता आणणारे व्यायाम
-खांद्याचे ताणाचे व्यायाम
-पायाच्या मागील भागाचे व्यायाम योग
-काही दररोज करण्यासाठीचे व्यायाम
सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रत्येक सामान्य व्यक्ती रोज करु शकतो. सूर्यनमस्कार केल्यामुळे पुढील प्रकारचे फायदे होतात.
– सूर्यनमस्कारांमुळे पचनसंस्थेचे काम व्यवस्थित होते.
– यामुळे पोटावर ताण आल्याने पोटाची जाडी कमी होण्यास मदत होते.
– सूर्यनमस्कारामुळे झोपेच्या समस्या कमी होऊन झोप शांत लागते.
– सूर्यनमस्कारामुळे मेंदुला रक्तपुरवठा होतो.
– यातील स्थितीमुळे शरीरामध्ये लवचिकता येते.
– सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे अनियमित मासिक धर्म नियमित होण्यास मदत होते.
तसेच सूर्यनमस्कारमुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर वगैरे समस्यांमध्ये देखील फायदा होतो.
जोरात चालणे
जोरात चालणे हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. दररोज चालण्यामुळे रक्तदाब, डायबिटीस, वजन वाढीच्या समस्या, मानसिक ताणतणाव वगैरे समस्यांवर रोज चालण्यामुळे फायदा होतो.
सायकलिंग
सायकलिंग करणे हा सुध्दा एक अतिशय चांगला आणि रोज करता येण्यासारखा व्यायाम आहे. याचेही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
– कोलेस्टेरॉल वाढणे यांसारख्या समस्येवर सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे.
– सायकलिंग केल्याने हृदयाला रक्तपुरवठा वाढला जातो.
– हृदयरोगाचा धोका या व्यायामामुळे टाळला जाऊ शकतो.
– सायकलिंग हा व्यायाम दररोज केल्यामुळे श्वास संस्थेतील स्नायूंचे कामसुध्दा उत्तम प्रकारे होते.
– सायकलिंग केल्यामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि त्यामुळे हातापयातील स्नायूंचे कार्य सुधारते आणि हालचाली करण्यामध्ये सोपेपणा येतो.
प्रत्येकाने आपल्या आवडी व निवडीनुसार दररोज करण्याचा व्यायाम ठरवावा. आठवड्यातून कमीत कमी पाच ते सहा दिवस तरी अर्धा तास व्यायाम करावा.
एकाच प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा दिवसाआड वेगळ्या पध्दतीचा व्यायाम करावा. त्यामुळे व्यायामातील आवडदेखील टिकून राहते.
आपण ऋतुमानानुसार देखील व्यायाम बदलू शकता. जसे की, उन्हाळ्याच्या स्वीमिंग करतो. जर कुठल्याही प्रकारचा आजार असेल, तर व्यायामाआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरेल.
– संकलन : सुरेश खडसे
Leave a Reply