नवीन लेखन...

निसर्ग आणि आपण

संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात.

आपल्या प्रत्येक सुखामध्ये दुसऱ्याला सामिल करून घेणं हे फक्त भारतीयच नव्हे, तर साऱ्याच मानवी संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती तर या देण्या ‘कडे फार उदात्मदृष्टीने पाहते.

धनाचं दान करताना ते सत्पात्री असावं लागतं. पण अन्न, पाणी मात्र योग्यता न बघताही द्यावं. कारण सर्व जीवांच्या शरीरात एकच ‘वैश्वानर’ राहतो’ असं आपली संस्कृती मानते. जो माझ्यात आहे. तोच इतर माणसात, पशु-पक्ष्यात, कीटकात, एवढंच नव्हे तर वनस्पतीतही आहे, ही केवढी उदात्त कल्पना आहे !

यामुळं जीवनाची एकसंघता लक्षात येते. ‘जीवन’ एक आहे. इतरांच्या जीवनापासून माझं जीवन वेगळं काढलं जात नाही, हा या अन्नदानाचा पाया आहे. केवळ मी’च जगलो पाहिजे असे नाही तर सारेच जगले पाहिजेत हा भाव आहे.

याचसाठी या संस्कृतीनं गृहस्थांवर काही बंधने घातली. त्यानं स्वतः जेवण्यापूर्वी बाहेर कुणी अतिथी आहे का, हे पाहावं. कुणी असेल, तर त्याला आधी जेवण द्यावं, मग आपण घ्यावं. अतिथीला देताना त्यामागे अहंकार नसावा, तर ‘अतिथी हा देव मानून आदरानं त्याला द्यावं आणि घेणाऱ्यांनंही तितक्याच ताठपणे घ्यावं.

हीन, लाचार होऊ नये, हेही याच संस्कृतीनं शिकवलं. परिस्थितीमुळं माधुकरी मागून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या झोळीत इथे नेहमी ताजं आणि चांगलं अन्न पडत गेलं, ते यामुळंच. ही एकप्रकारे समाजसेवाच होती. पण ती करणाऱ्याला देणं हा आपल्या धर्मच आहे, कर्तव्य आहे असं वाटायचं, त्यामुळं तो उद्दाम व्हायचा नाही. तर घेणाऱ्याला हा आपण विद्येसाठी स्वीकारलेला धर्म आहे असं वाटायचं, त्यामुळं तोही लाचार व्हायचा नाही. केवळ माणसंच नाहीत तर पशुधनही जगलं पाहिजे म्हणून ‘गोग्रास’ घालण्याची पद्धत होती. गायी-म्हशी, इतर चतुष्पाद प्राणी यांच्यासाठी अन्न मुद्दाम काढून ठेवलं जाई.

मुंग्यांना साखर घालणं, चिमणी – कावळ्यांसाठी धान्याचे दाणे, पाणी ठेवणं यामध्ये पर्यावरण समतोल आपोआप साधला जाई. भूमी जे अन्न देते, ढग जे पाणी देतो, त्यावर साऱ्यांचा हक्क आहे कारण निसर्ग जे देतो ते साऱ्यांसाठी असतं याची जाणीव संस्कृती देत असे. म्हणूनच उन्हाळ्यात नदी-नाले कोरडे पडत असताना आपल्या अंगणात पाणी पिणाऱ्या पक्ष्यांकडे पाहून आपणच तृप्त होतो आहोत असं वाटायचं. कोकिळेचा पहिला पंचम आपल्या कानावर येणं ही गर्वानं सांगायची गोष्ट वाटायची.

गावाचा विकास होत होत त्यांची शहरं झाली आणि जीवनाची एकसंघता संपली. पशु-पक्ष्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं संपलं. आपण मुक्ततेचा आनंद घेत असताना, ते पिंजऱ्यात ठेवून पाहण्याची ‘वस्तू’ झाले.

तेही आपल्यासारखेच जीव आहेत. आपण आणि ते एकाच निसर्गाचा

अंश आहोत हा विचार संपला आणि पशु-पक्षी आपल्या उद्योगाचं साधन बनले.

आपल्या करमणुकीसाठी ते पिंजऱ्यात बंद झाले. कधी त्यांच्या कातड्यांच्या पर्सेस, ड्रेस आपल्याला हवेत म्हणून ते मारले जाऊ लागले, तर कधी दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी मारले गेले. कधी त्यांचं मांस रुचकर लागतं म्हणून त्यांचा प्राण घेतला गेला. या साऱ्या कारणांनी पर्यावरणाचा समतोल मात्र ढळला. विकास व्हायला हवाच होता. ग्रामीण आणि रानावनातलं जगणं तेवढं खरं असं कोण म्हणेल? कारण शहरांनीही माणसाला खूप काही दिलं. ज्ञान, वैद्यकीय सोयी, बुद्धीसाठी नवी आव्हानं… सारंच !

पण हे करताना निसर्गाची मदत एखाद्या मित्रासारखी घेतली नाही. त्यानं जे उदारपणे दिलं त्याचा फायदा त्याला न दुखवता घेतला गेला नाही. त्याला पिळवटून, त्याच्यावर अतिक्रमण करून जेत्याच्या आविर्भावात आम्ही पुढे आलो.

निसर्गातलं सौंदर्य आणि सूर यांच्यासाठी थांबवायला आता माणसाला वेळ नाही.

कधी कधी मनात येतं, जेव्हा त्याला सक्तीनं थांबावं लागेल, कदाचित स्वतःच्याच शस्त्रांमुळं किंवा निसर्गाच्या रौद्र आविष्कारानं. तेव्हाची पृथ्वी कशी असेल?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..