राम : ( दशरथाला) –
शोक आवरा अपुला, आणिक निरोप द्या आतां
करील तुमची वचनपूर्ति हा सुत मोदें, ताता ।। १
ब्रीद हेंच आपुल्या कुळाचें –
‘वचन दिलेलें पाळायाचें’
माझ्या प्रेमापोटीं कां कर्तव्याला चुकतां ? २
वचनपूर्तता तुमची व्हाया
सिद्ध असे मी वनात ज़ाया
भाग्य म्हणूनच मला लाभला तुम्हांसमान पिता ।। ३
पुत्रनीति जी आहे सक्षम
पितृसुखा ती देइ अग्रक्रम
गुरुजन, ज्ञानी, मुनी दुजोरा देती याच मता ।। ४
लोभ नसे राज्याचा मजला
पहा मुगुट हा लगेच त्यजला
राहो आनंदात त्यामुळे कैकेयी माता ।। ५
नको रडूं कौसल्या-माते
तात विनंती, पुसा नयन ते
राज्य अयोध्यानगरीचें भोगो माझा भ्राता ।। ६
द्या भरताला हें सिंहासन
वराप्रमाणें, द्या मजला वन
यत्न फोल हा थांबविण्यांचा मज जातां-जातां ।। ७
दिनरातीं मज नका आठवूं
कुणां भेटण्यां नका पाठवूं
चौदा वर्षें झाल्यानंतर येइन मीच स्वत: ।। ८
आशिष गुरुजन-आप्तेष्टांचे
चरण वंदुनी निजमातांचे
निघतो मी तात्काळ काननीं, क्षणहि न घालवितां ।। ९
ही मज वाटत नाहीं शिक्षा
सुतधर्माची आज परीक्षा
लागल्यास अर्पीन प्राण, राज्याची काय कथा !! १०
– सुभाष स. नाईक
Leave a Reply