पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आनंद सानेच्या ‘सर्वज्ञानी’ मासिकाचे आम्ही काम करीत होतो. एके दिवशी आनंदने मला सांगितले, ‘आज रात्री आपल्याला मुंबईला जायचंय.’ मी घरात तसे सांगितले व आम्ही दोघे रातराणीत बसून मुंबईला निघालो. पहाटे मुंबईत उतरलो. एका इराणी हाॅटेलमध्ये जाऊन मस्का पाव, चहा घेतला. तिथून एका प्रिंटींग प्रेसवर पोहोचलो. तिथं गेल्यावर मला आनंदने कामाची कल्पना दिली.
पुण्यातील ‘संदेश एजन्सी’ने कालनिर्णय सारखी दिनदर्शिका काढण्याचे ठरविले होते. त्याचे शेवटच्या टप्यातील मागील बारा पानांचे पेस्टींगचे काम एका दिवसात उरकायचे होते. माझ्यापुढे मजकुराची टाईपसेटींग ब्रोमाईडची भेंडोळी ठेवली होती. मी क्रमाक्रमाने दिवसभरात काम पूर्ण केले. रात्रीच्या एसटीने पुण्याला परतलो. काम वेळेत पूर्ण झाल्याबद्दल ‘संदेश’ची मंडळी व आम्ही दोघं एकत्र जेवणाचा कार्यक्रम केला. काही दिवसांतच कॅलेंडर हातात आले. ते छान झाले होते.
या प्रसंगानंतर पुन्हा काही ‘संदेश’शी संपर्क आला नाही. मात्र अप्पा बळवंत चौकात गेल्यावर तिथं डोकावल्याशिवाय पुढे कधी गेलो नाही. आधी मोठ्या वाड्यात थाटलेला या एजन्सीचा पसारा तिथे मोठी बिल्डींग झाल्यावर शटर असलेल्या पाच गाळ्यांत सामावला. भारतातील सर्व भाषांतील नामवंत दैनिकं, साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं आणि वार्षिकं इथं हमखास मिळायची. आम्हाला साऊथच्या चित्रपटावरचे साप्ताहिक घेण्याचे वेड लागले होते. असे खूप अंक जमा केले.
‘संदेश’चा खरा सीझन दिवाळीच्या आधी दोन महिने सुरू होत असे. १९८५ साली सर्वांत अधिक दिवाळी अंक बाजारात आले. त्यावेळी कामगार वर्ग रात्रपाळी करीत असे. एवढ्या संख्येने दिवाळी अंकाचे वितरण करुन त्याचा हिशोब ठेवणे ही मोठी अतर्क्य गोष्ट होती.
पुढे दहा वर्षांनी दिवाळी अंक कमी प्रमाणात निघू लागले. काही संपादकांची पिढी संपल्याने अंक बंद झाले. फक्त नामवंत अंक चालू राहीले.
२००० नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे दिवाळी अंकांच्या दृक-श्राव्य सीडी निघू लागल्या. नाविन्य म्हणून काही वर्षे हा प्रकार चालू होता. त्यानंतर दिवाळी अंकांची पूर्ण पीडीएफ फाईल निघू लागली. साहजिकच दिवाळी अंकांच्या या क्रांतीने एजन्सी वाल्यांचे मोठं नुकसान केले.
पुणे वाढलं, स्पर्धा वाढली. त्यामुळे संदेश एजन्सीसारख्या अनेक एजन्सी व्यवसाय करु लागल्या. स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात अनेक प्रकाशक निर्माण झाले. त्यांनी त्या पुस्तकांबरोबर दिवाळी अंकही सवलतीत विकायला सुरुवात केली.
परिणामी संदेश एजन्सीचा व्यवसाय कमी झाला. २०१९ नंतर येणाऱ्या कोरोनाने जगातील आर्थिक व्यवस्था ढासळून टाकली. छोटे व्यवसाय, उद्योग बंद झाले. प्रकाशन व्यवसाय अडचणीत आला. मे महिन्यात दिवाळी अंकांच्या संपादकांना अंकाचे वेध लागायचे. विषय ठरविणे, लेखकांशी पत्रव्यवहार करणे.
२२ मार्च २०२० ला लाॅकडाऊन सुरू झालं आणि सर्व स्वप्नं झाकोळून गेली.
काल सहज फेसबुक पहाताना ‘चपराक’च्या संपादकांची पोस्ट पाहिली. त्यामध्ये सुप्रसिद्ध अनुवादकार रवींद्र गुर्जर यांनी संदेश एजन्सी बंद होत असल्याची बातमी लेटरहेडसह टाकलेली पाहिली. फार वाईट वाटलं. पुण्याची वैभवं अशी बंद होत गेली तर त्या त्या ठिकाणी गेल्यावर आठवणी दाटून येतील आणि हृदयात कालवाकालवही नक्कीच होईल….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-७-२०.
Leave a Reply